सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर
कवितेचा उत्सव
☆ प्रार्थना… ☆ सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर ☆
☆
हे जगदीश्वरी हे जगदंबे जननी तू जन्मदा
लीन होउनी पदकमलांशी वंदिन तुज शतदा ।
नकोच मजला धनसंपत्ती नको रूपसंपदा
हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥
*
तुझ्यासंगती जगकल्याणा व्हावे उमा शिवानी
निर्दाळावे दुष्ट होउनी महिषासुरमर्दिनी
हरण्या दुःखे दीनांची मी असावे कामदा
हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥
*
कधी अन्नपूर्णेच्या रूपें भुकेजल्या घरी धान्य भरावे
अन्यायी जन समोर येता उग्र चंडिका काली व्हावे
ज्ञानदीप उजळावे जगती होउनिया शारदा
हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥
*
तुझ्या निवासें आदिशक्ति गे जीवन माझे सार्थ ठरावे
धूपकांडीसम जळता जळता विश्व सुगंधित करून जावे
अंती मोक्ष दे मोक्षदे मला पुरव कोड एकदा
हृदयी माझ्या वास तुझा गे जागृत राहो सदा ॥
☆
© सुश्री अमिता कर्णिक-पाटणकर
मुंबई
ईमेल – [email protected] मोबाइल – ९९२०४३३२८४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈