सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

विडा घ्या हो अंबाबाई

‘ठेविले अनंते तैसेची रहावे ‘  अशी  आईची समाधानी, आनंदी वृत्ती होती. हातात कांचेच्या बांगड्या, गळ्यात काळी पोत आणि चेहऱ्यावरचे समाधानी हास्य हेच होते आईचे दागिने आणि वैभव.. शेवटपर्यंत सोने कधी आईच्या अंगाला लागलंच नाही. आई गरीबीशी सामना करणारी, आहे त्यात संसार फुलवणारी होती . नानांच्या पिठाला तिची मिठाची जोड असायची. मसाले करून देणे. सुतकताई, पिंपरीला कारखान्यात काम करायला पण जायची . विद्यार्थ्यांना डबा करून देणे अशी छोटी मोठी कामे करून मिळणारी मिळकत हाच तिचा  महिन्याचा पगार होता. 

माहेरी मोकळ्या हवेत हेलावणारा तिचा पदर सासरी आल्यावर पूर्णपणे बांधला गेला .वेळात वेळ काढून महिला मंडळ, एखादा सिनेमा हाच तिचा विरंगुळा होता. त्यावेळी सिनेमाचे तिकीट 4 आणे होतं. प्रभात टॉकीज मध्ये (म्हणजे आत्ताच कीबे)   माझे काका विठू काका ऑपरेटर होते. त्यांचा आईवर फार जीव.  ते आईला कामात खूप मदत करायचे.  तिला मराठी सिनेमाचे पास आणून द्यायचे. तेवढाच तिच्या शरीराला आणि मनाला विसावा.  

तिचा कामाचा उरक दांडगा होता. घरच्या व्यापातून वेळ काढून घरी पांच पानांचा सुंदरसा गोविंदविडा (हा सुंदरसा विडा करायला माझ्या वडिलांनी तिला शिकवलं होतं.)देवीसाठी तयार करून ती रोज जोगेश्वरीला द्यायची. हा नेम तिचा कधीही चुकला नाही.रात्रीच्या आरतीच्या वेळी तबकामध्ये निरांजनाशेजारी सुबक आकाराचा, पिरॅमिड सारखा गोविंदविडा विराजमान व्हायचा. “विडा घ्या हो अंबाबाई” म्हणून अंबेला  रोज विनवणी  असायची.  एक दिवस कसा कोण जाणे विडा द्यायला उशीर झाला. (गुरव )भाऊ बेंद्रे आणि भक्त विड्याची वाट बघत होते.  तबकात जागा रिकामी आहे हे सगळ्यांनी ओळखलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.  विडा विसरला असं कधीच झालं नव्हतं. विड्याची वाट बघत सगळेजण थांबले होते.  भाऊ बेंद्रे तबक घेऊन उभेच राहयले.भक्त आईची विडा घेऊन येण्याची  वाट बघत होते… 

आणि इतक्यात लगबगीने आई पुढे धावली, विडा देवीपुढे ठेवला गेला. आणि टाळ्यांच्या गजरांत  आरतीचा   सूर मिसळला…              

“विडा घ्या हो अंबाबाई,  ही विनंती तुमच्या पायी.”  

… आई अवघडून गेली. आपल्याकडून उशीर झाला म्हणून आईला अगदी अपराध्यासारखं झालं होतं. तिने देवीपुढे नाक घासले. त्यानंतर कधीही तिचा हा नियम चुकला नाही. आम्ही नंतर पेशवेकालीन मोरोबा दादांच्या वाड्यात राहायला गेलो, तरीसुद्धा आईने हा नियम चालू ठेवला होता. ती म्हणाली, “ जोगेश्वरी आईनी आपल्याला पोटाशी होतं ते पाठीशी घालून तिच्याच परिसरात  तिच्या नजरेसमोरच ठेवलंय.”  कारण मोरोबा दादांचा पेशवेकालीन वाडा जोगेश्वरीच्या  पाठीमागेच…  म्हणजे आप्पाबळवन्त चौकातच होता.

 – क्रमशः भाग ४

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments