सुश्री सुलभा तेरणीकर
विविधा
☆ पर्णाच्छादित वाट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆
अतीतातून काही चित्रे डोकावतात. काबुलीवाला.. तो तर आपल्याला खास. त्यातल्या मिनी साठी दाखवला होता. काबुली वाल्याला ती मिनी विसरून जाते. तशी मीही तो चित्रपट विसरले.
थोड्या मोठेपणी मामा वरेरकर यांनी अनुवादित केलेल्या टागोरांच्या कथा वाचल्या.
पोस्टमास्टर, नष्ट नीड, एक रात्र, क्षुधित पाषाण, गुप्त धन, रासमनी चा मुलगा, दृष्टिदान, समाप्ती…. अशा कितीतरी.. त्यांनी मनाचा ठाव घेतला होता. पण कालांतराने त्या वर विस्मरणाचे धुके जमले….
टागोरांच्या कथा कालांतराने पुन्हा हाती पडल्या तेव्हा झपाटल्या सारख्या पुन्हा वाचल्या. पुन्हा पुन्हा वाचल्या. त्यातल्या अंतरंगाशी पुन्हा मन जडले.
तुरुंगातून सुटून आलेल्या रहमत पठाणला लहानपणी त्याच्याशी खूप बोलणारी मिनी भेटतच नाही. ती एक नववधू झालेली असते….
टागोरांची कथा इथे संपत नाही. मिनीचे वडील पठानाच्या मनाला जाणतात. दूरदेशी असलेल्या त्याच्या मुलीला त्याने भेटावे म्हणून मोठी रक्कम त्याला देतात.
उत्सव समारंभाच्या यादीतल्या हिशोबात, दान दक्षणेच्या आकड्यात काटछाट करावी लागते. पूर्वी ठरल्या प्रमाणे विजेचे दिवे लावता येणार नव्हते. वाजंत्री वालेही आले नव्हते. बायका मंडळी ही नाराज झाली होती.
पण मंगल प्रकाशाने आमचा शुभोत्सव अधिक उज्ज्वल झाला असे वाटले….
बलराज साहनी ने काबुली वाला अजरामर तर केला होताच. पण कथेचे सूत्र मिनीच्या वडिलांच्या मनोगतात किती रेखीव झालं होत.
पोस्ट मास्तर या कथेतील एक पोरकी पोर रतन.. गावातल्या पोस्टमास्टर साठी किरकोळ कामे करीत असे. मास्तर एकदा आजारी पडल्यावर ही मुलगी मोठी झाल्यासारखी त्यांची शुश्रुषा करते.
पोस्टमास्टर बरे झाल्यावर नोकरीचा राजीनामा देऊन जायला निघाल्यावर त्या मुलीचा निःशब्द दुःखावेग बाहेर पडतो.
दोनच पात्रे असलेल्या या कथेत काही हृदय पिळवटून टाकण्यासारखे असे काही नाही. म्हणूनच त्या मुलीचे दुःख आपल्या मनात खोलवर जाते…. या कथेची पार्श्वभूमी बंगालच्या ग्रामीण भागातला मलेरियाग्रस्त कोपरा आहे. पण तो तसा उरत नाही. तो रतनची मूक भाषा होतो. तिची असीम निष्ठा होती
…. ते होडीत बसले आणि होडी चालू लागली. पावसाळ्याने उसळलेली नदी धरणीच्या उमाळलेल्या अश्रुंच्या पाझरासारखी चारी बाजूने सळसळू लागली. त्यावेळी त्यांच्या हृदयात एक अत्यंत बिकट वेदना जाणवली एक सामान्य गावंढल बालिकेचा चेहरा जणू काही एक विश्वव्यापी प्रचंड अव्यक्त मर्मकथा प्रकाशित करत होता…
मूळ बंगाली भाषा सौंदर्याची जान नव्हती पण अनुवादित मराठी भाषेच्या आधाराने मी ते पुन्हा अनुभवले. महाकवीच्या प्रतिभेच्या पाऊलखुणा पुन्हा शोधल्या.
खुद्द गुरुदेव टागोरांनी या कथा पुन्हा वाचल्या तेव्हा 32 सालच्या एका पत्रातून ते लिहितात…. जेव्हा मी बंगालच्या खेड्यातल्या निसर्गाला सामोरा गेलो तेव्हा माझ्या सुखाला पारावार उरला नाही… या साध्या कथात हाच आनंद भरून राहिला आहे.. ग्रामीण बंगालच्या त्या प्रेमळ आतिथ्य शीलतेला मी आता मुकलो आहे. त्यामुळे मोटारीतून मिरवणाऱ्या माझ्या लेखणीला त्या साहित्याच्या पर्णाछादित शीतल वाटा चोखळणे या पुढे शक्य होणार नाही….
1891 ते 1895 तर काही 1914 ते 1917 या काळात म्हणजे त्यांच्या निर्मितीच्या ऐन बहराच्या काळात लिहिलेल्या या कथा आहेत.
ऐन तारुण्यात वडिलोपार्जित जमिनीची व्यवस्था पाहण्यासाठी ते सियालढा, पटिसार, शाजाद पूर, अशा खेड्यातून, तर पद्मा मेघना नद्यांतून, हाऊस बोटीतून प्रवास करीत आपल्या रयतेला भेटायला जात. बंगालचे अनुपम सृष्टी सौंदर्य न्याहाळता, त्यांच्या सुखदुःखाच्या कथा ऐकत. त्याचं प्रतिबिंब या कथात पडलेलं आहे.
1895 च्या 25 जूनला लिहिलेल्या एका पत्रात ते सांगतात, मी आता गोष्ट लिहायला बसलो आहे आणि जसजसे शब्द पूढे सरकता आहेत तसतसा भोवतालचा प्रकाश, सावल्या आणि रंग बेमालूम मिसळत आहेत. मी जी दृश्य घटना कल्पित आहे, त्यांना हा सूर्य हा प्रकाश हा पाऊस, नदीकाठचा वेळू, पावसाळ्यातले आकाश, हिरव्या पानानी आच्छादलेले खेडे, पावसानी समृध्द केलेली शेते यांची पार्श्वभूमी मिळून त्याचं वास्तव अधिक चैतन्यपूर्ण होत आहे….. या खेड्यातली निःशब्द ता जर मी वाचकांपुढे उभी शकलो, तर. माझ्या कथेतील सत्य क्षणार्धात त्यांना पूर्णपणे उमगेल…
फारा वर्षाने का होईना, महाकवी चे शब्द माझ्या समवेत घेते. त्यांच्या लेखणीच्या पर्णाछादित लेखणीच्या वाटा चालू लागते………. मृण्मयी चारुलता कादंबिनी यांच्या खेळात मीही सामील होते….
© सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈