सुश्री माधुरी काबरे
☆ “अस्तित्व…” लेखिका : सुश्री माधुरी काबरे ☆ प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆
तो दारात उभा होता! बाहेर कदाचित पाऊस रिपरिपत असावा. तो आवाज ऐकत खोलीतल्या गूढ पिवळट प्रकाशात ती सुंदपणे बसून होती आणि अचानक तो दारात दिसला. क्षणभर तिला कळलंच नाही. कळलं तेव्हा प्रथम खरंच वाटलं नाही आणि जेव्हा खरं वाटलं तेव्हा ती दचकली! उडणारा मेंदू ताळ्यावर ठेवत तिने डोळे विस्फारून पाहिलं. तिला दिसणारा तो ‘तो’च होता. त्याच्या चेहऱ्याभोवती विक्षिप्तपणाचं वलय नेहमीसारखं फिरत होतं. नवीन म्हणजे त्याच्या खांद्यावर एक हडकुळं मूल झोपलं होतं. पण त्याला ओळखायला तिला त्याची पुसटशी सावलीही पुरली असती.
त्याची आकृती डोळ्यात साठवत असताना तिच्या मनात बरंच काही खळबळू लागलं. रुक्ष संसारात थिजलेली सात-आठ वर्षे भराभर वितळून गेली आणि तिला एकदम अल्लड झाल्यासारखं वाटलं. त्याचवेळी मनात सतत झिरपणारी त्याच्याविषयीची ओढ पुन्हा जागी झाली. त्यावेळी त्याला समर्पित होण्यासाठी उत्सुक भरलेलं तिचं कोवळं हृदय पुन्हा अस्वस्थ आशेनं फुलारून आलं. त्यावेळी त्याला पाहिल्यावर होणारी धडधड ऐकत असताना तिचे डोळे आनंदाने चमकू लागले. बाहेरचा पाऊस सतारीचे सूर वर्षावू लागला आणि स्वतःला त्या आनंदातून खेचून काढत ती हलक्या मृदू स्वरात गुणगुणली, “ये ना, बैस!”
तो येऊन समोरच्या खुर्चीवर बसला. त्या सोनेरी गुढ प्रकाशात तो थोडा थकल्यासारखा दिसत होता. त्याचे केसही बरेच पांढूरके झाले होते. पण त्याचा सोनेरी फ्रेमचा चष्मा मात्र आहे तसाच होता. ती वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. तो बोलत होता खरा, पण तिला काही एक कळत नव्हतं. पण तो घोगरा आवाज मात्र तिला वेढून टाकत होता. ती अधिकच गुंगत होती… तिच्या शरीराला यौवनाची जाग आली तेव्हा तिच्या भावविश्वात केवढा तरी बगीचा फुलवला होता त्याने… स्वप्नांचे सरच्या सरच्या सर गुंफत तिने तासच्या तास घालवले होते त्याच्याबरोबर… त्याने कधीतरी फेकलेल्या हास्याची फुले गोळा करण्यात ती सारे हृदय ओतत होती त्याच्यासमोर… आपण निर्माण केलेल्या त्या स्वप्नात ती मुग्धापणे रमली होती… त्यावेळचा तो उत्कटपणा हा तिच्या मनात फुटून फुटून वाहत होता! तो सारा आनंद तिला शब्दातून फुलवायचा होता. पण त्यावेळेप्रमाणेच तिच्या ओठातून शब्द बाहेर पडत नव्हते… तोच बोलत होता… आणि तो काय बोलत आहे हे तिला मुळीच समजत नव्हतं…
असा किती वेळ गेला कोणास ठाऊक! मध्येच त्याच्या खांद्यावरचं ते मूल जागं झालं आणि त्यानं आपलं तोंड फिरवलं. ते मूल तिला आत्ताच दिसत होतं. तिला घाबरून किंकाळी फोडावीशी वाटली. कमालीचं घाणेरडं, चमत्कारिक आणि विद्रुप होतं ते! तिच्या अंगावर शहारा आला. इतकं घाणेरडं मूल याला कसं झालं? तिच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हुरहुरलं! आपलं मूल कसं झालं असतं?… तिचं मन क्षणभर सैरभैर झालं. त्या मुलाची विझलेली भयाण नजर तिच्यावरची चिकटली होती. त्या मुलानं तिचा आनंद खाऊन टाकला होता. ती त्या मुलाकडे पहात राहिली.
तो म्हणाला, “घे ना. हा माझा धाकटा मुलगा. ”
त्याला घेण्याच्या कल्पनेनं तिचं डोकं गरगरू लागलं आणि डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली… कसल्या तरी गुंगीनं तिला झपाटलं… क्षणभर प्रकाश आणि अंधार यांच्या सीमारेषेवर ती हिंदकळली आणि नंतर अंधाराच्या खोल गर्तेत बुडून जाऊ लागली… सगळीकडे अंधार, फक्त अंधार आणि अंधारच होता…
तिनं भानावर येऊन डोळे चोळले. खरंच भोवती नुसता अंधार होता. दिवा कोणी मालवला? आणि ‘तो’ कुठे गेला? तिला काही कळेना… त्याच वेळी घड्याळात चार-पाच टोले पडत होते. त्या आवाजानं ती शुद्धीवर आली. उशीवरनं मान वळवली आणि त्या खोल दाट अंधाराला तिचं खिन्न हसणं जाणवलं! तिच्या नीट लक्षात आलं– ते सारं स्वप्न होतं! स्वप्न, खोटं!!… खोटं? खोटं कसं असेल? तो आला होता… बोलला होता… त्याचा गहिरा आवाज – त्याचा सोनेरी फ्रेमचा चष्मा – तिच्या मनात आनंदाच्या लाटा उसळल्या! काही काळ ती त्या लाटांवर तरंगली आणि परत अंधारात बुडू लागली!
तिची झोप केव्हाच दूर गेली होती आणि त्या स्वप्नानं तिच्या मनात थैमान घातलं होतं. दुसऱ्या कशाचाही विचार न करता तिनं नुकत्याच पडलेल्या त्या स्वप्नात डोकावून पाहिलं! साऱ्या गोष्टी नीट न्याहाळल्या आणि तिच्या सुगंधित अंत:करणाला काहीसं जाणवलं! तो आला होता!… खरंच आला होता!
आला होता? मग आता कुठे आहे? मला माहित नाही. पण तो आला होता… बोलला होता. नक्कीच!… ती उदासली! खरंच हे स्वप्न रात्री का नाही पडलं? तो रात्रभर का नाही राहिला? पण पहाटेची स्वप्न खरी होतात ना? छे! वेडगळ कल्पना आहे ती! निदान हे स्वप्न तरी नक्की खरं होणार नाही. सात वर्षांपूर्वी कदाचित खरही झालं असतं!…
सात वर्षांपूर्वी! त्यावेळी तिच्या कोवळ्या मनात जे जे उगवलं होतं ते ते अबोलपणाच्या भिंतीत करपून गेलं होतं. तिची सारी तडफड मनातच बंदिस्त राहिली होती. त्याला साधी गंधवार्ताही लागली नव्हती. फक्त शेवटी… शेवटी तरी काय? तो कायमसाठी दूर निघाला तेव्हा व्याकुळ होऊन तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी निखळलं आणि चमकून त्यानं तिच्याकडे पाहिलं. बस्स! इतकंच! त्याला कळलं असेल? कदाचित नसेलही. पण तेव्हा कशाचाच उपयोग नव्हता. कोसळलेल्या क्षितिजाखाली चांदणं फुलायची मुळी शक्यताच नव्हती! तिच्याच मुग्धतेने तिच्या पहिल्यावहिल्या प्रेमाचा बळी घेतला होता. ती आताही खिन्न खिन्न झाली. त्यावेळी एक-दोन वर्ष हृदयात व्यापून राहिलेली कासावीस करणारी उदासी पुन्हा मनात खळाळू लागली आणि जखमेवरल्या रक्तासारखे तिच्या डोळ्यातून अश्रू भळभळू लागले! तिच्या डोळ्यासमोर ते स्वप्न नाचत होतं…
विचार करता करता तिच्या अंगावर शहरा आला… त्याने ते चमत्कारिक मूल कशाला आणलं होतं? त्या घाणेरड्या सोंगानंच तिचं स्वप्न हिरावून घेतलं होतं. कोण होतं ते? त्यांच्या दोघातील नियती? त्या पोराची ती भयाण नजर पुन्हा तिला गिळू लागली! मनातला सारा जोर लावून ती त्या विकृत सावलीला दूर दूर लोटू लागली… त्या ठिकाणी ‘त्या’चा चेहरा आठवू लागली… खरंच फारसा बदलला नाही. परत ती त्याच्याच भोवती फिरू लागली. त्याचे केस थोडे पांढरे झाले आणि तब्येतही खालावली होती. छे! आपण काहीच कसं विचारलं नाही? तिचं मन फाटलं… पूर्वीही तो गेल्यावर असंच काही काही आठवत रहायची आणि हळहळायला व्हायचं! आजही तसंच. इतक्या वर्षांनी तो एवढा आला. पण त्याची कसलीच चौकशी करायचं सुचलं नाही. तसं बोलताही आलं नाही. तो काय काय बोलला हेही लक्षात नाही. आता पुढच्या खेपेला नक्की…
पुढली खेप? केव्हा? कुठं? की परत स्वप्नातच? स्वप्न कोण आणतं? का आणतं?कुठून आणतं? कसं आणतं? तिच्या मनात प्रश्न गरगरू लागले. खरंच त्या स्वप्नांनं तिला वेडंखुळं केलं होतं! ते स्वप्न निरर्थक मानायला तिचं मन तयार नव्हतं. स्वप्न खोटं मानायच्या कल्पनेने ती व्याकुळ होत होती. खोटं कसं? त्याचं बोलणं ऐकलं! त्याची आकृती डोळ्याने पाहिली… पण कुठले डोळे? आणि कुठले कान? आता तर डोळ्यांना दिसतोय हा भयाण खोल अंधार आणि कानाला ऐकू येतेय त्या अंधारात ठिबकणारी घड्याळाची रुक्ष टकटक!… मग ते स्वप्न कोणी पाहिलं? त्याचा प्रभावी आवाज कोणी ऐकला? झोपेत सारं शरीर थंड पडून निष्क्रिय झालं असताना कोण जागं होतं?
… पण स्वप्न खोटीच असतात!
… कशावरून?
… त्यातलं काही नंतर शिल्लक नसतं…
कोण म्हणतं सारं शिल्लक आहे! जसंच्या तसं ते स्वप्न मनात उभं आहे! ते स्वप्न त्या सोनेरी प्रकाशाबरोबर विझलं… त्याचा आवाज अंधारानं गिळला… अवेळी आलेल्या जागेनं त्या स्वप्नाच्या साऱ्या पाकळ्या कुस्करल्या… पण त्या स्वप्नाची जाणीव शिल्लक आहेच! स्वप्न खोटं मग ही जाणीव खरी कशी? हातातून भुर्रकन सुटून गेलेल्या त्या रुपेरी पक्षाची पिसं हातात आहेत. मग तो पक्षी आलाच नव्हता असं कसं म्हणायचं? मग ही पिसं कुठली? ‘तो’ इथे येऊन गेल्याखेरीज त्याच्या भेटीचा आनंद मनात कसा थरथरत राहील? तिच्या मनाची खात्री झाली. तो आला होता! खरंच तो आला होता…
तिचं हृदय भरून आलं. पापण्या भिजल्या! त्या दोघात पसरलेली एका जन्माची दरी किती विलक्षणपणे भरून आली होती! सगळं गिळून संसार करताना तिच्या मनात कुठेतरी गळत राहिलेलं दुःख कसं अचानक फुंकलं गेलं होतं! त्याचा आवाज ऐकायला मिळणार नाही म्हणून तडफडणाऱ्या तिला तो आवाज ऐकायला मिळाला होता! ती ज्यावर बेहद्द खुश होती तो सोनेरी फ्रेमचा चष्मा पुन्हा तिला दिसला होता! खोलीतच असलेल्या नवऱ्याच्या नकळत ती तिच्या प्रियकराला भेटली होती!… किती गंमत…
हळव्या झालेल्या मनाने ती गोड हसली. तिला केवढा दिलासा मिळाला होता. पुन्हा तिच्या मनात काहीतरी उगवत होतं. यौवनाच्या पहिल्या पायरीवर त्याच्यासाठी अर्पण केलेलं हृदय आज तिनं तितक्यात उत्कंठेनं त्याच्यासाठी सिद्ध केलं होतं. खरंच तो नेहमी येईल स्वप्नात? रोज रात्री? छे! रोज रात्री नाही जमायचं त्याला! पण कधीतरी नक्कीच… तिच्या मनात प्रतीक्षा उमलू लागली. किती का दिवस लागेनात पण या जन्मात तरी नक्की! ती उत्साहाने बेत करू लागली. पुढच्या खेपेला त्याच्या तब्येतीची चौकशी करायची. मग पुढे हळूहळू मनातलं सारं त्याच्याजवळ ओतून टाकायचं आणि त्यानंतर आणखीही काही…
तिला आज कितीतरी दिवसांनी शांत शांत वाटलं. मग ती हलकेच मघाच्या स्वप्नात शिरली. त्याचा आवाज… तो चष्मा… तो बेफिकीर आवाज… ती खूप खूप खुश झाली. खुशीची ग्लानी हळूहळू तिच्या डोळ्यावर पाझरू लागली… डोळे जड होऊन मिटत गेले… मिटत गेलेल्या रात्रीसारखे! आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलू लागला फुलत गेलेल्या स्वप्नासारखा!
त्याचवेळी तिचा नवरा जागा होत होता आणि ते कुरूप मूल सूर्य होऊन तिच्या घरावर आपले असंख्य हात पसरत होतं.
☆
लेखिका: सुश्री माधुरी काबरे
प्रस्तुती : श्री जगदीश काबरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈