सुश्री मानसी विजय चिटणीस
कवितेचा उत्सव
☆ “निरागस कवितेला जपताना…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆
☆
कविता मनात जन्मावी लागते म्हणे
पण तिच्या काळ्याभोर निरागस डोळ्यांत
साक्षात कविताच जगताना पाहिलय मी
वर्गातल्या रुक्ष खिडक्यांशीही तिची गट्टी जमलीय
त्या खिडकीतलं इवलंस्स आभाळही तिच्या डोळ्यांत लपतं
फ्राॅकच्या खिशात असतात
चाॅकलेटचे चंदेरी कागद, बांगड्यांच्या काचा, कसल्यातरी बिया, आणि बरीचशी स्वप्नं
आणि हो.. माझ्यासाठी
आठवणीने आणलेलं फुल ही असतं कधीमधी
मागून येवून माझे डोळे झाकताना
तिचे चिमुकले स्पर्श आभाळ होतात
अन् गळ्यात पडून खाऊसाठी हट्ट करताना
गालांवर चंद्र उतरतात
तिच्या अबोल गाण्यांच्या ओळी
मला शांत संध्याकाळी सापडतात
कुशीत घेऊन थोपटताना
कधी नकळत
तिचा मायस हात फिरतो माझ्या डोक्यावर
धुक्याचे लोट वाहू लागतात
माझ्या पोरक्या डोळ्यांतून तेव्हा
कविता मनात जन्मतात
कुशीत झोपलेल्या निरागस कवितेला जपताना…
☆
© सुश्री मानसी विजय चिटणीस
केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈