सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
विविधा
☆ – जोगवा – ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
आदिशक्ती, आदिमातेच्या उपासनेचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव !
पूर्वी कुटुंब मोठे होती. रोजचा देवाला नैवेद्य, सप्तशती पाठ, आरती’, नऊ दिवस सवाष्ण, रितीप्रमाणे कुमारिका जेवायला असायची. देवापुढे अखंड दिवा तेवत असायचा आरती पूजा पाठ यात सगळं घर रंगून जायचं. नऊ दिवस उपास कधी धान्य फराळ अष्टमीला विशेष असं महत्त्व असायचं आणि सगळ्या घरात वातावरण अगदी पवित्र मंगलमय असायचं.
घरोघरी घटस्थापना असायची. त्याची दसऱ्याला सांगता होऊन ‘दसरा सण मोठा … नाही आनंदा तोटा’ असा दसरा साजरा व्हायचा. अजूनही आपण ही संस्कृती परंपरा जपतो. … देवीला म्हणतो ‘सांभाळून घे आई! चुकलं तर योग्य मार्ग दाखव.’ या आदिशक्तीला आपली संस्कृती स्त्रीरूपात पाहते. आपण तिला माता .. आई .. असं संबोधून पूजा करतो, अन् घरातली ‘स्त्री ‘..ती घरासाठी आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठीच देवीकडे काहीतरी मागणं मांडतेच…. आणि स्वतःसाठी अखंड सौभाग्य !
पण आज स्त्रीला एवढेच मागून चालणार नाही. तिने देवीपुढे हात जोडावे ते तिचा आधार मागण्यासाठी .. प्रार्थना करण्यासाठी, सगळं काही सोसण्याचं बळ मिळवण्यासाठीच नव्हे, तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, अत्याचाराला प्रतिकारशक्ती, लढा देण्याची शक्ती लाभावी यासाठी. तसेच या आदिशक्तीची शक्ती मिळावी यासाठीही.!
त्यामुळे ‘मी- माझ्या पुरतं’ या वर्तुळाचा परीघ वाढवून समाजासाठी, रंजल्या गांजलेल्या स्त्रियांसाठी, तिला काही भरीव वेगळं असं करता येईल. आणि प्रत्येक गोष्टीसाठी इथं तिथं जोगवा मागण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने स्वतः ‘स्त्री ‘ही स्वयंभू शक्तीच व्हावं, म्हणून “वाढ ग माय जोगवा$ ” म्हणत हात जोडून फक्त देवीपुढे ‘जोगवा’ मागावा.! इतर कुणाकडे नाही. आज त्याचीच गरज आहे.
देवी माता नक्कीच हा जोगवा देईल.व खऱ्या अर्थानं हा देवीचा नवरात्रोत्सव व दसरा साजरा करता येईल.
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈