श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ हात माझे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
भजनात ताल धरण्या रमतील हात माझे
देवास वंदण्याला जुळतील हात माझे
*
राबून पोट भरणे आहे खरी सचोटी
अभिमान राबण्याचा जपतील हात माझे
*
आधार द्यावयाचे आहेच काम मोठे
दुबळ्यास सावरूया म्हणतील हात माझे
*
प्रेमात रंगलेले मन दंग होते जगते
विरहात आसवांना पुसतील हात माझे
*
अन्याय पाहताना बसणार शांत नाही
निर्दाळण्यास त्याला सजतील हात माझे
*
मग्रूर श्वापदांनी उच्छाद मांडला की
बिनधास्त घेत पंगा भिडतील हात माझे
*
छळवाद मांडलेला मोडून काढताना
वज्रापरी कठूता धरतील हात माझे
*
दुःखात सावराया देतील साथ तेव्हा
आनंद वाटणारे ठरतील हात माझे
*
जपतो समाज जेव्हा प्रेमातला जिव्हाळा
घेवून हात हाती फिरतील हात माझे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈