सुश्री सुनिता गद्रे
वाचताना वेचलेले
☆ फजान…. लेखक – डॉ. शिरीष भावे ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरचे माहितीपूर्ण लघुपट पाहणे हा माझा फावल्या वेळातला आवडता छंद. असाच एक लघुपट, थायलंडमधल्या हत्तींच्या प्रशिक्षण केंद्रावर आधारित, मी पाहत होतो. जंगली हत्तींना माणसाळावून त्यांचा वापर करणे ही एक अमानुष प्रक्रिया आहे. पर्यटकांना जंगलातून पाठीवर बसवून फिरवणे अथवा लाकडी ओंडक्यांसारख्या जड वस्तू वाहून नेणे अशा गोष्टींसाठी हत्तींचा वापर केला जातो. महाकाय आणि शक्तिशाली असलेलं हे जनावर सहजासहजी माणसाळत नाही. फासे टाकणे, खड्डा खोदून त्यात सापळा लावून त्यांना पकडणे अशा मार्गांनी त्यांना आधी बंदिस्त करावं लागतं आणि त्यानंतर सुरु होते त्यांच्यावर हुकमत गाजवण्यासाठी, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी केली जाणारी अघोरी प्रक्रिया. पकडलेल्या हत्तीला साखळदंडाने बांधून एका छोट्या लाकडी पिंजऱ्यामध्ये कोंडलं जातं. त्यानंतर उपाशी ठेवणे, भाल्यांनी टोचणे, झोपू न देणे अशा मार्गांनी त्याचा अनन्वित छळ केला जातो. इंग्रजीमध्ये याला “ब्रेकिंग द स्पिरिट ऑफ द एलिफंट” म्हणजे हत्तीची आंतरिक उर्मी आणि जिजिविषा नष्ट करणे असं म्हणतात. या सर्व क्रूर प्रक्रियेला ‘ फजान ‘ असं म्हणतात.
मी पहात असलेल्या लघुपटामध्ये त्या प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख कार्यक्रमाच्या निवेदकाला माहिती देत होता. एके ठिकाणी एक प्रचंड मोठा, लांबलचक सुळे असलेला हत्ती उभा होता. निवेदकाच्या लक्षात आलं की त्याच्या पायात एक जाडजूड साखळदंड बांधलेला आहे पण तो दुसऱ्या बाजूला कुठेच बांधलेला नसूनही तो हत्ती इंचभरही जागचा हालत नाहीये. त्यानी ,”हे कसं” असं आश्चर्याने विचारलं तेव्हा केंद्रप्रमुख म्हणाला,” ती साखळी फक्त त्याच्या पायात अडकवलेली पुरेशी असते. ती दुसरीकडे बांधायची गरज नसते. ती साखळी त्याच्या पायात आहे याची नुसती जाणीव त्याला असली की तो जागच्या जागी उभा राहतो!”
लघुपट संपला आणि मी अंतर्मुख झालो. ही अशीच साखळी आपल्या विस्तृत, खंडप्राय देशाच्या पायात अडकवून इंग्रज निघून गेले. 1947 साली त्यांनी ती दुसऱ्या बाजूने सोडली तरी अजूनही आपल्या मनात ती काल्पनिक शृंखला बांधलेलीच आहे. 1835 साली लॉर्ड मेकॉलेने अतिशय धूर्तपणे या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. इंग्रजी भाषेला सर्वोच्च दर्जा दिला गेला. स्थानिक भाषांचं महत्त्व पद्धतशीरपणे छाटलं गेलं. इंग्रजी भाषेचा साखळदंड आपण अजूनही पायात दिमाखात मिरवतो. आपल्या समृद्ध स्थानिक भाषांमध्ये व्यवहार करणं आपण कमीपणाचं समजतो. भाषेबरोबर तिच्याशी निगडित संस्कृती आली आणि झालं आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं आणि क्षमतेचं खच्चीकरण. इंग्रजांनी आपला सामूहिक आत्मविश्वास इतका नष्ट केला की स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षं होऊनही बरेचसे नियम आणि अधिनियम इंग्रज राजवटीमध्ये अंमलात असलेले अजूनही आपण वापरतो. मोटार वाहन अधिनियम इंग्रजांनी 1919 साली बनवला आणि तो स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तसाच राबवला जात होता.
वैयक्तिक जीवनात अशी काल्पनिक साखळी मनात बांधून जगणारे अनेक जण आहेत. राहुलचंच उदाहरण बघा ना.
काही दिवसांपूर्वी अतिशय विष्षण मनोवस्थेमध्ये मला भेटायला आला होता. एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची उत्तम नोकरी होती. परंतु कुठल्यातरी गूढ तणावाखाली असल्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मी विचारलं,” काय रे राहुल, इतका चिंताग्रस्त का तू?” “माझ्या बॉसला मी प्रचंड घाबरतो.आज नोकरी लागून दहा वर्ष झाली तरीसुद्धा तो मला रागवेल, वाईट साईट बोलेल अशी उगीचच भीती सतत मनात असते. खरंतर माझ्यावाचून त्याचं पान हलत नाही; पण मी मात्र निष्कारण तणावाखाली जगतो.”
मी म्हटलं,” पण तू तर त्या ऑफिसमधला एक महत्त्वाचा दुवा आहेस. तुला असं राहण्याचं कारणच काय?”
“मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा पहिल्या सहा महिन्यांमध्ये माझा बॉस माझ्यावर येता जाता उगाचच डाफरत असे. ती दहशत अजूनही माझ्या मनात खोलवर रुजलेली आहे. मी त्यातून बाहेर पडू शकत नाहीये. तो नवीन येणाऱ्या सगळ्यांनाच अशी वागणूक देतो, हे मी पाहिलंय.” “म्हणजे तुझ्या बॉसने तुझं फजान केलं तर.” असं म्हणून मी राहुलला हत्तीची गोष्ट सांगितली. “ती साखळी नाहीच आहे, खरं तुझ्या पायात. तू ज्या क्षणी ती मनाने काढून टाकशील त्या क्षणी एका मुक्त मनाचा जन्म होईल. आत्ताच्या आत्ता, या क्षणी ते तू कर राहुल”.
माझ्या नजरेला नजर देत त्यानी रोखून पाहिलं आणि फक्त ” येस्स्ssss” असं म्हणत तो निघून गेला.
योगायोग असा की त्यानंतर दोन दिवसांनी रूपालीची भेट झाली. तीसुद्धा अशाच कुठल्यातरी दबावाखाली असल्याची चिन्हं मी ओळखली.
“माझं लग्न होऊन मी सासरी आले आणि माझ्या सासूबाईंनी पहिल्या वर्षात माझा पूर्ण ताबा घेतला. मला कुठलंच स्वातंत्र्य नव्हतं. साध्या साध्या गोष्टीत त्यांची सतत दादागिरी असे. खरंतर आज लग्नानंतर दहा वर्षांनी मी त्यांच्यावर कुठल्याच दृष्टीने अवलंबून नाही. माझं स्वतःचं करियर आहे, अस्तित्व आहे आणि आर्थिक स्वातंत्र्यही आहे. पण तरीसुद्धा माझ्या मनात भीती असते, त्या मला कशावरून तरी बोलतील. आता खरं तर त्या तशा वागतही नाहीत. पण मी ही मनातली बेडी कशी झुगारून देऊ?”
मी मनात म्हटलं ,”हे अजून एकाचं फजान. “
राहुलला जे सांगितलं तीच गोष्ट मी रुपालीला ऐकवली. “रूपाली सासूबाईंनी फजान केलं तुझं. फेकून दे ती मनातली साखळी.” अचानक साक्षात्कार व्हावा, याप्रमाणे ती दुर्दम्य आत्मविश्वास आणि दृढनिश्चय मनात घेऊन माझ्या समोरून गेली.
काही महिन्यांनी दोघेही भेटले. दोघांचेही पहिलं वाक्य तेच होतं. “काका, फजान संपलं. साखळी आता पायातही नाही आणि मनातही.”
आपल्या देशाच्या पायातीलही ती मायावी शृंखला गळून पडण्याची मी आशेने वाट पाहतोय.
लेखक : डॉ. शिरीष भावे
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈