श्री मोहन निमोणकर
☆ “अन्नसंस्कार — सर्वांना उत्तम अन्न मिळावे…” – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
आमची आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. तिच्या खेडोपाडी बदल्या व्हायच्या. मग माझे वडील त्या गावात जास्तीत जास्त चांगले घर भाड्याने मिळवायचे आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचे. वडिलांची जिल्हा बदली व्हायची आणि आईची गावागावात. त्यामुळे आम्ही सगळे फक्त शनिवारी रविवारी एकत्र यायचो.
ज्या गावात राहत आहोत त्या गावातल्या चांगल्या दुकानात आई किराणाचे खाते काढायची. एक दोनशे पानी वही केलेली असायची. तिला आम्ही किराणा वही असे म्हणायचो. किराणा वहीच्या सुरुवातीच्या पानावर आईचे नाव पत्ता लिहिलेला असायचा. फोन नसल्यामुळे फोन नंबरचा प्रश्नच येत नव्हता. पहिल्या पानावर ||श्री|| असे लिहून खाली क्रमवार किराणाची यादी केली जायची. महिन्याचा किराणा एकदम भरण्याची पद्धत होती. त्यानंतर एखादी गोष्ट संपली तर पुन्हा वहीत लिहून सामान आणावे लागायचे.
आणलेल्या सामानासमोर त्याची किंमत लिहून त्याखाली त्याची टोटल मारून किराणा दुकानदार सही करायचा. दर महिन्याला पगार झाला की आई त्याचे बिल चुकते करायची. घरोघरी अशा किराणा वह्या असायच्या आणि किराणा भरायची हीच पद्धत होती. दर महिन्याला किराणाच्या पिशव्या घरी आल्यानंतर आई त्या स्वच्छ जागी ठेवायची. त्याच्या भोवती पाणी फिरवून हळदीकुंकू वाहायची आणि नंतर सामान डब्यात भरले जायचे. दर महिन्याला डबे घासून सामान भरायची पद्धत होती. आम्ही भावंडे किराणा सामानातले कपड्याचे आणि अंगाचे साबण काढून त्याची गाडी गाडी खेळायचो. साबण रॅकमध्ये जाईपर्यंत हा खेळ सुरू राहायचा.
थोडक्यात किराणा आणणे हा सुखकारक सोहळा असायचा. यादी लिहिण्यापासून ते सामान डब्यात जाईपर्यंत शेंगदाणे मुरमुरे गूळ खोबरे मनसोक्त तोंडात टाकायला मिळायचे.
आई जेव्हा किराणाच्या पिशव्यांची पूजा करून हात जोडायची त्यावेळी मी सुद्धा तिच्याबरोबर हात जोडायची. आईच्या चेहऱ्यावर कृतार्थ भाव दिसायचा. कष्टाने मिळविलेल्या अन्नाचा सन्मान करणे आणि त्याला सांभाळून वापरणे हा साधासुधा संस्कार होता. बोधीच्या जन्मानंतर किराणा भरल्यावर मी पूजा करताना छोटा बोधी पण हात जोडायचा आणि डोके जमिनीवर टेकवून पिशव्यांना नमस्कार करायचा. त्यानंतर तोही सामानातले साबण काढून गाडी-गाडी खेळायचा….
अन्न ही मनुष्याची मूलभूत गरज आहे. अन्न मिळाल्यानंतर मनुष्याला आनंद होणे साहजिक आहे. अन्न जेव्हा कष्ट केल्यावर मिळते तेव्हा सात्विक आनंद होतो. तृप्तता मिळते. जेव्हा अन्न भ्रष्टाचाराने किंवा अयोग्य मार्गाने किंवा एखाद्याला लुटून मिळते तेव्हा ते अन्न आरोग्य आणि शांतता देऊ शकत नाही.
दुसऱ्यावर अन्याय करून किंवा भ्रष्टाचाराने मिळवलेले अन्न खाल्ल्यानंतर अन्नदोष निर्माण होतो. असे अन्न रोग आणि मानसिक त्रास निर्माण करते. कलह आणि लसलस निर्माण करते. असले अन्न खाताना संपूर्ण घरदार एकमेकाकडे चोरटेपणाने किंवा संशयितासारखे पाहत असते.
आपण अन्न तयार केल्यानंतर त्यातले चार घास दुसऱ्याला देण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते. भुकेल्याच्या मुखात चार घास दिले तर घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. म्हणून भारतीय दर्शनात अन्नदानाला फार महत्त्व दिले गेले आहे. अन्नदान तुमच्यातली दुसऱ्याची भूक जाणण्याची क्षमता विकसित करते. तुम्हाला माणूस म्हणून जगायला मदत करते.
लॉकडाऊन च्या काळात तर लोकांना किराणा सामानाचे महत्त्व फारच पटले. त्याकाळी भीतीपोटी लोक दुप्पट किराणा भरू लागले. किराणा दुकान उघडल्याबरोबर पटकन सामान आणून ठेवू लागले. गरजूंना गावोगावी किराणाचे किट वाटले गेले. खरोखरच किराणा सामानाला आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. महिन्याचा किराणा एकदम घरात येणे हे संसारातले फार मोठे सुख आहे. दिवाणखान्यातले महागडे डेकोरेशन किंवा भारी-भारी शोभेच्या वस्तू हे घराचे सौंदर्य नसून, गहू, तांदूळ, साखर, डाळींनी भरलेले डबे हे घराचे खरे सौंदर्य आहे.
घरात शिधा भरलेला असला तरच कुठलीही बाई शांत चित्ताने राहू शकते. अन्नाची विवंचना संपल्याशिवाय कुठल्याही स्त्रीचे मन स्थिर होऊ शकत नाही. आपल्याला कोणी अन्न दिल्यानंतर आपण हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आभार मानले पाहिजेत
दिलेल्या अन्नाचा कृतज्ञतेने स्वीकार करावा कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते तुमचा पिंड पोसते. अन्न फक्त रक्त धातू मांस मज्जा इतकेच निर्माण करते असे नाही तर भावना आणि विचारसुद्धा अन्नातूनच निर्माण होतात. हे अन्नाला पूर्णब्रह्म मानण्यामागचे खरे कारण आहे. म्हणूनच सात्विक अन्न खाल्ल्यानंतर मिळणारी तृप्ती आणि शांतता याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही.
अन्न बाह्यस्वरूपी निर्जीव दिसत असले तरी ते शरीरात गेल्यानंतर ऊर्जा निर्माण करते. अन्नामध्ये पोटेन्शिअल एनर्जीचा मोठा साठा असतो. जिवंत शरीरात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याची अन्नात क्षमता असते. अन्न जेव्हा बीज रूपात असते आणि मातीत पेरले जाते त्यावेळी ते पुन्हा नवीन अन्नाची निर्मिती करण्याइतके सक्षम असते.
अन्न हे पूर्णब्रह्म हे अगदी खरे आहे
लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.
प्रस्तुती : मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈