श्री मेघ:श्याम सोनावणे
🌸 जीवनरंग 🌸
☆ शब्देविण संवादू… सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
“अवंती, छान झाली आहे ग भाजी. मी ना या भाजीला जिरं व मिरची वाटून घालते. ” अलकाताई सुनेला म्हणाल्या.
जेवण संपवून जरा पडावं म्हणून त्या आपल्या खोलीत गेल्या.. तेवढ्यात त्यांचा मुलगा अनिकेत खोलीत आला. “आई, तू भाजीला काय घालतेस हे तिला सांगत जाऊ नको. तिचं करणं तुला आवडत नाही म्हणून तू दरवेळी काहीतरी शिकवत बसतेस असं तिला वाटतं. तुझा हेतू चांगला असतो ग.. पण तिला ती टीका वाटते. त्यापेक्षा बोलूच नको ना!.. बरं डुलकी काढ आता!” म्हणून तो बाहेर गेला.
आता कुठली डुलकी? कॅालेजात मराठी शिकवण्यात आयुष्य गेलं. पण आता शब्द आपल्याला साथ देत नाहीत? प्रशंसा देखील टीका वाटते?.. त्यापेक्षा बोलूच नको? काय बोलायचं आणि कसं बोलायचं ही कसरत होऊन बसली होती.
अलिकडे हे अवंतीचं काय पण अनिकेत बरोबर सुध्दा सारखं घडत होतं. साधं काही बोलायला जावं अन् ते शब्द मुलांना टोचावेत. आम्हाला नाही का कळत असं वाटावं..
बावीस वर्षाची अलका सासरी गेली तेव्हा आईनं सांगितलं होतं, “शिकून घे हं सगळं सासुबाईंकडून. हुशार आहेत त्या!
मोठ्यांकडून शिकायचं ही मानसिकता आईच्या त्या एका वाक्याने बनली होती पण हल्ली ‘फट म्हणता ब्रम्हहत्या’ अशी तऱ्हा होऊन बसली आहे.. मुलं सर्वज्ञ झाली आहेत.. दोन दोन डिग्र्या असतात.. भरपूर पैसा मिळवतात आणि ते गुगल आहेच अडीअडचणीला! AI पण आहे.. माणसं हवीत कशाला? पण गुगलला अनुभवाची जोड असते का? आईचं प्रेम असतं का आणि गुगल सांगेल ते सगळं खरं असतं का?
त्यांनी एक निःश्वास टाकला.. तेवढ्यात लेकीचा फोन आला.. ”आई, मी व केदार सुटं रहायचं म्हणतो आहोत. अगं मुलांना रागावले ना की आई निष्कारण मधे पडतात. ‘नको गं तिला रागवू.. अगं मुलं आहेत ते.. चुकायचचं’ असलं बोलतात. मग मुलांना काय!” लेक भडाभडा मनातलं सारं बोलून मोकळी झाली.
“नंतर करते फोन.. पडली आहे जरा.. ” म्हणून त्यांनी फोन बंद केला. आपल्या सासुबाई काही म्हणाल्या तर ब्र काढायची हिंमत नव्हती कुणाची! वडिलधारे आपल्या हिताचंच सांगणार ही भावना असे त्या काळात!
बाहेर कामाची बाई शैला जोरजोरात अवंतीला म्हणत होती, ”वैनी, नवरा लई भांडतो.. नकोसं करतुया.. डोकं फिरवतो.. म्हणून कामात लक्ष लागत नाही माजं.. अन् मग तुमी ओरडता मला सारखं. ”
एक शब्दावर शब्द आपटत होते. लहान मोठ्यांना दुखवत होते. अर्थाचा अनर्थ होत होता. म्हणायचं होतं एक आणि होत होतं भलतचं. ईश्वरानं केवळ माणसाच्या हातात शब्द दिले. साधे शब्द, गोड शब्द, कटू शब्द, शीतल शब्द, उग्र शब्द..
केवढं सामर्थ्य असतं शब्दात! रडणाऱ्याचे अश्रू थांबवण्याचं.. दोन देशातील युध्दं मिटवण्याचं.. ईश्वराजवळ पोचण्याचं! शब्द, अक्षर ब्रम्हाची महती कधी समजते का माणसाला. विद्यार्थ्यांना शब्दब्रम्ह शिकवताना किती बारकावे सांगत असू आपण.. समर्थ दासबोधात म्हणतात..
पहिले ते शब्दब्रम्ह । दुजे मीतिकाक्षर ब्रम्ह ।
तिसरे खंब्रम्ह । बोलिली श्रुती ॥
शब्द बोलून झाला की त्याचं अस्तित्व संपतं.. भात्यातून सुटलेला बाण व मुखातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणून तर विचार करून शब्द वापरा हे शिकवलं आपण पण आता आपल्याच शब्दांनी अवंती का दुखावते? काय चुकतंय माझं?
तेवढ्यात त्यांना यजमानांचा फोन आला. “अगं, नामदेव सिरिअस झालाय. मला घरी यायला उशीर होईल. ”
त्यांचे यजमान डॅा. लेले एक उत्तम डॅाक्टर होते. सारं आयुष्य सेवेला वाहून घेतलेले.. चाळीशीतला नामदेव त्यांच्याच घरी काम करत होता पण अचानक त्याची तब्ब्येत खालावली. त्यांच्याच हॅास्पिटल मध्ये ॲडमिट झाला. ह्रुदयाचा आजार होता.. केस कठीण आहे असं डॅाक्टर सांगत होतेच..
त्या एकदम उठल्या व केस विंचरून, साडी सरळ करून तयार झाल्या. “अनिकेत, मी नामदेवला बघून येते. ” एवढं एकच वाक्य बोलल्या व घाईनं बाहेर पडल्या. वर्क फ्रॅाम होम दोघांचं चालू असतं. ते चालू असताना काही बोललं तर तिकडून नको आरडाओरडा! त्यांनी थोडी फळं विकत घेतली व त्या हॅास्पिटलमधे पोचल्या.
अनेक नळ्या जोडलेला नामदेव त्यांना बघून क्षीण हसला. षड्-रिपू नी गांजून गेलेल्या जीवाला अंतकाळी तरी समजत असेल का की ती सारी धडपड व्यर्थ होती. होतं महत्वाचं फक्त ईश्वराशी जोडलेलं नातं, सत्कर्म व सदाचार!
आजूबाजूला त्याचे आई, वडील, बायको व पंधरा वर्षाचा मुलगा उभे होते… उसनं अवसान आणून.. अलकाताईनी नामदेवचा हात हातात घेतला. त्यानं डोळ्यानीच नमस्कार केला. तो आजारी पडला तेव्हा “तुझ्या कुटूंबाची आम्ही काळजी घेऊ” हे अलकाताईंचं वाक्य त्याला नक्की आठवलं असेल..
.. डॅाक्टर लेले आले. त्यांनी परत एकदा नामदेवचा चार्ट बघितला. त्यांनी त्याच्या वडीलांच्या खांद्यावर हात ठेवला व थोपटले. त्यांनी डॅाक्टरांकडे बघत हात जोडले. डॅाक्टरनी नामदेवच्या पंधरा वर्षाच्या मुलाला जवळ घेतले आणि त्याच्या केसातून हात फिरवला. नामदेवाजवळ जाऊन त्याच्या कपाळावर हात फिरवला व ते बाहेर गेले… नामदेवचे डोळे मिटले होते.. तरी डॅाक्टरांच्या स्पर्शाने त्याचा चेहरा शांत झाला असे सर्वांना वाटले..
अलकाताई पण बाहेर आल्या.. डॅाक्टरनी चष्मा काढून डोळे पुसले व ते दोघे हळूहळू चालत त्यांच्या ॲाफिसकडे जात असतानाच नामदेवची नर्स धावत आली व तिने डॅाक्टरांकडे बघत.. ‘नाही.. ‘ अशी मान हलवली.. नामदेव आता नाही हे कळल्यावर त्या तिघांचे अश्रू गालावर ओघळले..
अलकाताई घरी आल्या. नामदेवाच्या यातना संपल्या म्हणून एका प्रकारची शांती वाटत होती पण त्याच्या खोलीत घडलेल्या शब्देविण संवादातलं सामर्थ्य त्या परत परत अनुभवत होत्या. एका शब्दाशिवाय नामदेवला ‘आम्ही आहोत तुझ्या बरोबर’ सांगितलं गेलं. त्याच्या आई वडीलांना व मुलांना डॅाक्टरनी “माझ्या हातात जे होतं ते मी केलय.. आता परमेश्वराची ईच्छा” सांगितलं.. त्या खोलीत ज्याला जे म्हणायचं होतं ते शब्दाशिवाय प्रत्येकाला समजलं होतं.. नामदेवला सुध्दा! शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले..
तान्ह्या बाळाला काय हवं ते आईला कसं समजतं.. आणि ईश्वर भेटीची आस ज्याला लागली तो ईश्वरापाशी शब्दाविना कसा पोचू शकतो.. केवढी प्रचंड शक्ती आहे या शब्देविण संवादात!
अवंती चहा घेऊन आली. त्या काही न बोलता चहा घेऊन खोलीत गेल्या.. त्या आठवड्यात चाललेलं मनातलं द्वंद्व काही वेगळच होतं. घरात बोलायचं का नाही? बोलताना आपला हेतू चांगला आहे हे आपल्याला व त्या देव्हाऱ्यातल्या गजाननाला माहित असल्याशी कारण.. मग इतर काही का म्हणेनात!
.. का शब्देविण संवाद करायचा?
काही दिवस विचार केल्यावर अलकाताईंनी एक निर्णय घेतला.. कमीत कमी शब्द वापरण्याचा.. शब्दाचा अर्थ बदलणार नाही असे अगदी जरूरीपुरते लागणारे शब्द बोलण्याचा. उत्स्फुर्तपणे काही प्रेमानं सांगणं हे अपात्री दान आहे इथे हे लक्षात घेऊन..
भरभरून बोलण्याची उर्मी आरत्या, श्लोक, कविता, लेख चार मैत्रीणींना किंवा खाली राहणाऱ्या दहावीतल्या आर्याला शिकवताना पूर्ण होत असे.. आर्या हुशार होती. मराठीमध्ये
मार्क पडत नाहीत म्हणून काही विचारायला येत असे! आता त्यांनी तिच्या शिकवणीची वेळच ठरवली होती..
अमेरिकेत राहणाऱ्या जीवश्चकंठश्च मैत्रीणीला एक दिवस फोन करत असतं.. ज्यादिवशी मुलं मिटींग करायला आठवड्यातून एकदा ऑफिस मधे जात.. डॉक्टर कामावर असत तेव्हा.. मन हलकं होऊन जात असे.
लेकीला फोन करून म्हणाल्या होत्या, “जरूर रहा सुटे. दोघींनाही मोकळा श्वास घेता येईल.. ” लेक आश्चर्याने ऐकतच राहिली..
हॅाल मध्ये अवंती अनिकेतला म्हणत होती, “अरे, हल्ली आई काही बोलतच नाहीत. नामदेव गेल्या त्यातून बाहेर पडल्या नाहीत वाटतं”.
डॅाक्टर व अलकाताईंना त्यांच्या खोलीत हा संवाद ऐकू आला.. ते एकमेकांकडे बघून हसले.. दोघांना अगदी पक्कं समजलं एकमेकांच्या मनात काय चाललं होतं ते.. शब्देविण संवादु यापूर्वीच करायला हवा होता असं दोघांच्या मनात आलं व ते एकदम खळखळून हसले!!
शब्देंविण संवादु। दुजेंवीण अनुवादु॥
हें तंव कैसेंनि गमे।परेहि परतें बोलणे खुंटले॥
आयुष्यभर शब्द वापरून मराठी शिकवणाऱ्या अलकाताईंना आता शब्द या माघ्यमाची गरज उरली नव्हती! आयुष्यात सतत काहीतरी नवीन शिकावं म्हणतात.. ते घडून आलं होतं अवंतीमुळे! अनिकेत मुळे!
अवंती अनिकेतचे मनोमन मानलेले आभार त्यांच्यापर्यंत पोचू देत अशी त्यांनी शब्दब्रम्हाला विनंती केली आणि पांडुरंग कांती.. या अभंग मैत्रीणींना शिकवण्यासाठी त्या सज्ज झाल्या!
लेखिका : सुश्री ज्योती रानडे.
प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈