प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
☆ ।। पुनरागमनायच ।। ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
श्रावण मास कसा सरला ते कळलंच नाही. व्रतवैकल्ये, श्रावणाची रिमझिम, हवं हवेस वाटणार सोनेरी कोवळ उन ! हवेत गारवा ठेवत. भाद्रपद मास आलाच !
दोन चार दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाची गोड चाहूल होतीच ! त्याची तयारी पण चालू झाली. गणेश मूर्ती ठरवण्यासाठी कुंभार वाड्यात नेहमीप्रमाणे हेलपाटे. पण आनंदाचे ! मूर्तिकाराला अनेक सूचना, रंगसंगतीचा सल्ला ! तो पण हो दादा हो ! अगदी सालाबादप्रमाणेच, तुमचा बाप्पा सजवून तुम्हाला सुपुर्द करतो ! काळजी सोडाच ! सकाळी लवकरच येणार ना. बाप्पाला न्यायला !
होय महादू नक्कीच लवकर येणार, नन्तर मग गर्दी खूप वाढते. महादू कुंभार हा अख्या गावातील एकमेव मूर्तिकार ! पण अव्वल दर्जाचा कलाकार. दादांचा स्वभाव त्याला माहित होताच ! गणेशोत्सव व गणपती बाप्पाची मूर्ती ह्यात प्रत्येकाच भाव विश्व गुंतलेलं असतच !
आले आले म्हणत, बाप्पा वाजत गाजत आले.
घरोघरी बाप्पा विराजमान पण झाले. त्यापूर्वीच आरास, सजावट मखर आणि घरातील पण रंग रंगोटी झालेली ! रोज नवीन पक्वान्न, आरत्या, मंत्रपुष्पांजलीची चढाओढ रात्री चक्री भजन. दिवसभर फटाक्यांची आतषबाजी ! गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौराई आणि गणेश भोजन उर्फ मोठा नैवेद्य. हो त्याच दिवशी राधा अष्टमी चा योग असतो.
त्यातच श्रावण मासात राहिलेली सत्यनारायण पूजा.
दिवस कसे सरले ते कुणालाही कळलं नाहीच !
आणि तो दिवस येऊन ठेपला ! नको नकोसा वाटणारा !
आज अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पा येऊन दहा दिवस कसे सरले ते कळलंच नाही. ह्या दहा दिवसांत घर कस भरभरून गेल्याच जाणवत होतं. वर्षातील अपूर्वाई तर होतीच. रोज नवविध पक्वान्न, पूजा, आरती, मंत्रपुष्पांजली, कस सगळं साग्र संगीत चाललं होतं. आज शेवटचा दिवस, मनाला हुरहूर लागली होतीच. आज गणपती बाप्पाच विसर्जनकाल येऊन ठेपला होता. गुरुजींची वाट बघत दादा उभे होते.
गुरुजी लवकर येउ नयेत अस वाटत होतं.
जरा अंमळ चार वाजताच गुरुजी आले, घरी पण सर्व तयारी झाली होतीच, गुरुजी नी गडबड केली, चला अजुनी वरच्या आळीत जायचं आहे.
तस दादांनी मुकटा सोहळ नेसल व बाप्पाची आता बाप्पासमोर आरती करण्यासाठी उभा ठाकले आरत्या झाल्या, मंत्रपुष्पांजली झाली. पंच खाद्य तसेच दहीभात पाट वड्या, कडबोळी इत्यादी प्रसादाचा नैवेद्य झाला.
गुरुजींनी अक्षता हातात घेतल्या
।।”यांतु देवागणांनाम सकळ पुर्वमादाय
इच्छित कामना सिद्धर्थम
पुनरागमनायच ” ।।
अस मंत्र म्हणुन अक्षता “श्री मुर्ती “वर टाकल्या तस डोळ्यात टचकन पाणी आलं, सर्वांचे डोळे ओले झाले, पाट रिकामा होणार, केलेला थाट आरास निर्माल्यागत होणार. घर ओकबोक वाटु लागणार होतं पण नाइलाज होता.
मंडळी वर्षातुन एकदा बाप्पा येणार दहा दिवस राहणार, कोड कौतुक करून घेणार व बघता बघता दहा दिवस कसे निघुन गेले ते कळतच नव्हते. दहा दिवसांत घर कस भरलेलं वाटत होतं, रोज नवीन पक्वान्न, नैवेद्य आरती, मंत्रपुष्पांजली जागर इत्यादी गोष्टींची रेलचेल. जगण्याचा एक एक क्षण सोहळाच! शिकवत होता.
बघा मंडळी जे जे पार्थिव आहे ते ते विसर्जित होण्यासाठीच!! मग बाप्पा असो वा तुम्हींअम्ही, सकळ पशु पक्षी, चराचर पार्थिव च की ! पार्थिव म्हणजे काय ?
तर जे जे पंचभुताने निर्मित ते ते सर्व पार्थिव. ह्या नियमात सर्व सजीव श्रुष्टी आलीचकी म्हणजे एक ना एक दिवस आपलं पार्थिव शरीर सोडुन आपणास पण गेले पाहिजेच !
विसर्जन आपलं पण होणारच हे त्रिकालाबाधित सत्य ! बाप्पाचं अनंत चतुर्दशी ही तिथी ठरलेली आहे. तस तुमची आमची तिथी ठरलेली नाही ! ते सर्व बाप्पाच्या हातात !
एक ना एक दिवस आपल्याला विसर्जित व्हावं लागणार ! श्रुष्टी नियमच आहे तो. जुनी पान गळुन पडणार नवीन पालवी येणार, जसा वसंत ऋतु येतो तसाच ग्रीष्मही येतो
हीच निसर्गाची ख्याती आहे.
पान फुल फळ मोहर काही झाड, याना पण विसर्जित व्हावं लागतच की, विविधरंगी फुल उमलतात, विविध गंध ते देतात, फळात रूपांतर झाले की आपलं अस्तीत्व ते फळात ठेऊन बाजुला होतात. नवीन रोप त्याच बहरण, त्याच अस्तीत्व, वयात आलं की कळी ते फुल, फुल ते निर्माल्य त्याचा गंध शेवटी मातीत पार्थिव रुपात विसर्जित होतो. हेच तर श्रुष्टी चक्र आहे, मग गणपती असो व इतर तुम्ही आम्ही सजीव !
हो पण गम्मत अशी आहे की, मन व आत्मा हे अविनाशी, ते परत सृष्टीत अनेक रुपात पुनर्जन्म घेतात च की !
गीतेत श्रीकृष्ण म्हणतात
“पुनरपि जननं पुनरपि मरण म ।
पुनरपि जननी जठरे शयनम”।।
याचाच अर्थ “
।।” इच्छीत कामांना सिद्धर्थम पुनरागमना यच ” ।।
पार्थिवं शरीर जन्म घेणे व परत मरणे व परत पुनर्जन्म घेणे ! हाच सृष्टी चक्राचा नियम मग तो कोणी ही असो. तुम्हाला आम्हाला चुकलेल नाही, हेच गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्याने बाप्पाला सांगायचं असत ! अस नाही का वाटत तुम्हाला ?
म्हणूनच मला ह्या तत्वावर काव्य सुचलं ते तुम्हाला कस वाटलं, विचार योग्य आहेत का ते जरूर कळवा..
☆ विश्व चक्र ☆
असेन मी नसेन मी
सुगंध जतन करेन मी
कोण मी कोण तु ?
फुल मी पान तु
बहरू सदैव चराचरी
निर्माल्य मी निर्माल्य तु
येता ग्रीष्म हा ऋतु
मिसळु चैतन्य नवे
होऊन माती श्रांत तु
थेंब थेंब बरसता
नवं संजीवनी वर्षा ऋतु
फुटून येऊ पानोपानी
फळ मी पान तु
सृजनशील गीत गात
नवजन्माने मग परतु
असेन मी असशील तू
सुगंध कुपी देशील तू
“पुनरागमनायच”
… हाच संदेश आपल्याला बाप्पाकडुन घ्यायचा आहे
अस नाही का वाटत तुम्हाला !
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈