सौ राधिका भांडारकर
☆ माझी जडणघडण… भाग – १४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
“गणपती १”
आमच्या घरी तांदुळाचा गणपती असे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रभात समयी सुस्नात होऊन पप्पा सुंदर, जांभळ्या रंगाचा कद नेसून गणपती पूजनासाठी बसत. एका गोष्टीचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं ते म्हणजे पप्पांच्या व्यक्तिमत्त्वात आढळणाऱ्या विसंगतीचं. कर्मकांडं, पूजाअर्चा यावर पप्पांचा विश्वास नव्हता की ते त्यावर विसंबूनच नव्हते हे मला कळलं नाही पण गणपती म्हणजे बुद्धी देवता, विद्येची आराध्यदेवता. बाकी गणपतीची विघ्नहर्ता, सुखकर्ता वगैरे विशेषणे कदाचित पप्पांसाठी म्हणजे त्यांच्या वैचारिक बैठकीसाठी तितकीशी महत्त्वाची नसतील पण विद्येची देवता म्हणून गणपती या दैवता विषयी त्यांना अपरंपार प्रेम होतं आणि त्याच भावनेतून आमच्या घरी गणपती पूजन फार सुंदर पद्धतीने होत असे.
आई चौरंगाखाली सुरेख रांगोळी रेखायची आणि सागवानी पाटावर बसून चौरंगावर तांदूळ पसरून पप्पा त्यातून सोंडवाला, मुकुटधारी, लंबोदर, चतुर्भुज गणेश साकारत. पायाशी तांदळाचा मूषक, भोवती झेंडूच्या गेंदेदार फुलांची चौकट, कापूर उदबत्तीचा सुवास आणि आम्ही सगळेजण पप्पांच्या डाव्या उजव्या हाताशी मनोभावे हात जोडून, त्यांच्या सुरेल स्वरात गायलेली गणपतीची कहाणी ऐकत असू.
।। सिद्धगणेश सिद्धंकार
मनीच्छले मोत्येहार
सोन्याची काडी रुप्याची माडी
तेथे सिद्धगणेश राज्य करी
राजामागे राज
राणीमागे सौभाग
निपुत्राला पुत्र
आंधळ्याला नेत्र
त्यांनी वाहिली सोन्याची काडी
आम्ही वाहू दुर्वांची पत्री
त्यांना प्रसन्न झालात
तसे आम्हाला व्हा ।।
तीन पदरी सूत्रात एकेक दुर्वांची जुडी गुंफत २१ वेळा पप्पा ही कहाणी सांगत आणि मग २१ दुर्वांच्या जुडीची ही माळ गणपतीला वाहत.
त्यानंतर आरती, “घालीन लोटांगण” “मंत्रपुष्पांजली” आणि डोळे मिटून, नाकावर हात ठेवून, प्रणव मुद्रेत अर्पण केलेला पांढराशुभ्र, कळीदार २१ मोदकांचा, चांदीच्या ताटातला सुरेख सुगंधी नैवेद्य !
ॐ प्राणाय स्वाहा
ॐ अपानाय स्वाहा
ॐ उदानाय स्वाहा
ॐ व्यानाय स्वाहा
ॐ ओम समानाय स्वाहा
ॐ ब्रह्मणे नमः
अशा रितीने गणपती पूजन झाल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्नता जाणवायची. कापूर, उदबत्तीच्या सुगंधात, सुग्रास स्वयंपाकाच्या मधुर वासात घर दरवळलेलं असायचं.
खरं म्हणजे आमची संपूर्ण गल्लीच गणेशमय झालेली असायची. घरोघरी यथाशक्ती, यथामती गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची. सण सोहळ्यातला सामुदायिक आनंद, सार्वजनिकतेचं महत्त्व आम्ही लहानपणी खऱ्या अर्थाने अनुभवलं असं म्हणायला हरकत नाही. गल्लीत गजाचा गणपती, सलाग्र्यांचा गणपती, दिघ्यांचा गणपती जसा मूर्ती सजावटीसाठी प्रसिद्ध होता तसाच मुल्हेरकरांचा गणपती म्हणजे आम्हाला आमच्याच घरचा गणपती वाटायचा. अगदी तेव्हापासून आजपर्यंत. मुल्हेरकरांच्या गणपती सजावटीत आम्हा सर्व सवंगड्यांचा हातभार लागायचा पण या कार्यक्रमातला प्रमुख अध्यक्ष म्हणजे दिलीप मुल्हेरकर. दिलीप हा सर्वच बाबतीत गल्लीतला एक अनभिषिक्त लीडर होताच. तो एक उत्तम कलाकार होता, उत्तम क्रीडापटू होता. क्रिकेट कसे खेळावे ते आम्ही त्याच्याकडूनच शिकायचो. तो जितका संवेदनशील होता तितकाच तापट होता. खरं म्हणजे माझ्यापेक्षा तो लहान होता पण कलेच्या क्षेत्रात सगळ्यांनीच त्याचे मोठेपण मान्य केले होते त्यामुळे गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या सामानापासून ते मखर बनवण्यापर्यंत तो जे जे सांगेल ते ते आम्ही त्याला मदत म्हणून, गंमत म्हणून करायचो.
टेबलावर छानसा रेशमाने भरलेला टेबलक्लॉथ टाकायचा, त्याच्या चारी बाजू कलात्मक रित्या दुमडून त्यावर बनवलेलं पुट्ठ्यांचं, रंगीत चकाकणार्या पेपर वेष्टनातलं, टिकल्यांनी सजवलेलं मस्त मखर ठेवायचं. मागे, बाजूला दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा सोडायच्या. खरं म्हणजे गणपतीच्या मखराच्या या तयारी पासूनच आमच्या अंगात गणेशोत्सवाचा उत्साह भरायचा. मग सकाळी टाळ, झांजा घेऊन आग्यारी लेनमध्ये एका तात्पुरत्या मंडपात विक्रीसाठी मांडलेल्या, कोकणातल्याच एका खास मूर्तिकाराकडची (मला त्यांचं नाव आता आठवत नाही) सुंदर, मध्यम आकाराची देखणी, प्रसन्न गणेशाची मंगलमूर्ती— आम्ही त्यावर विणलेला एखादा रुमाल टाकून घरी घेवून येत असू. दिलीप, चित्रा, संध्या, बेबी, सुरेश, अशोक, बंडू आणि आमचा गल्लीतला बालचमू मिळून गणपतीची थाटात मिरवणूक असायची. गणेश आगमनाच्या स्वागताची मिरवणूक. पुन्हा चालताना….
पायी हळूहळू चाला
मुखाने मोरया बोला…
गणपती बाप्पा मोरया… अशी झांजा वाजवत ही आनंद गीते मुक्तपणे गात आम्ही आमच्या या आवडत्या गणेश पाहुण्याला घरी आणत असू. उंबरठ्यात ओवाळायचे, चारी दिशांना पाणी सोडायचे, गुळखोबरं ओवाळून नजर उतरवायची आणि मखरात बसवायचे. एखाद्या विमानतळावरून नाही का आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला रिसिव्ह करत ? अगदी तीच भावना आमच्या मनी या गजाननासाठी असायची.
आमचा स्वतःचा घरचा गणपती दीड दिवसाचा असायचा. त्यानंतर गौरीपूजन मात्र असायचे पण मुल्हेरकरांच्या गणपतीचे विसर्जन गौरीबरोबर व्हायचे म्हणजे कधी पाच दिवस तर कधी सात दिवस. आरत्यांचा गजर चालायचा, जवळजवळ गल्लीत सगळ्यांच्याच घरी आम्ही आरतीला जात असू आणि सहजपणेच प्रत्येक घरी आरतीच्या वेळाही ठरत.
मुल्हेरकरांकडे गायलेल्या आरत्या आजही माझ्या कानात आहेत. दिलीप तबला, ढोल, पेटीची व्यवस्था करायचा.
येई हो विठ्ठले माझे माऊली ये म्हणताना लागलेला सूर आत मध्ये काहीतरी उचंबळून टाकायचा.
रखमाई वल्लभ्भा राईच्या वल्लभ्भा म्हणताना पडलेली ती तबल्यावरची थाप कशी वर्णन करू ? आणि दशावताराची आरती म्हणताना तर कंठ भरून जायचा.
रसातळाशी जाता पृथ्वी पाठीवर घेसी
परोपकारासाठी देवा कासव झालासी
देवा कासव झालासी
शब्दाशब्दांचा सूर लांबून केलेला उच्चार आणि पेटीच्या संगतीत म्हटलेल्या त्या सुरेख आरत्या म्हणजे आमच्या जडणघडणीच्या काळातली संस्कार शक्तीपीठे होती.
हरे राम हरे राम राम हरे हरे हे गतिशील नामस्मरण, तितक्याच गतीत वाजत असलेले टाळ आणि झांजा, हे म्हणत असताना स्वतःभोवती मारलेल्या प्रदक्षिणा आणि समोरच्या मखरातील, तबकातल्या निरांजनाच्या प्रकाशात उजळलेली ती हास्यवदना, प्रसन्नदायी, मंगलमूर्ती आजही अंतरीच्या कप्प्यात पावित्र्य आणि मांगल्य घेऊन स्थिरावलेली आहे.
मंत्रपुष्पांजलीने आरतीची सांगता व्हायची, हातात पुष्प पाकळ्या घेऊन, डोळे मिटवून पप्पा सूर लावायचे..
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि.. … त्या एकेका मंत्रोच्चारातला दिव्यपणा कळत नसला तरी जाणवायचा नक्कीच.
आवर्जून सांगते की आमच्या गल्लीत काही मुस्लीम परिवार होते. शरीपा, ईसाक, अब्दुल, बटुबाई, आरतीला भक्तीभावाने हजर रहात. प्रसादभक्षण करत. आमचा गणपती असा सर्वधर्मपरायणी होता.
खरोखरच दरवर्षी येणाऱ्या या दहा दिवसाच्या लाडक्या पाहुण्यांनी नकळत जीवनातली सत्त्वबीजे आमच्यात नक्कीच पेरली. गल्लीतला गजाचा गणपती रात्री बाल्याच्या नृत्याने रंगायचा मध्ये ढोलकी वादक बसलेला असायचा. गायकही असायचा आणि सभोवताली गोलाकार नृत्य करणारे कलाकार असत. त्यांच्या उजव्या पायात चाळ बांधलेले असत आणि *गणा धाव रे गणा पावरे* अशी गणरायाची आळवणी करून नाचायला सुरुवात व्हायची. या नृत्यात काही वैविध्य, सौंदर्य नसायचं. गाणाराही बऱ्याच वेळा भसाड्या आवाजात गायचा.
चांगला ठकडा ठरलाय गो
सोळा सहस्त्र भोगून नारी
ब्रह्मचारी ठरला ग …
असे काही शब्द त्या गाण्यात असायचे. पण या नृत्यातला ठेका आणि लय एक प्रकारे मनात बसायची. नाचणार्यांत एकसंधपणा असायचा. पावलांच्या गतीत एक मेळ असायचा आणि एक प्रकारची लोक संस्कृती, लोकसाहित्य या रुपातून रस्त्यावर अवतरायचं आणि त्यातलं भारीपण कुठेतरी जाणवायचं.
तर असा हा आमचा आठवणीतला गणपती. दरवर्षी भाद्रपद महिन्यात चतुर्थीला येतच असतो पण माझ्या मनातला आजचा आणि तेव्हाचा गणपती वेगळ्या रुपात असतो आणि हो एक गंमत सांगायची राहिली. गणेश चतुर्थीच्या दिवशी “चंद्र पहायचा नाही. पाहिला तर चोरीचा आळ येतो” हे भय बालमनावर इतकं ठासून ठेवलेलं होतं की एक तर त्या दिवशी रात्री बाहेर पडायचंच नाही, नाहीतर रस्त्यात खाली मान घालून चालायचं. कुणीतरी वात्रटपणे म्हणायचे (बहुतेक वेळा ती व्यक्ती मीच असायचे. ) ”ते बघ काय वरती ?” आणि पटकन सगळ्यांनाच वर आकाशात बघायला व्हायचं आणि नेमकी सुंदर चतुर्थीची चंद्रकोर वाकुल्या दाखवत नजरेसमोर यायची पण खरोखरच या दर्शनाने चोरीचे आळ आले का ? कोण जाणे ! पण पुढे आयुष्य जगत असताना ज्या नाना प्रकारच्या ठेचा लागल्या, विनाकारण दोषही लागले, स्वतःचा चांगुलपणा गैरसमजुतीमुळे काळवंडला गेला त्याला हेच कारण असेल का ? गणेश चतुर्थीच्या दिवशी घेतलेले चंद्रदर्शन…?
माहीत नाही. पण या गणरायाने एक समर्थ मन मात्र घडवलं.
— क्रमश: भाग १४
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈