सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ सपने… – लेखक – श्री रवीन्द्र भूरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
पार्ल्याची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला निघाली. मुलीच्या आग्रहाखातर मालाडला पॉश कॉम्लेक्समध्ये भाड्याने जागा घेतली. 36 मजल्याचे तीन टॉवर. नवीनच होती. त्यामुळे कमी लोक शिफ्ट झाली होती.
सकाळी फिरून येताना एक मुलगा गाडी पुसत होता. सुरेश …. बहुतेक यूपीचा असावा. त्याला म्हटले “ माझी गाडी पुसशील का ?” तो हो म्हणाला.
“पैसे किती घेशील ?”
तो …”. तुम्ही द्याल ते.” … अश्या वेळेस आपण नेहमी जास्तच देतो.
आता खूप लोक शिफ्ट होऊ लागली. गाड्याही वाढल्या. गाडी पुसणारी खूप मुले दिसू लागली.
सुरेशला म्हणालो… “ तुला कॉम्पिटिशन वाढली. ”
तो म्हणाला “ नाही, ही मुले मीच आणली, मीच कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ह्यांना पगार देतो. ”
त्या भागात कबुतरे जास्त होती. एक दिवस एक कबुतर गॅलरीत मरून पडले. काय करावे कळेना. शेवटी सुरेशला बोलावले. त्याने ते उचलून नेले. दुसऱ्या दिवशी तो जाळी लावणाऱ्या माणसाला घेऊन आला. जाळी लावून घेतली
US ला जाताना वरून बॅग्स काढणे, आल्यावर परत वर ठेवणे … सर्व सुरेश करत होता. पंखे पुसणे, काचा पुसणे ही कामे त्याचीच झाली. मला फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरु झाला. ड्रायविंग जमेना. एक दिवस सुरेशला म्हणालो.. “ ड्राइवर शोध “.. त्याने खिशातून काढून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले, मग तो वेळ असेल तेव्हा माझा ड्राइवर झाला. सकाळी एका माणसाला घेऊन आला…
“साहेब… हा चांगला मसाज करतो. आपल्या बिल्डिंग मध्ये बऱ्याच जणांकडे करतो, चांगला आहे.”
एक दिवस फिरून येताना गेटसमोर भाजीची गाडी दिसली. घरी आलो तर घरात भाजीची पिशवी.
बायको म्हणाली सुरेशने आणून दिली. त्याच्या भावानेच ती गाडी लावली आहे.
पार्ल्याची जागा तयार झाली. सुरेशला म्हटले “ घर साफ करायला चल “… गाडी तोच चालवत होता.
मी …” सुरेश काय नवीन ?”
सुरेश …”.. चायनीज फूडची गाडी टाकतोय … रात्री 11 ते 2 म्युनिसिपालिटी, पोलीस सर्वांची सोय केली आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये एक पोलिटिकल लीडर राहतो.. त्याने मदत केलीये. साहेब एक सांगू..
ये बम्बई शहरमे कुछ सपने लेके आया हुं, वो पुरे करकेही रहुंगा…. माझे प्रिंसिपल एकच… कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही … “
मध्ये 1 -2 वर्ष गेली. मुलगी US हुन येणार होती. बायको म्हणाली घर साफ करून घ्या. चांगल्या प्रोफेशनल लोकांकडून. मग गूगल सर्च करून एका प्रोफेशनल क्लीनर्सला फोन केला. काम आणि रेट ठरला. दुसऱ्या दिवशी बेल वाजली. दोन मुले मस्त युनिफॉर्म मध्ये आली. मला धक्काच बसला …. त्यातला एक सुरेश होता.
सुरेश…” साहेब ही माझीच कंपनी. मीच फॉर्म केली आहे. काम वाटताना तुमचा पत्ता बघितला म्हणून मी स्वतः च आलो. कामाची सवय मोडायची नाही …”
मला त्याचे शब्द आठवले …. “ सपने पूरे करकेही रहूँगा…. ”
मला त्याचे स्वप्न पुरे होताना दिसू लागले….
नाहीतर आम्ही मुंबईकर… भूमिपुत्र… आमची स्वप्नं तरी काय …
- ते 5 नोकरी….
ट्रेन मध्ये बसायला चवथी सीट.. फार फार तर विंडो सीट
नाहीतर
एखादी वडा पावची गाडी…
☆
लेखक : रवींद्र भुरे
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈