सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ इमेज जपताना…  लेखिका : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

“ ए ये गं, शुक्रवारची सवाष्ण म्हणून जेवायला… किती दिवस झाले आपण रोजच बाहेर भेटतो… घरी कधीतरी तुला घरी बोलवायचे… हे ठरवलंच होतं…. या निमित्ताने येशील तरी…! “ तिचा आर्जवी सूर मोबाईल मधून उमटला.

माॅर्निग वाॅक ला न चुकता भेटणारी ती…! उन असो, थंडी पाऊस असो… तिची वेळ कधीच चुकत नाही… एका ठराविक ठिकाणी तिचे भेटणे ठरलेलेच असते. सडसडीत बांधा आखूड केसांचा वर बांधलेला पोनी… ट्रॅक सूट… निळसर बूट घालून, झपझप तिचं बाजूने पास होणे… ठरलेले असायचे.

एक नेटकं आणि स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व असणार ही म्हणजे… तिची अशीच इमेज माझ्या मनात दृढ होत गेली…. आम्ही एकमेकींना फक्त अंतरावरुन बघत होतो… रोजच्या भेटण्यातून कधीतरी एक स्मितहास्याची रेष दोघींच्याही चेहऱ्यावर… अशीच कधीतरी विसावून गेली. माझ्यासारखीच मध्यमवयीन… त्यामुळे अर्थातच… स्थिरावलेल्या संसारातील… थोडी निवांत गडबड… जशी मला असते… तशीच तिलाही असणारच…!

थांबून खास गप्पा मारण्याइतका परिचय नसला तरी.. अंतरीक आपलेपण दोघींनाही सारखंच जाणवत असणार… कधी चुकामुक झाली किंवा… कधी फिरण्याची दांडी पडली तर… आज तिची भेट झाली नाही… याची हुरहुर क्षणभर जाणवून जाई… तिलाही आणि मलाही.

मग आपोआप समोर येताच ‘कुठे दोन दिवस ? ‘चे प्रश्नचिन्ह एकमेकींचे डोळे वाचून जात… आणि न विचारताच कारणांचा पाढा वाचला जाई.

परवा मात्र मला थांबवून तिने मोबाईल नंबर घेतला… आणि मी तिचे जेवणाचे आमंत्रण ही सहजच स्विकारले.

आटोपशीर पण निवडक गोष्टींनी सजवलेला तिचा टू बीएचके… इरकलीचे पंचकोनी तोरण सागवानी दारावर उठून दिसत होते…. उंबऱ्याच्या दोन्ही बाजुला छोटीशी रेखीव शुभ्र रांगोळी… फक्त लालचुटुक कुंकवाच्या शिंपणाने पवित्र वाटून गेली. मोकळा… जुजबी फर्निचर मांडलेला हाॅल… समोरच्या काचेच्या काॅर्नर स्टॅण्डमध्ये… ठेवलेल्या ट्राॅफीज… तिच्या लवचिक… देह मनाची साक्ष देणाऱ्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचा छंदांची जणू पावतीच देत होत्या. ती बॅंकेत सर्व्हिस ला आहे ही जुजबी माहिती तिच्या बोलण्यातून मला समजली होती.

तिच्या दोन मुली आणि सासूबाई… हसत बाहेर येत, वातावरणात मोकळेपणा पसरवून गेल्या. पहिल्यांदाच तिच्याकडे गेल्यावर… तिच्याशिवाय कोणी ओळखीचे नाही… ही माझी थोडी uneasy भावना, त्या आजी नातींनीं सपशेल मोडीत काढली.

थोड्या गप्पा होईपर्यंत… तिने भाजी आमटी गरम करायला ठेवले. ती खासच सुगरण असणार… गरम होत असणारी भाजी आमटी जठराग्नी चेतवून गेली. नैवेद्याच्या ताटासाठी भाताची मूद करण्यासाठी कुकर उघडताच… आंबेमोहोर तांदळाचा वास दरवळून गेला… चांदीच्या ताटवाटीतला तो भरगच्च नैवेद्य तुळशीपत्राने परिपूर्ण होऊन गेला.

सवाष्णीसाठी चे ताट, वाटी तांब्या भांडे, पानं फुलांच्या सुबक रांगोळीत, टेबलावर सजलेले‌ होते. मी मलाच शाबासकी दिली… आपण मनात तिची नेटकी जपलेली इमेज बरोबर आहे.

गरम पोळी करुन वाढण्यासाठी… तांदळाच्या पिठी पासुन… भिजलेली कणिक, पुरणाचे उंडे… तिची किचन ओट्यावरची आटोपशीर तयारी तिच्यातल्या गृहकर्तव्यदक्षतेची साक्ष होती जणू.. !

ती एक उत्तम सून.. उत्तम आई.. उत्तम पत्नी.. उत्तम मुलगी… असणार, हे तिच्या एकंदर वावरातून लक्षात येऊनच गेले होते.

तिची मुलींना सासूबाईंना सोबत घेऊन जिवतीची आरती औक्षण करण्याची लगबग… सारे घर भारल्यासारखे झाले. औक्षणाचे तबक खाली ठेवताना… माझे लक्ष देवघराजवळच लावलेल्या उमद्या चेहऱ्याच्या दोन तसबिरी कडे गेले. तसबिरीस लावलेले गंधटिळे खुप काही बोलून गेले… !

माझी तसबिरीत अडकलेली नजर तिच्या‌ चाणाक्ष नजरेने लगेचच पकडली. माझे धाकटे दिर आणि माझे मिस्टर… तिची फोटोतल्या कुटुंब प्रमुखांची ही अनपेक्षित ओळख… मी क्षणभर सुन्नच होऊन गेले… !

आठ एक वर्षांपूर्वी एका अपघातात दोघेही on the spot गेले, ही माझ्या धाकट्या दिराची मुलगी… आणि ही माझी… !

अवयव दानाचा फाॅर्म केवळ आठ दिवस आधीच दोघा भावांनी भरला होता. तो सर्वांगाने नाही पण काही अंगांनी… अन् कित्येक अर्थाने माझ्यासाठी अजुनही इथे अस्तित्वात आहे… !

या समाजात, कुणाचे डोळे… कुणाची किडनी, कुणाची स्किन होऊन वावरत आहे.

तिच्या कपाळावरची लालचुटुक टिकली आणि गळ्यात पदराआड विसावलेले छोटेसे मंगळसूत्र… क्षणमात्र लखलखीत झाल्याचा भास मला होऊन गेला.

चार वर्षापूर्वी धाकट्या जावेला नव्याने तिचा पार्टनर मिळून गेला. हिला मात्र मी माझ्या जवळच ठेवून घेतले… माझी दुसरी मुलगीच ही पण… तिने तिच्या पुतणीला जवळ ओढले.

तिचे डोळे क्षणभर गढुळल्यासारखे झाले… आणि पुन्हा घरातल्या पवित्र वातावरणात मिसळून नितळ झाले…. !

चला आता जेवायला बसा… मी गरम गरम पोळी करते… तुमचा वरणभात संपेपर्यंत… !

तिच्यातल्या गृहिणींची लगबग सुरु झाली.

… ती ओटी भरताना… तिचे दोन्ही हात माझ्या ओंजळीत भरून घेत मी तिला जवळ ओढलं… हां तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैने सोचता था… !

प्रत्येक नात्यात तू उत्तमच आहेस… पण एक माणुस म्हणुन… तुझ्यातली स्त्री अत्यंत संवेदनशील, कर्तव्य तत्पर आहे. तुझ्या देहबोलीतूनच तुझी इमेज  माझ्या मनात चढत्या आलेखात निर्माण झाली होती, त्याच्या कैकपटीने… तू प्रगल्भ आहेस. सन्मानित होणं आणि सन्मानित करणं.. तुझ्याकडून शिकावं, सलामच तुला!

ती प्रसन्न हसली… सकाळच्या माॅर्निग वाॅक मध्ये हसते तशी… एकदम ओळखीची… जवळची!

मुठीतून निसटलेल्या वाळूची खंत करत बसण्यापेक्षा मुठीत शिल्लक उरलेल्या वाळुस कसा न्याय द्यायचा… हे ज्यास समजते… तिथे शांती आणि समाधान हात जोडून उभे राहते… इतकंच खरं!!!

लेखिका : सौ. विदुला जोगळेकर

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments