श्री विश्वास विष्णु देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
इंग्लंडमधून भारतात परत आल्यावर रवींद्रनाथांनी ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नावाचे एक नाटक लिहिले. या वेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. रवींद्रनाथांना नाट्य, संगीत आणि काव्यलेखनाचे बाळकडू त्यांच्या घरातच अगदी लहानपणापासून मिळाले होते. त्यांचे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ नाटके लिहीत आणि बसवत असत. गुणिंद्रनाथ म्हणून त्यांच्या एका चुलतभावाला पण नाटकांची आवड होती. ज्योतिदांनी रवींद्रनाथांना नेहमीच उत्तेजन दिले. त्यामुळे रवींद्रनाथांची प्रतिभा साहित्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करू लागली होती.
‘वाल्मिकी प्रतिभा’ हे नाटक अनेक अर्थांनी आगळेवेगळे आहे. वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी होण्याआधी एक दरोडेखोर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मदेव आणि नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी ‘ रामायणाची ‘ रचना केली. परंतु ही रचना करण्याआधी त्यांनी क्रौंच पक्षाचे एक जोडपे एका झाडावर बसलेले पाहिले. त्या आपल्या आनंदात निमग्न असणाऱ्या एका पक्ष्याला एका शिकाऱ्याने बाण मारला. त्यामुळे त्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप पाहून वाल्मिकींचे हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून रामायणातील तो प्रसिद्ध श्लोक बाहेर पडला.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।
यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।
कधी नव्हे तो आपल्या तोंडून अशा प्रकारची सुंदर रचना कशी काय बाहेर पडली याचे त्यांना नवल वाटले. त्यानंतर त्यांनी ब्रम्हदेव आणि नारदांच्या आशीर्वादाने रामायणाची रचना केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जी मूळ घटना आहे, ती रवींद्रनाथांना मान्य होती. पण आपल्या नाटकात त्या घटनेला त्यांनी वेगळीच कलाटणी दिली.
त्यांच्या ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नाटकात वाल्या आणि त्याचे साथीदार यांची दरोडेखोरांची एक टोळी असते. ही सगळी मंडळी अत्यंत क्रूर आणि आडदांड असतात. ते प्रतिभा नावाच्या एका निरागस मुलीला पकडून आणतात आणि कालीमातेपुढे तिचा बळी देण्याचं ठरवतात. या निष्पाप मुलीचा आक्रोश ऐकून वाल्याचे हृदय द्रवते. तो आपल्या साथीदारांशी वैर पत्करून तिची सुटका करतो. टोळीतील सहकाऱ्यांना सोडून देऊन तिला घेऊन रानोमाळ भटकतो. त्यातूनच त्याचे हृदयपरिवर्तन होते. तो स्वतः विषयी विचार करू लागतो. अंतरात्म्याचा शोध घेतो. त्याची ही तळमळ पाहून ती मुलगी म्हणजे प्रतिभा आपल्या खऱ्या रूपात त्याच्यासमोर प्रकट होते.
ती म्हणजे प्रत्यक्ष साहित्य, कला आणि विद्येची देवता सरस्वती असते. ती त्याला म्हणते, ‘ तुझ्यातील माणुसकी जागृत होते की नाही याची परीक्षा मी पाहिली. त्यासाठी मीच बालिकेचे रूप घेतले होते. तुझ्या पाषाणहृदयाला ज्या आर्त करुणेच्या स्वरांमुळे पाझर फुटला, त्याच तुझ्या हृदयातून आणि वाणीतून आता माणुसकीचे संगीत जन्म घेईल आणि लक्षावधी मनांना कोमल भावनांनी शुद्ध करेल. तुझी वाणी देशोदेशी चिरकाल घुमत राहील आणि त्यातून अनेक कवींना प्रेरणा मिळेल. ‘
या नाटकात रवींद्रनाथांनी वाल्या कोळी लुटारूंपासून सरस्वतीला मुक्त करतो हे जे दाखवले आहे, प्रतिकात्मक आणि अतिशय महत्वाचे आहे. त्याचा अर्थ असा की ‘ सरस्वती ‘ आज साहित्यरूपाने लुटारुंच्या, धनदांडग्यांच्या ताब्यात आहे. तिला त्यांच्यापासून मुक्त केले पाहिजे. समाजाला बळ देणारे साहित्य आणि एकूणच साहित्य आणि कलाक्षेत्र हे साहित्यिक आणि कलावंतांच्याच ताब्यात असले पाहिजे. राजकारणी, धनदांडगे यांच्यापासून ते मुक्त असले पाहिजे. तरच ते सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल. समाजाच्या प्रगतीची दिशा त्यामुळे सापडू शकेल. साहित्यिकांना मोकळे आकाश मिळेल. रवींद्रनाथांनी त्याकाळी जे प्रतीकात्मक रूपाने सुचवले ते आजदेखील तेवढेच महत्वाचे आहे.
या नाटकाने रवींद्रनाथांनी जणू प्रायोगिक रंगभूमीची पायाभरणी केली. अनेक गोष्टी नवीन आणल्या. नाटकांवर इंग्रजी नाट्यभूमीचा प्रभाव होता, संगीताचा आणि रागदारीचा प्रभाव होता, त्या चौकटीतून नाटकाला बाहेर काढण्याचाच त्यांचा हा प्रयत्न होता. त्यांचे हे नाटक म्हणजे सुरांचा आणि स्वरांचा अविष्कार होता. त्याला एक प्रकारची आंतरिक लय होती. गाण्याच्या आणि रागदारीच्या बंधनांपासून काही अंशी मुक्त होत आपल्याला हवा तसा नाट्याविष्कार सादर करण्याचे आणि स्वरांच्या प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले होते. ते नुकतेच इंग्लंडहून परतल्यामुळे या त्यांच्या प्रायोगिक नाटकावर काही अंशी पाश्चात्य संगीत आणि आयरिश संगीताचा प्रभावही होताच. हे नाटक केवळ वाचण्यासाठी नव्हेतच तर ते पाहावे आणि अनुभवावे अशा प्रकारचे होते. या नाटकाने वयाच्या केवळ विसाव्या वर्षी रवींद्रनाथांचे नाटककार म्हणून दमदार पदार्पण झाले.
या नाटकातून साहित्यिक म्हणून आपल्या पुढील प्रवासाची दिशा रवींद्रनाथांना गवसली. आपले पुढील साहित्य कसे असेल याची जणू झलकच त्यांनी या नाटकाद्वारे दाखवली. दरोडेखोरांच्या किंवा धनदांडग्यांच्या तावडीतून सरस्वतीला मुक्त केल्याशिवाय कलावंताला सरस्वती प्रसन्न होत नाही हे त्यांना जाणवले होते. वाल्मीकींच्या अंतःकरणात जो दयेचा, करुणेचा झरा वाहू लागला, त्यामुळे जगाकडे आणि त्यातील क्रौर्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाल्मिकींना प्राप्त झाली. बालिकेला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवणे म्हणजेच सरस्वतीला नको असलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून मुक्त करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले. ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ हे नावच खरोखर अगदी सुंदर आहे. त्याच्या नावातच रवींद्रनाथ यांच्या प्रतिभेचाही विलास आपल्याला दिसतो. त्यांच्या प्रतिभेची झेप आपल्याला दिसते.
या नाटकात वाल्मिकींची भूमिका स्वतः रवींद्रनाथांनी केली तर सरस्वतीची भूमिका त्यांची एक भाची प्रतिभा म्हणून होती तिने केली. त्या काळात नाटकात किंवा रंगभूमीवर आपल्या घरातील मुलींना सनातनी विचारांचे लोक पाऊल ठेवू देत नसत. असे करणे म्हणजे प्रतिष्ठेला बाधा आणण्यासारखे होते. पण रवींद्रनाथांनी ही सुरुवात स्वतःच्या घरापासूनच केली. ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच होती. त्याची किंमतही टागोर कुटुंबीयांना मोजावी लागली पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. स्त्रियांना देखील कला, साहित्य, शिक्षण इ. क्षेत्रात मुक्त आकाश मिळाले पाहिजे असेच त्यांना वाटत होते. या नाटकात खरं तर त्यांच्या घरातील बहुतेक सदस्यांचा या ना त्या कारणाने सहभाग होता. हे नाटक पहिल्यांदा सादर झाले ते सुद्धा टागोर कुटुंबियांच्या जोराशंको वाडी इथेच ! कला, साहित्य इ प्रांतात पुढील काळात रवींद्रनाथांची जी वाटचाल होणार होती, त्याची सुरुवात आणि दिशादर्शन करणारे नाटक म्हणजे ‘ वाल्मिकी प्रतिभा ! ‘
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈