डॉ. जयंत गुजराती

??

इंदरजित सिंह की दुकान  ☆ डॉ. जयंत गुजराती

गेली तीस वर्षे मी हेच नाव वाचत आलोय, इंदरजित सिंह की दुकान, मोठ्या ठळक अक्षरात ते लिहीलेले. दुकानावरच्या पत्र्याला गंज चढलाय, पण त्यावरील अक्षरे अजूनही मिरवतात स्वतःला ठळकपणे. दुकानाच्या मालकाने स्वतःचेच नाव दिलंय दुकानाला त्याचं अप्रूप नवख्यांना बरेच दिवस पुरतं, मात्र एकदा दुकानाची सवय झाली की तो दुकानाच्या प्रेमातच पडतो.

काय नसतं या इंदरजितच्या दुकानात? रोजच्या वापरातील वस्तुंचा खचच पडलाय म्हणाना! शाळेत जाणाऱ्या मुलाने खोडरब्बर मागितलं तर मिळेल. घरातील बल्ब उडालाय तर तोही मिळेल. कुणा षौकिनाने टाय मागितली की तीही हजर. स्त्रियांच्या मेकप सामानाचे तर ते माहेरघरच. मागाल ते मिळेल ही पाटीच दर्शनी भागात! दुकान तसं छोटंसंच. पण कॉलनींच्या नाक्यावरचं. होय, तीन कॉलनी एकत्र होतील अशा हमरस्त्यावरचं दुकान. लंबचौरस आत आत जाणारं. दुकानात शॉकेसेसची भरमार, शिवाय लहानमोठे कप्पेच कप्पे. सगळं ठासून भरलेलं. वरती पोटमाळा. तोही मालाने खचाखच भरलेला. इतकं असूनही इंदरजितने दुकान नीटनेटकं छानपैकी सजवलेलं. काहीही ओबडधोबड, अस्ताव्यस्त वा गबाळं दिसणार नाही. अधिकचा फॅन्सीपणा न करता आकर्षक मांडणी कशी करावी हे इंदरजितकडून शिकावं! गेली तीस वर्षे हे मी पाहत आलोय. इंदरजित एकदा ओळखीचा झाला की त्याला दुकानात पाऊल टाकल्या बरोबर सांगावसं वाटणारच की ‘दिल जीत लिया!’

दुकान उघडलं की सकाळपासून जे त्याचं बोलणं सुरू होतं ते रात्री दुकान वाढवेपर्यंत. तो शिकलेला किती हे आजतागायत कुणालाही ठाऊक नाही पण त्याच्या जीभेवर सरस्वती नाचते हेच खरं! सकाळीस वाहे गुरूची अरदास म्हणत तो दिवसाची सुरूवात करतो व जसजसे गिऱ्हाईक येईल तसा तो खुलत जातो. कोणत्याही वयाचं गिऱ्हाईक येवो, महिला असो, पुरूष असो, मूल असो वा युवा वृद्ध कोणीही, त्याला विषयांचं वावडं नव्हतं. इतक्या गोष्टी होत्या ना त्याच्याकडे. किस्से तर त्याच्या तोंडूनच ऐकावेत इतके मजेशीर असायचे. त्याचं मधाळ बोलणं व हसतमुख चेहेरा हे वेगळंच रसायन होतं.

आलेल्या गिऱ्हाईकांना हातचं जाऊ न देता आपलंसं करण्याचं त्याचं कसब वादातीत. माझ्यासाठी तो इंदर कधी झाला हे मलाही कळलं नाही. दिवसभरात दुकानात जाणं झालं नाही तर संध्याकाळी काही वेळेसाठी का होईना त्याला भेटल्याशिवाय चैन पडत नसे. क्वचित तेही घडायचं नाही तर येताजाता हात उंचावून रस्त्यावरूनच ख्यालीखुशालीची देवघेव होत असे. हे इतकं सवयीचं होऊन गेलं होतं की घरी गेल्यावर बायको हमखास विचारायची, “इंदरला भेटून आलात की नाही?”

फाळणीच्या वेळेस त्याचे वडील आपलं घरदार पाकिस्तानात सोडून नेसत्या वस्त्रानिशी भारतात आले. पंजाबमधे बस्तान बसवलं. मुलं मोठी केली. त्यातला हा इंदरजित. फाळणीची जखम खोलवर वडिलांकडून इंदरजितने उसनवारी वर घेतली. फाळणीचे किस्से ऐकून ऐकूनच लहानाचे मोठे झालो हे तो दर्दभरल्या आवाजात सांगायचा तेव्हा आपलं ही काळीज तुटेल की काय ही भीति वाटायची. पंजाबी, हिंदी उर्दूवर त्याची हुकूमत होती. शेरोशायरी हे जीव की प्राण. जर त्याने दुकानदारी केली नसती तर तो उत्तम कवी लेखक झाला असता इतकी त्याची जाण.

पन्नाशी उलटली पण त्याचा रंगेल व मिश्कील स्वभाव काही बदलला नाही. तसा तो होता मोना शीख. गुरूद्वारात मथ्था टेकण्यासाठी नेहेमीच जात असे. प्रसंगी कारसेवाही करायचा. इंदरजितला जे खरोखर ओळखत होते त्यांना तो कौतुक मिश्रित कोडंच वाटत असे. सकाळीस सश्रद्ध असणारा इंदरजित संध्याकाळ उलटल्यावर शायराना होऊ जायचा, शिवाय पंजाबी असल्याने खाण्यापिण्यात अव्वल. विशेषतः पिण्यात तर खास. कुठला ब्रांड खास आहे व तो कुठे मिळतो याची तर तो विकिपीडियाच.

एक भरभरून संपन्न आयुष्य जगलेला इंदरजित व क्वचित दिसणारी त्याची देखणी बायको पम्मी या दोघांचं एकच दुःख होतं. त्यांना मूल नव्हतं. याचं अपार वैषम्य तो उघड उघड बोलून दाखवत असे. त्यामुळेच की काय, दुकानात मूल आलं की तोही मुलासारखा होऊन जायचा. त्यांना हवं ते लाडेलाडे द्यायचा. एरवी सुद्धा मालसामान काढताना एखाद्या मुलाने बरणी उघडून गोळ्या चॉकलेट घेतले तर तो कानाडोळा करायचा. वरतून म्हणायचा वाहे गुरूने चिडीयांना चुगण्यासाठी अख्खे खेत सोडून दिले होते ही तर बरणी आहे! 

एके दिवशी इंदरजित सिंह की दुकान बंदच दिसली. चौकशी केली तर इंदरजित पंजाबला गावी गेल्याचं कळलं. वाटलं येईल परत. आठवडा झाला. महिना झाला. सहा महिने झाले. इंदरजित आलाच नाही. मोबाईल स्वीच ऑफ तर कायमचाच. मी लावणंच सोडून दिलं. रस्त्यावरनं जाताना त्याचं बंद शटर पाहून गलबलायला होतं. संध्याकाळी येताना त्याच्या बंद दुकानाच्या पायऱ्यांवर रेंगाळणं होतं. ही तर रोजच विचारते, “इंदरची काही खबरबात?” माझं गप्प राहणं पाहून तीसुद्धा खंतावते. मग मनात एक कळ उठते व मनातच बोल उठतात, “ये रे बाबा इंदर, परत ये, मागाल ते मिळेल हे तुझं ब्रीदवाक्य होतं ना? दुकान जरी बंद असलं तरी ती पाटी आत अजून तशीच असेल ! तर हेच मागणं की ये, किंवा जिथे कुठे असशील तेथे सुखात रहा !” 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments