प्रा. विजय काकडे
जीवनरंग
☆ ग्रुप मेम्बर…. – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆
(कारण बॅचलर मुलांच्या घोळक्यातला मी एकमेव त्या सगळ्या वेगळ्या पठाडीतल्या सिनियर्समध्ये सहजी सामावून गेलो होतो. आणि त्यांनीही मला कधी सापेक्ष वागणूक दिली नव्हती. आपल्यापासून कधीही वेगळे समजले नव्हते.) — इथून पुढे
त्यांनी माझ्या चांगल्या गुणांची नेहमीच कदर केली. वेळप्रसंगी मला चार गोष्टी समजावूनही सांगितल्या. रिकाम्या वेळात ग्रंथालय जाऊन वाचन करणे, नेट-सेट परीक्षेचा अभ्यास करणे, विद्यार्थ्यांसाठी चांगल्या नोट्स काढणे त्यासाठी चांगल्या प्रतीचे रेफरन्स बुक्स जास्तीतजास्त वापरणे, संध्याकाळी शास्त्रीय गायन, तबला, हार्मोनियम इत्यादींचे क्लास लावणे, कविता करणे इत्यादी सर्व सवयी मला त्यांच्यामुळे लागल्या. मी कॉलेजला असल्यापासून अरुण दातेंची भावगीते गायचो. इथे वैद्य मॅडमला तर माझी गाणी खूप आवडायला लागली होती. मुळे मॅडम आणि त्या दोघी रिकाम्या वेळेस चक्क स्टाफ रूम मध्ये मला गायला लावायच्या आणि माझ्या आवाजाचे भरभरून कौतुक करायच्या. आता लवकरात लवकर संगीत विशारद होण्याचा व्हा असा सल्ला मला त्या द्यायच्या. त्या सगळ्यांच्या सहवासामुळे सगळे मित्र मला चिडवायचे. पण मला त्यांचे चिडवणे काही समजत नव्हते त्यामुळे मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतो.
अरे माझा स्वभाव त्यांना आवडतो म्हणून आमचे जास्त जमते. तुम्ही का माझ्यावर जळता? असे मी सगळ्यांना आटोकाट सांगण्याचा प्रयत्न करायचो. पण सगळे व्यर्थ…! ‘अरे एक दिवस तुला ते कचऱ्यासारखे टाकून देतील ‘ असे ते मला म्हणायचे पण मला त्यांची परवा नव्हती.
आता समा सुधारलाय,जात-पाच धर्म, लिंग या पलीकडे जाऊन माणूस म्हणून सगळे लोक एक होत आहेत आणि दुसरीकडे आपण लोक मात्र संकुचित कोत्या मनोवृत्तीचे आहोत की जुनं अजून काहीकेल्या आपल्या डोक्यातून जातच नाही. बुरसटलेले संकुचित विचार आपल्या मनातून नष्ट होत नाहीत. आपला मेंदू सुद्धा लहान म्हणून आपण भव्य दिव्य असा विचार करूच शकत नाही. असे माझे विचार झाले होते. परंतू माझ्या मित्रांना माझे हे विचार पटत नव्हते.का? ते मला पटत नव्हते.
एके दिवशी कॉलेजच्या गेटवर वैद्य मॅडमनी सुषमा नावाच्या एका सुंदर मुलीशी माझी ओळख करून दिली. मुलगी छान होती. उच्चशिक्षित होती.
दुसऱ्यादिवशी चहाला गेल्यावर त्या म्हणाल्या, ” मग कशी वाटली सुषमा? ”
” मी समजलो नाही, मॅडम.
“अहो सर वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. आम्ही विलास सरांना इथे जॉब दिला. त्यांना इथलीच मुलगी दिली. लग्नही झालं. आता छान संसार चाललाय त्यांचा.ते आता इथेच स्थायिक झालेत कायमचे.
आता तुमचा नंबर. तुमचेही छान करून देवू. सुषमा छान आहे. सोन्यासारखा संसार करेल तुमचा. कसे?”
” हो ते ठिक आहे पण मॅडम अजून माझ्यावर खूप जबाबदारी आहे माझ्या कुटुंबाची. एवढ्यात नाही मला लग्न करायचे. अगोदर सेटल व्हायचेय मला. ”
“अहो, मग नाही कोण म्हणतंय.” चहाचा कप खाली ठेवत मुळे मॅडम मध्येच म्हणाल्या.
“अहो, लग्न झाल्यावरच मनुष्य खऱ्या अर्थाने सेटल होतो. तुम्ही आधी लग्न करा मग सगळेकाही ठिक होईल. तुमच्या सेटलमेंटसाठीच आमचा सगळा खटाटोप चाललाय ना? आता द्या पाहू होकार पटकन.” वैद्य मॅडमने असे म्हणतात सगळेजण मला द्या होकार म्हणू लागले. मी केवळ मनातल्या मनात हासून, “नंतर सांगतो.” असे म्हणालो. त्यानंतर मग नेहमीप्रमाणे छान चर्चा रंगल्या.
अशातच एक प्रकरण कॉलेजमध्ये जोर धरू लागले.
गणिताच्या एका आमच्या बहुजन प्राध्यापकावर खूप अन्याय झाला होता. त्याचे शासन नियमानुसार विद्यापीठ सिलेक्शन होते परंतू संस्थेला दुसराच एक ओपन कॅटेगिरी चा प्राध्यापक या विषयासाठी घ्यायचा होता. त्यामुळे गायकवाड याला नीट शिकवता येत नाही या कारणामुळे त्याचं कंटिन्युएशन डावललं गेलं होतं. त्यामुळे त्यांने उपोषणाला बसण्याची धमकी मॅनेजमेंटला दिली होती पण मॅनेजमेंट त्याला काढण्यावर ठाम होते. सरतेशेवटी बहुजन संघटना आक्रमक झाली. उपोषणाचा दिवस जवळ आला तरी मॅनेजमेंट दखल घेत नसल्याने संघटनेने आपला मोर्चा विद्यापीठात नेण्याची धमकी दिली. पण त्यालाही मॅनेजमेंट भीक घालेना. मग जुनेजाणते पाच ते दहा मागासवर्गीय प्राध्यापक व वीस ते पंचवीस नवीन तरुण तडफदार प्राध्यापक संघटनेच्यावतीने विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी भव्य मोर्चा काढला. संघटनेचे शिष्ट मंडळ कुलगुरूंना भेटले. परंतू कुलगुरूंनी आंदोलकांची केवळ बोळवण केली. ठोस असे काहीच आश्वासन दिले नाही. तेव्हा परत आल्यावर पुन्हा उपोषणाची जोरदार तयारी झाली.
कॉलेजच्या बाहेरच उजव्या बाजूला छोटेखानी कापडी मंडप टाकला होता. खाली सतरंजी टाकली होती. उपोषणाचा फलक मागच्या बाजूला ठळक दिसेल अशा पद्धतीने लावला होता. जवळपास सगळेच बहुजन प्राध्यापक त्या संपात सहभागी झाली होते. माझ्या हातात ‘बहुजनांवरील अन्याय सहन करणार नाही ‘ असा फुलक होता. ‘ न्याय मिळालाच पाहिजे ‘ ‘ विद्रोह करावाच लागेल ‘ ‘ शिका संघटित व्हा संघर्ष करा ‘ इत्यादी फलक इतरांच्या हातात होते.
एक जण पुढे घोषणा देत होता आणि आम्ही सगळे मागे आवाज देत होतो.
सकाळी दहा वाजता मंडपातून मोर्चा कॉलेजच्या गेटमधून थेट आत शिरला एका ओळीत प्राचार्यांच्या ऑफिसकडे निघाला त्यावेळी मोर्चाने विराट स्वरूप धारण केले होते. आम्ही सगळे खूप भारावून गेलो होतो. जेव्हा मोर्चा स्टाफरुमच्या समोर आला तेव्हा नकळत माझे लक्ष तिकडे गेले तर काय? स्टाफरुमच्या खिडकीतून आमचा ग्रुप वैद्य मॅडम, मुळे मॅडम, देशपांडे सर व इतर सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. ते पाहून मला थोडे आश्चर्य वाटले! मी किती ॲक्टिव्ह आहे. किती मोठे सामाजिक काम करतो आहे हे त्यांना दाखवण्यासाठी मी उत्सुक होतो.
ते स्टाफरूमच्या बाहेर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी का येत नाहीत ते मला समजेना.
मग न राहून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शेवटी मीच हातातला एक फलक जोरदार उंचावत त्यांच्या दिशेने पाहत होतो व मोठ्याने घोषणा देत होतो. त्या सगळ्यांना माझा खूप अभिमान वाटत असेल असे वाटत होते म्हणून मला अधिकच शेव आला होता पण त्यानंतर तर त्यांनी स्टाफरूमचे दार धाडकन लावून घेतले!
आमच्या आंदोलनाच्या त्या दिवसानंतर एकाही ग्रुप मेंबरने माझ्याशी संवाद केला नाही की जवळीक सुद्धा दाखवली नाही. त्यांच्या त्या तशा वागण्याने मी खूप उदास झालो होतो.
मी सगळ्यांना नेहमीप्रमाणे भेटण्याचा, बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते सगळे मला टाळत असल्याचेच मला जाणवले. असे का झाले? यावर चर्चा करत असताना गज्या म्हणाला, ” अरे हे होणारच होते आम्हाला ते माहित होते पण तुला सांगून काय उपयोग?
” अरे पण असे झालेच कसे? तसे असते तर मग सुरुवातीलाच मला त्यांनी जवळ का केले असते? ”
” आता तूच विचार कर शांत बसून… बघ काय कळतंय का?”
ते कळायला आणि स्वीकारायला बरेच दिवस लागले परंतू जेव्हा कळले तेव्हा माणूस आधी की जात आधी? याचा हिशोब मात्र लागत नव्हता…..
– समाप्त –
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈