श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ “दाम्पत्य” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
प्रत्येकाच्या नशिबात
एक बायको असते
आपणास कळतही नसते
डोक्यावर ती केव्हा बसते
बायको इतरांशी बोलताना
गोड, मृदू स्वरात बोलते
अजून ब्रह्मदेवालाही कळले नाही
नवऱ्याने काय पाप केलेले असते
ज्ञानेश्वराने भिंत चालवली
बायको त्यांचं कौतुक करते
सालं नवरा अख्खं घर चालवितो
तेव्हा मात्र बायको गप्प असते
वस्तू कुठे ठेवली हे
बायको विसरते
दिवसभर नवऱ्यावर
उगीचच डाफरते
लग्नात पाचवारी बायकोला
खूप होत होती मोठी
आता नऊवारी गोल नेसतानाही
बायकोला होतेय खूपच छोटी
बायकोच्या प्रेमाची गड्यांनो
तर्हाच खूप न्यारी असते
पाहिजे तेव्हा रेशन लागते
नको तेव्हा उतू जाते
वयाच्या साठीनंतर
एक मात्र बरं असतं
बायको ओरडली तरी
नवऱ्याला ऐकू येत नसतं
काट्याकुट्याच्या रस्त्यातून
नवरा किती मस्तीत चालतो
याला कारण खरं बायकोचा
मस्त, धुंद सहवास असतो
बायको गावाला गेली की
देवाशपथ, करमत नसतं
क्षणाक्षणाला रुसणारं
घरात कुणीच नसतं
नवरा-बायकोचं
वेगळंच नातं असतं
एकमेकांचं चुकलं तरी
एकमेकांच्याच मिठीत जातं
बायकोवर रागावलो तरी
तिचं नेहमी काम पडतं
थोडा वेळ जवळ नसली तर
आपलं सर्वच काही अडत असतं
अव्यवस्थित संसाराला
व्यवस्थित वळण लागतं
त्यासाठी अधूनमधून
बायकोचं ऐकावंच लागतं
बायकोशी भांडताना
मन कलुषित नसावं
दोघांचं भांडण
खेळातलंच असावं
नाती असतात पुष्कळ
पण कुणी कुणाचं नसतं
खरं फक्त एकच
नवराबायकोचं नातं असतं
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈