श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ आई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

नवरात्र हा सण प्रामुख्याने मातृशक्तीचे जागरण करणारा आहे. त्यानिमित्ताने हा लेख…!

“या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता। 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”‘

खरंतर आईचे वर्णन करायला आई हा एकच शब्द पुरेसा ‘ बोलका ‘ आहे.

आई म्हणजे दया, क्षमा, शांतीचा सागर !!!

आजच्या मंगलदिनी…..

जननीस वंदन !

गोमातेस वंदन !!

भूमातेस वंदन !!!

भारतमातेस वंदन !!!!

गुरुमाऊलीस वंदन !!!!!

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’,

‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’; 

‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ 

… अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद ही ”नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला असावा.

आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘ मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. आईच्या मातृत्वभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ ( प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसिकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” आणि माझ्या लेकरास शिवाजी म्हणून घडवायला जमलं नाही तर किमान शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून तरी घडवेन, असा उदात्त विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. निसर्गाने दिलेला ‘निर्मिती’च्या नैसर्गिक अधिकाराचा स्त्री शक्तीने उचित उपयोग करून घ्यायला हवा. हा प्रयत्न काही प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील, असे वाटते.

‘ देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’ याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसून क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक’ न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा या पेक्षा चांगला उपाय नसेल असे मला वाटते..

मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.

मातीच्या चार भिंती

त्यात माझी राहे आई

एवढे पुरेसे होई 

घरासाठी….. !!

आदरणीय मातृशक्तीस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण !!

श्रीराम समर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments