श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ३० ☆ श्री अरविंद लिमये ☆
थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण, आर्थिक ओढग्रस्तता.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देणारंच होतं. पण तो संशयाचा कांटा मनात रुतण्यापूर्वीच मी क्षणार्धात उपटून तो दूर भिरकावून दिला. नाही… सुजाता असं कांही करणं शक्य नाही… ! मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन कुरतडत राहिला.
“सुहास, इतर कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल.. काहीतरी गफलत असेल. त्या कॅशमधे चूक असणं शक्यच नाही… “
“सगळ्या रिसिटस् दोन दोनदा चेक करून खात्री करून घेतलीय सर. सगळं बरोबर होतं. त्यादिवशी सगळेजण खूप उशीरपर्यंत याच व्यापात होतो. पण आता काळजीचं कांही कारण नाहीय सर. त्या संध्याकाळी आम्ही प्राॅब्लेम साॅल्व्ह करुन मगच घरी गेलो सर. आता प्रॉब्लेम मिटलाय. पैसेही वसूल झालेत. “
मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.
“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत?म्हणजे?कसे?कुणी भरले?”
“मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलायत हेही सांगितलं. त्यांनी लगेच पैसे पाठवले सर. “
ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला.
माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं, पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असंच वाटू लागलं. मी शांतपणे डोळे मिटून खुर्चीला डोकं टेकवून बसून राहिलो. पण स्वस्थता नव्हती.
माझ्या मिटल्या नजरेसमोर मला सगळं स्वच्छ दिसू लागलं होतं… ! हो. हे असंच घडणाराय.. !माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडे पहातायत असा मला भास झाला… न्.. मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो.
काहीतरी करायलाच हवं… पण काय? मन सून्न झालं होतं. काय करावं तेच सुचत नव्हतं. आणि.. आणि अचानक.. अस्वस्थ मनात अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक धूसर विचार सळसळत वर झेपावला… आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो…!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈