सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
.. चैत्र पालवी…
मराठी चैत्र महिना उत्साहाचं वारं घेऊनच येतो. माहेरवाशिण चैत्रगौर घरोघरी विराजमान होते. आपल्यातल्या सुप्त गुणांना, कलेला वाव देण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. आमची आई आणि विमल काकू चैत्रगौर अप्रतिम सजवायच्या. पंचामृत, शुद्धोदक चंदन, अत्तर लावून चैत्रगौर लखलखीत घासलेल्या नक्षीदार झोपाळ्यात मखमली आसनावर विराजमान व्हायची. गृहिणीच्या उत्साहाला उधाण यायचं. हळदी कुंकवाच्या दिवशी. घरातल्याच वस्तू वापरून कमी खर्चात सुंदर आरास सजायची. सोनेरी जरीकाठाचे, मोतीया रंगाचे उपरणे अंथरून पायऱ्या केल्या जायच्या. अफलातून आयडिया म्हणजे सुबक कापून टरबुजाचं कमळ, कैरीचा घड, द्राक्षाचं स्वस्तिक आणि हिरव्यागार पोपटी कैरीला टोकाकडून कुंकू पाण्यात कालवून लाल जर्द चोचीचा डौलदार पोपट सुंदर ग्लासात ऐटीत बसायचा. छताला हाताने बनवलेलं तोरण चमकायचं. फळांच्या खाली बारीक दोऱ्याने विणलेली कमळं ऐसपैस पसरली जायची. असा होता चैत्रगौरीचा थाट. मग का नाही गौर प्रसन्न होणार?
आईच्या मैत्रिणीकडे शांतामावशीकडे अन्नपूर्णेसह लक्ष्मी पाणी भरत होती. चांदीच्या ताटात वाट्या, तांब्याभांडं, व पेल्याचा सेटच होता तिच्याकडे. त्याकाळी स्टील घेणे सुद्धा महागात पडायचं. सजलेल्या चैत्रगौरीपुढे चांदीच्या ताटलीत छोट्या नक्षीदार वाट्यांमधून आंब्याची डाळ, पन्हं आणि झक्कास हरभऱ्याची उसळ, काकडीची चकती सुबकपणे मांडून चविष्ट नैवेद्य देवीपुढे मांडला जायचा. चांदीच्या रेखीव पेल्यात केशर, विलायची युक्त केशरी पन्हं पाहून आमच्या मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं आणि मग काय ! पोटभर छानशी उसळ, चटकदार कैरीची डाळ, आणि बर्फाचे खडे घातलेले जम्बो ग्लासातले ते केशरी अमृत पिऊन पोटभर फराळ करून हळदी कुंकवाची, फराळाची सांगता व्हायची.
सवाष्णीसाठी तर हा समारंभ म्हणजे मानाचे पान. हळदी कुंकू, गजरा, अत्तर, आंब्याच्या डाळी, आणि काकडीबरोबर घशाला थंडावा देणारं अप्रतिम चवीचं थंडगार पन्हं पिऊन त्या तृप्त तृप्त व्हायच्या.
नवरात्रात रोज उठता बसता म्हणजे पहिल्या आणि दसऱ्याच्या दिवशी सवाष्ण व कुमारीका जेवायला असायची. पुण्यात शिकायला आलेले गरीब विद्यार्थी अध्ययन शिक्षण घ्यायचे पण पोटोबाचे काय? हा त्यांचा प्रश्न सुगरण गृहिणी सहजतेने माधुकरी देऊन सोडवायच्या. आता मुलांना तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर सहज अगदी त्या क्षणी सारं काही मिळतंय, आई-वडिलांच्या जीवावर पैसा अडका, कपडे, चैनीच्या वस्तू, गाड्या अगदी विनासायास मिळताहेत, पण त्या काळी पोटासाठी पुण्यात विद्यार्थ्याला ठराविक घर हिंडून घरोघरी “भवती भिक्षां देही ” असं म्हणून फिरावे लागायचे. तेव्हां गृहिणीची त्या देण्यात.. “अतिथी देवो भव ” ही पुण्यकर्माची भावना असायची. बुद्धीने कष्टाने मिळवलेलं ते संघर्षमय असं विद्यार्थी जीवन होतं. अशा या विद्येच्या माहेरघरात कितीतरी विद्यमान व्यक्ती यशोदायी होऊन शिक्षण क्षेत्रात चमकल्या. उगीच नाही पालक म्हणायचे, ‘ पुणं तिथे काय उणं ‘. असं होतं विद्यादान, अन्नदान करण्यात अग्रगण्य असलेलं तेव्हाचं कसबे पुणं..
– क्रमशः भाग सहावा
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈