श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ कृष्ण… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
अंत:करणातील
कृष्ण जन्मू दे
चेतना जागरूकता रुपात
नकारात्मक अंधार
नाहीसा होऊ दे…
मी, माझा, हा अहंभाव
साखळी रुपात
जखडून ठेवला आहे
त्या साखळ्या तुटू दे…
व्यष्टीची कवाडे
अलवार उघडून
रस्ता समष्टीचा
मोकळा होवू दे…
निर्मोही होवून
अलिप्तपणे जगावे
शिकवून जातो कृष्ण
स्वतः ला तटस्थ राहू दे..
कृष्ण म्हणजे प्रेम
कृष्ण जीवन बासुरी
कृष्ण म्हणजे वैराग्यही
असा कृष्ण अंतरी जन्मू दे…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈