श्री सुनील देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ “आपला कावळा होऊ देऊ नका…” लेखक / कवी : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
सकाळी सकाळीच माय माझी मह्यावर खेककली. मले म्हणाली.. “आरं पोरा उठ… तयारी कर..
आज पितरपाठ हाय.. तुह्या बापाले जेवू घालायचं की नाय ?
आवरून घे लवकर म्या निवद बनवून ठेवला हाय
तुले बाजारात जाऊन दारू अन बिडीचा बंडल आणायचा हाय”
म्या मायेला म्हणालो,
“आये सारी जिंदगी तू मह्या बापाले दारू पितो म्हणून कोसत होती,
त्या दारूपाई मव्हा बाप मेला तू ऊर पटकून रडत होती
दारुले तू तर अवदसा सवत म्हणत होती अन बिडीच्या वासाने तुले मळमळ होत होती
मग काहून बाप मव्हा मेल्यावर असे थेरं करती”
तर माय मले म्हणाली,
“लेका जनरीत हाय धर्मानुसार चालावं लागतं
असं केलं तरच तुह्या बापाच्या अत्म्याले शांती भेटत
आता लवकर ताट पत्र्यावर ठेव कावकाव करून कावळ्याला बोलवं
कावळ्याने निवद शिवला समज मग तुहा बाप जेवला”
म्या गप्पगुमान ताट छतावर ठेवलं.. कावकाव करत बसून राहिलो
तासाभराने एक कावळा आला निवदावर तुटून पडला
म्यायने मह्याकडं म्या मायकडं पाहिलं मायने हुश्शsss करत श्वास सोडला
.. तसा दुसरा कावळा आला निवदावर तुटून पडला
तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला
म्हणता म्हणता बरेच कावळे जमा झाले
म्या मायले म्हंटले
“वं माय महे इतके बाप ? तू काहून नही मले सांगितले ? नेमकं यातला मव्हा बाप कोणता? “
माय मही गप्प होती तितक्यात ते कावळे दुसऱ्याच्या, तिसऱ्याच्या तटावर बसले
म्या परत मायले म्हणालो
“आये मह्या बापाचे इतके लफडे त्वां कसे सहन केले? “… माय गप्पच होती
मग मी मायला म्हणालो,
” आये जित्यापणी माणसाला पोटभर खाऊ घालावं
मेलेला माणूस खात नाही
स्वर्ग नरक आत्मा कुणी पाहिला?
कुणीच छातीठोकपणे सांगत नाही… “
” अगं आये… घरासाठी राबवताना बाप मव्हा बैल व्हायचा…
नाईन्टी मारल्यावर बाप मव्हा रफी किशोर होऊन गायाचा…
संकटात बाप मव्हा वाघ होऊन लढाचा…
आनंदात बाप मोरा सारखा नाचायचा…
घरखर्च प्रपंच चालवताना, धूर्त कोल्हा बाप व्हायचा..
अन मेल्यावर बाप मव्हा कावळा झाला ? “
हा प्रश्न डोक्याला नाही झेपायचा…
” अग जित्या माणसाला जातीत विभागणारा धर्म
मेल्यावर एकाच पक्ष्याच्या जातीत कसा घालतो? ”
” जसं जातीजातीत माणसे विभागली तशी मेल्यावर ही व्हायला हवी
इथल्या धर्माच्या चार वर्णाप्रमाणे माणूस मेल्यावर ही चार वर्णात हवा…
…. बामनाचा बाप मोर राजहंस..
…. क्षत्रियांचा बाप गरुड घार…
…. वैश्याचा बाप घुबड…
…. अन शूद्राचा बाप कावळा व्हावा?
पण माय सारच उलट हाय
जित्यापणी जातीत भेदभाव करणारे मेल्यावर मात्र एकच.. कावळे होतात ?
अन आपल्यासारख्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली बावळे करता ?
….. माय माणूस मेल्यावर राख अन माती होती
उरते फक्त सत्कर्म…
हेच खरे जीवनाचे मर्म…
बाकी सर्व झूठ धर्म
जित्याला पोटभर खाऊ घालू.. पितरपाठाचे यापुढे नको काढू नाव
आता सत्यशोधक होऊ … नको उगाच कावकाव……..
नाती जिवंतपणीच सांभाळा …. नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही…..
आपला कावळा होऊ देऊ नका…
आपला कावळा होऊ देऊ नका……
☆
(फारच सुंदर अंतर्मुख करणारा विचार! लेखकाला शतशः प्रणाम भाषा पण छान गावरान.)
कवी / लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈