डाॅ. मीना श्रीवास्तव

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ ‘अजूनही चांदरात आहे – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

 अभिनंदन ! अभिनंदन !! 

‘पुणे मराठी ग्रंथालय ‘ या ११३ वर्षे जुन्या शासनमान्य ‘अ ‘ वर्ग ग्रंथालयाने जुलै २०२४ मध्ये पुस्तक परीक्षण स्पर्धा’ आयोजित केली होती. त्या स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव यांच्या पुस्तक परीक्षणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नुकतेच प्रदान करण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘अजून चांदरात आहे’ या ललित लेखांचा अंतर्भाव असलेल्या सुंदर वाचनीय पुस्तकाचे परीक्षण डॉ. मीना श्रीवास्तव यांनी लिहिले होते. या ग्रंथालयाच्या ११३ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात त्यांचा गौरवपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल डॉ. मीनाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

आजच्या अंकात वाचू या हे पुरस्कारप्राप्त पुस्तक परीक्षण……..

संपादक मंडळ,

ई – अभिव्यक्ती (मराठी विभाग)

पुस्तक- अजूनही चांदरात आहे

लेखक- श्री विश्वास देशपांडे

प्रकाशक- सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे 

पृष्ठसंख्या- १६८ पाने

पुस्तकाचे मूल्य- २०० रुपये 

(पुस्तक खरेदीसाठी लेखक श्री विश्वास देशपांडे यांच्याशी ९४०३७४९९३२ या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधावा.)

श्री विश्वास देशपांडे

 अजूनही चांदरात आहे’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे आकर्षक लक्षवेधी रूप प्रथम पाहताक्षणी नजरेत भरते. चवथीचा चंद्र, गर्द निळेभोर अस्मान, चांदण्यात न्हायलेल्या जलाशयाची शांत निळाई, काळोखात विसावलेली पर्वतराजी अन तेजस्वी धवल रंगांनी कोरलेले शब्द! पुस्तकात ३२ ललित लेख आहेत. त्यासोबतच ८ काव्यसुमने देखील जोडलेली आहेत. विविधरंगी अन विविधगंधी विषयांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेले असे हे कोलाज आकर्षक वाटते. एक १४ पानी लेख वगळता (एक लढा असाही), इतर सर्व लेख ३-४ पानी आहेत. मैफिलीत जसे प्रत्येक गायक एक स्वतंत्र गाणे म्हणतो आणि आपण ते गाणे संपल्यावर नवीन गायकाची वाट बघत नव्या कोऱ्या गाण्याची प्रतीक्षा करतो तसेच हे लेख स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहेत. म्हटले तर पुस्तक एका बैठकीत वाचून संपवा, किंवा चवी-चवीने एक-एक लेख निवांतपणे वाचा. दोहोत तितकाच आनंद अनुभवास येतो. लेख प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव लाभलेल्या सौंदर्यवती नवयौवनेसारखेच आहेत. कुठेही फाफटपसारा नाही, मात्र त्यांच्या अंतरंगात डोकावून बघावे तर लेख पूर्णत्वास पोहचलेले असतात!

वेगवेगळ्या विषयांतून लेखकाचे गहिरे वाचन, चिंतन, कल्पनाशक्ती, शब्दवैभव अन भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप प्रकर्षाने जाणवतो. पुस्तकातील एका लेखाच्या ‘शब्दमाधुर्य, गीतमाधुर्य, नादमाधुर्य’, या शीर्षकास अनुसरून, लेखकाच्या भाषेत शब्दमाधुर्य आहे, तसेच ती साधी, सोपी आणि सहज आहे. ‘To be simple is the most difficult thing in the world’ हे लक्षात घेतल्यास या सरल आणि तरल भाषेचे सौंदर्य खुलून दिसते. अलंकारांचा अतिरेक नसल्याने भाषा बोजड वाटत नाही. या अर्थवाही भाषेमुळेच प्रत्येक लेख वाचनीय झाला आहे, किंबहुना हाच या पुस्तकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

सामाजिक समस्यांवरील आणि विषमतेवरील भाष्य करणाऱ्या १० लेखांवरून लेखकाच्या सामाजिक जाणीवा किती प्रखर आणि दूरदर्शी आहेत याचा प्रत्यय येतो. मोजकीच उदाहरणे द्यायची तर ‘अजूनही चांदरात आहे’ मधील आजोबा आणि आधुनिकतेचे वेड असलेला नातू यांच्यातील संवादाचा अभाव, माणसा माणसातील विसंवादाचे वर्णन करणारे ‘अंतर’, गुगल स्पेस आणि डेटामधील जटिल माहितीच्या जंगलात अडकलेल्या माणसाविषयी मांडलेला ‘जो हुकूम मेरे आका’ हा यथार्थवादी लेख, ‘ये दिल मांगे (नो) मोअर’ मधील शीतपेयांचा बाजार आणि जाहिरातींच्या घातक अतिरेकी आक्रमणाबद्दल जनजागृती करणारा लेख ‘जागतो रहो’ हे लेख वाचनीय आहेतच, पण त्याचबरोबर ते वाचकास गहन विचारमंथन करण्यास प्रवृत्त करतात.

वाढत्या प्रदूषणाचे आणि हिरवाईच्या ऱ्हासाचे विदारक परिणाम आज दिसत आहेतच, पण पुढील पिढ्यांपुढे हा प्रश्न अधिकच ज्वलंत होत जाणार आहे. त्याच अनुषंगाने स्वच्छ हरित पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘एक लढा असाही’ या लेखात चिपको आंदोलनाचा सविस्तर आढावा घेत हरितक्रांतीविषयी सखोल विवेचन करण्यात आले आहे. ‘चला आपण आधुनिक कोलंबस होऊ या’ हा लेख देखील पर्यावरणाचा आणि वृक्षवल्लींचा झालेला ऱ्हास आणि नद्यांचे दूषित जल या समस्यांवर भाष्य करतो. या लेखातील शालेय शिक्षणात पर्यावरण या विषयाचा अंतर्भाव आणि इतर मौलिक सूचना विचारणीय आहेत.

‘कवितांच्या गावा जावे’ या लेखात लेखकाच्या कल्पनेची उत्तुंग भरारी अनुभवास येते. विंदा, दत्ता हलसगीकर आणि विदर्भातील कवी बोबडे यांच्या कवितांचे काव्यमय रसग्रहण अत्युत्तम झाले आहे. भारताच्या ऐश्वर्यसंपन्न संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारे ४ लेख मला जरा जास्तच भावले. ‘मनोरथा चल त्या नगरीला’ या लेखाद्वारे कर्नाटकातील हंपी या पुरातन शहराची सफर अतिशय हृद्य आहे. व्यक्तिचित्रे आणि नातेसंबंधांचे विश्लेषण करणारे ३ लेख वाचनात आले. त्यातील काळजाला भिडणाऱ्या ‘गेले द्यायचे राहून’ या लेखात लेखकाने त्यांच्या अन त्यांच्या वडिलांच्या हृदयस्पर्शी नात्याचे अलवार पदर हळुवारपणे उलगडले आहेत.

‘दिगूची मुशाफिरी’ मधील सध्याच्या राजकीय, सामाजिक अव्यवस्थेचे भीषण वास्तव आणि पत्रकारितेची दांभिकता यावरचे लेखकाचे भाष्य मनावर कठोर आघात करून जाते. पूर्वग्रहदूषित माणसे एखाद्या व्यक्तीविषयी कसा गैरसमज करून घेतात याचे चपखल उदाहरणांसहित केलेले परिणामकारक लेखन ‘लेबल्स’ या लेखात आढळते. मला भावलेल्या दोन लक्षवेधी लेखांचा उल्लेख करते, एक आहे ‘होरेगल्लू’, सुधा मूर्ती यांच्या या लेखातील हे शीर्षक म्हणजे गावातील वडाच्या झाडाखालचा ‘बेंच’, म्हणजेच आपली सुखदुःखे हक्काने शेअर करायची जागा! याच विचाराचा आजच्या संदर्भाला अनुलक्षून केला गेलेला उहापोह अनवट विचार दर्शवतो. दुसरा लेख आहे ‘ब्रायटनची ब्राईट कहाणी’ ज्यात इंग्लंड येथील ब्रायटन या गावाजवळील पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या स्मृती जागवणाऱ्या स्मारकाची कथा रेखाटलेली आहे.

पुस्तकांतील लेख आणि कवितांचे वाचन केले असता लेखकाचा मूळ पिंड गंभीर आणि वास्तववादी साहित्यिक लेखनाचा आहे असे जाणवते. पण या पुस्तकांतील काही लेख वाचल्यावर त्यांची विनोदबुद्धी देखील तितकीच तल्लख आणि प्रखर आहे असे दिसून येते. नर्म विनोदाची पखरण करीत हास्याचे रंगीबेरंगी कारंजे फुलवण्याचे कसब त्यांच्या मोजक्याच ५ लेखांत दृष्टीस पडते. ‘हम बोलेगा तो’ यात बोलघेवडी माणसे आपल्याला भेटतात, उदाहरण द्यायचे तर वैचारिक दारिद्रय प्रकट करणारे राजनीतीज्ञ! मंचावर प्रवेश करताक्षणी यांनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला की प्रेक्षकांची किती म्हणून गोची होते ते त्या प्रेक्षकांनाच माहित असते. ‘तेच ते’ या उपरोधिक लेखात सरकारी पातळीवर नित्याची बाब असलेल्या कचेऱ्यांमध्ये मौक्याच्या स्थळी विजेत्याप्रमाणे स्थानापन्न असलेल्या ‘विहित नमुन्यांच्या’ गमती जमती वर्णन करतांनाच त्यांच्यापायी लोकांना होणाऱ्या त्रासाचे कष्टप्रद पण रंजक वर्णन पेरले आहे. त्यातून साधलेला अप्रतिम विनोद कोपरखळ्या मारीत आपल्या चेहेऱ्यावर स्मित आणतो.

मात्र या सर्वांवर मात करणारा मला सर्वाधिक आवडलेला लेख म्हणजे ‘महानायक आजारी पडतो तेव्हां’! हा लेख तर कल्पनेच्या भराऱ्या मारीत प्रासंगिक विनोदाचा जणू धमाल धबधबाच! त्याची पार्श्वभूमी अशी की आपला लाडका महानायक अमिताभ कोरोनाने ग्रस्त झाल्यावर दवाखान्यात भर्ती होतो. हे वृत्त कळताच त्याला भेटायला चित्रनगरीतील त्याचे अनेक सहकलाकार त्याला भेटायला येतात, त्यांचे ठेवणीतले डायलॉग हिंदीतच ठेऊन लेखकाने खूप मजा आणली आहे, शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान येतात तेव्हांची दवाखान्यात उडालेली धांदल आणि गांभीर्याच्या मास्कखाली दडलेल्या चौफेर विनोदाच्या बहारदार लहरींचा आस्वाद घ्यायचा असेल तर संपूर्ण लेखच प्रत्यक्ष वाचावा!

प्रतिभा आणि प्रतिमेचे वरदान लाभलेले मराठी काव्यजगतातील शीर्ष कविजन जेव्हां एकत्रितपणे ‘नक्षत्रांचे देणे’ प्रदान करतात तेव्हां ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी लेखकाची अवस्था होते. त्याचा परिपाक म्हणजे ‘कधी कधी मला वाटतं’ ही नितांतसुंदर कविता! कवितेची सुरुवातच विंदा मास्तरांच्या वर्गापासून झालीय! सुरेश भटांच्या काव्यातील काटे खुपू न देता त्यांच्या ओल्या जखमा न्याहाळीत, बालकवींच्या आनंदाला हळुवारपणे स्पर्श करीत आणि शांताबाईंच्या हिरव्या अन बरव्या ऋतुसंहाराचे रंग ओळखत आपण भेटतो ताठ कण्याने जगायला शिकवणाऱ्या अन प्रेमाने पाठीवर हात ठेवीत लढायला सज्ज करणाऱ्या कुसुमाग्रजांना! या कवींच्या सुंदर भावस्पर्शी कवितांच्या रम्य आठवणी लेखकाने जाग्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे मातृभक्त कोमलहृदयी साने गुरुजी, निसर्गकवी बा. भ. बोरकर, तत्वज्ञानी तांबे आणि रोमँटिक पाडगावकर देखील या कवितेत विराजमान झाले आहेत. सदरहू कवींकडून काय काय घ्यावे अन घेता घेता त्यांचे हातच कसे घेऊन टाकावेत हे या कवितेचे गमक आहे. ही कविता म्हणजे या पुस्तकातील अभिजात आणि अनवट साहित्यनिर्मितीचा सर्वोच्च बिंदू आहे असे मला वाटते.

मला एक अजून भावलेली कविता ‘चष्मा’ वाचतांना स्वतःबद्दल राग, निराशा आणि अगतिकता वाटायला लागते. निरनिराळ्या राजकीय पक्षांचा तथाकथित जाहीरनामा, त्यांचे हिरवे, भगवे अन निळे झेंडे ही प्रतीकचिन्हे अतिशय वास्तववादी आणि प्रभावी वाटतात. स्वतःची राजनैतिक विचारसरणी सामान्य जनतेची देखील कशी आहे, हे ठासून सांगण्यातच या पुढाऱ्यांचा वेळ आणि शक्ती खर्ची पडतात. फिल्टर आणि चष्मा या दोन प्रातिनिधिक शब्दांत कवीने हा राजनैतिक खेळखंडोबा अभिनवरित्या चितारला आहे. बेरोजगारी आणि महागाईसारख्या जनतेला पोळत असलेल्या सध्याच्या गंभीर समस्या जिथल्या तिथेच राहणार हे माहित असल्याने अत्यंत दुय्यम अशा गोष्टींकडे जनतेचे लक्ष वळवणे हे राजकीय नेत्यांचे इप्सित इथे प्रकर्षाने मांडलेले आहे. कवितेच्या शेवटी सर्वधर्म समभावाच्या झेंड्याच्या प्रतिमेचा एल्गार ध्यानी-मनी खोलवर रुजतो. हाच या कवितेचा संदेश असावा अशी माझी धारणा आहे. लेखकाची कल्पनाशक्ती, शब्दवैभव आणि भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप त्यांच्या काव्यलेखनात दृष्टीस पडतो दिसून येतो.

एकंदरीतच ‘अजूनही चांदरात आहे’ या श्री विश्वास देशपांडे लिखित पुस्तकाची गोळाबेरीज करतांना जाणवते की, ललित लेखांचे उच्च साहित्यिक मूल्य असलेले लेख आणि कविता, नवीन विषयांची अनवट माहिती, सामाजिक समस्यांचे सखोल चिंतन, तसेच त्यांच्यावर विचारपूर्वक मांडलेले उपाय, विनोद, परिहास आणि उपरोधिक भाष्य यांनी अलंकृत असे हे पुस्तक आहे. वाचकांना लेखकाच्या या ललित लेखनाच्या लालित्याचा लळा लागेल असे मला खात्रीपूर्वक वाटते. शेवटी एकच सांगावेसे वाटते की वाचकांनी हे वाचनीय पुस्तक तर फिरफिरुनि वाचावेच, पण आपला वाचनसंग्रह समृद्ध करायला ते संग्रही ठेवावे, तसेच वाचनसंस्कृतीचा प्रसार होण्याकरता पुस्तकभेट म्हणून या पुस्तकाची निवड करावी.

परिचय : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments