श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “शौर्यसूर्यांवरील डाग !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मेजर शैतान सिंग
ही तर आपली खरी पितरे !!!!!!
अगदीच विपरीत परिस्थिती होती. इथले हवामान अगदीच नवीन. या हवामानाशी जुळवून घ्यायला कित्येक महिने लागू शकतात.. आणि या १२४ बहादूर जवानांना इथे पाठवले जाऊन केवळ काहीच दिवस झालेले आहेत. उभ्या आयुष्यात कधी बर्फाचे डोंगर पाहिलेले नाहीत, पावसासारखा बर्फ पडताना पाहिला आणि अनुभवलेला नाही. थंडी या शब्दाचा अर्थ या आधी कधी समजला नव्हता तो आता समजू लागलेला आहे. कपभर पाणी उकळायला काही तास लागताहेत. पायांतले बूट सर्वसाधारण हवामानासाठी बनवलेले. बोटे उघडी राहिली तर गळून जाण्याची शक्यता. तंबूही तसेच…. अगदी साधे.
.३०३ (point three-not-three) रायफली.. एक गोळी झाडल्यावर दुसरी गोळी झाडण्याआधी ती रायफल परत कॉक करावी लागे…. म्हणजे पुढची गोळी झाडायला रायफल तयार करावी लागे…. मिनिटाला फार तर वीस-तीस गोळ्या या रायफलमधून बाहेर पडणार! थंडीपासून बचाव करण्यासाठी हातात हातमोजे घालावेच लागतात.. पण मग या मोज्यामुळे रायफल फायर करण्यासाठी असणारा ट्रिगर (खटका, घोडा) ज्या धातूच्या गोलाकार रिंगमध्ये असतो, त्या रिंगमध्ये बोट नीट आत जात नाही… रायफल तर फायर करायचीच आहे… मग उजव्या हातातील मोजा काढावाच लागतो… आणि भयावह थंडीत उघड्या राहिलेल्या बोटाला हिमदंश होतोच… बोट मृत होऊन गळूनही पडू शकते! एका जवानाकडे फारतर सहाशे गोळ्या. पलटणीकडे असलेली अग्निशस्त्रे अगदीच सामान्य. आणि समोर…. अमर्याद संख्या असलेला लबाड शत्रू ! संख्या किती… तर आपल्यापेक्षा किमान वीसपट. आणि त्यांची हत्यारे आपल्यापेक्षा उजवी…. मिनिटाला पाचशे गोळ्या झाडणारी…. शिवाय ते तोफगोळेही झाडू शकत होते… आपल्या जवानांना आपला तोफखाना साहाय्य करण्याच्या भौगोलिक स्थितीत नाही… कारण तोफखाना आणि आपली युद्धभूमी यांमध्ये उंच डोंगर. आणि तरीही आपली अत्यंत महत्वाची हवाई धावपट्टी राखायची आहे…. अन्यथा शत्रू पुढे सरकरणार… आणि आपला मोठा भूप्रदेश ताब्यात घेणार अशी स्थिती. त्यांची मोठी टोळधाड येणार हे निश्चित होते… आणि त्यांची संख्या पाहता माघार घ्यावीच लागणार हे (तिथे क्वचितच दिसणा-या) सूर्यप्रकाशाएवढे लख्ख होते. दलनायक नावाने शैतान ! पण वृत्तीने देवासारखा… लढाऊ आणि सत्याची बाजू न सोडणारा…. जणू पांडवांचा सारथी… श्रीकृष्ण… मूळचा यादवच. तुम्ही माघारी निघून या… अशी सूचना वरिष्ठ लष्करी अधिका-यांनी दिलेली असताना दलनायक आपल्या जागी ठाम उभा. एकशे चोवीस वीर…. शत्रूला घाबरून माघारी पळून जाणे हे रक्तात नव्हतेच कधी… आताही नाही… कोई भी जवान पीछे न हटेगा !… ठरले ! हे एकशे चोवीस… ते हजारोंच्या संख्येने चालून आले… शत्रूकडे माणसांची कमतरता नव्हती….. आणि शस्त्रांची सुद्धा. आपल्या या १२४ जवानांची शत्रूस मारता मारता मरेतो झुंज सुरु झाली आणि चार तासांत संपली सुद्धा. आपल्या शूरांनी त्या हजारो शत्रूसंख्येतील किमान हजारभर तरी आपल्या. ३०३ रायफली, संगीनी आणि नुसत्या हातांनी यमसदनी धाडले होते. शत्रूने ती लढाई तांत्रिकदृष्ट्या जिंकलेली असली तरी त्यांची हृदयं भारतीय सैन्याच्या मृत्युंजयी पराक्रमाने काळवंडून गेली… ते माघारी निघून गेले… त्यांनी आणखी पुढे येण्याची हिंमत दाखवलीच नाही असे म्हटले जाते… आणि दोनच दिवसांत त्यांच्या बाजूने युद्धविराम जाहीर केला ! या युद्धात इतर कोणत्याही आघाडीवर चीनला एवढ्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले नव्हते… It was a real Last Stand of Indian soldiers!
११४ सैनिक सहकारी त्यांच्या प्रिय अधिका-यासह.. मेजर शैतान सिंग साहेबांसह, देशाच्या सीमेच्या रक्षणार्थ प्राणांचे बलिदान देऊन बर्फाच्या कड्यांच्या आड, बर्फात, खंदकांमध्ये निपचित पडलेले होते. सर्वांनी छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. एकाने तर तब्बल सत्तेचाळीस गोळ्या उरात सामावून घेतल्या होत्या.. ३०३ रायफल फायर करता यावी म्हणून सर्वांनी हातातले मोजे काढून फेकून दिले होते… एकाच्या हातातील हातागोळा तसाच त्याच्या हातात होता… उभ्या स्थितीतच प्राण गेला होता! वैद्यकीय सहायकाच्या हातात इंजेक्शनची सिरीन्ज तशीच होती… त्याला डोक्यात गोळ्या लागल्या होत्या… तब्बल ११४ देह बर्फात बर्फ होऊन थिजून गेलेले… पण पुन्हा कधीही जिवंत होतील आणि शत्रूवर तुटून पडतील असे वाटावे!
या दिवशी लढाईत उतरलेल्या आठ-दहा जवानांच्या प्राणांवर त्यादिवशी यमदूतांची नजर पडली नसावी… ते बचावले… त्यातील एकाने, रामचंद्र यादव यांनी जबर जखमी झालेल्या मेजर शैतान सिंग साहेबांना स्वत:च्या अंगावर बांधून घेऊन काही अंतरावर वाहून नेले… तशाही स्थितीत मेजर साहेबांनी “छावणीत पोहोचा… आपले जवान कसे शेवटच्या श्वासापर्यंत लढले ते त्यांना सांगा!” असे बजावले. पण साहेबांना असे टाकून माघारी येण्यास त्याने नकार दिला. रात्रीचे सव्वा आठ वाजले होते मेजर साहेबांच्या मनगटी घड्याळात…. काळजाच्या धडधडीवर चालणारे ते पल्स घड्याळ… बंद पडले… साहेबांच्या हृदयाची धडधड बंद पडल्यावर!…. मेजर शैतानसिंग साहेब देवतुल्य कामगिरी बजावून निजधामाला निघून गेले. रामचंद्र यादव यांनी मेजर साहेबांचा देह शत्रूच्या हाती लागू नये असा लपवून ठेवला! जिवंत सापडलेल्या सहा जणांना चीनी सैनिकांनी युद्धकैदी म्हणून पकडून नेले… याट रामचंद्र यादव सुद्धा होते…. रामचंद्र यादव साहेब अंधारात शत्रूची नजर आणि पहारे चुकवून निसटले आणि भारतीय हद्दीत आले… त्यांनी छावणीतल्या मुक्कामात खायला घालून सांभाळलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्यांना आपल्या लष्करी छावणीपर्यंत वाट दाखवली! हा जखमी जवान भारतीय लष्कराच्या ताब्यात आला, त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले गेले. दरम्यान २१ नोव्हेंबर, १९६२ रोजी म्हणजे रेझांग ला (चुशुल) येथे झालेल्या प्रचंड लढाईनंतर चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केला गेला होता….. चीनी जरी जिंकले असले तरी त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले होते….. कदाचित त्यामुळेच त्यांनी युद्धविराम जाहीर केलेला असावा.. असे अनेकांना वाटते. सुमारे १८००० फूट उंचीवर झालेले हे रणकंदन प्रत्यक्षात पाहणारे आणि त्याची कहाणी सांगण्यासाठी जिवंत राहिलेले केवळ सहाजणच होते.. त्यातील चार चीनच्या ताब्यात… त्यातील एक तिथेच मृत्यू पावला. एक जण तिथून निसटला होता.
जो जिवंत परतला होता तो सांगत असलेली युद्धकथा इतकी अविश्वसनीय होती की मोठमोठ्या लष्करी अधिका-यांना ही भाकड कथा भासली… एकशे चोवीस जवान हजारो चिन्यांचा खात्मा करू शकले, हे त्यांच्या पचनी न पडणे साहजिकच होते…. कारण अत्यंत अपु-या साधन सामुग्रीच्या जोरावर अगदी ऐनवेळी अनेक सैनिक तिथे पाठवले गेले होते. जो सैनिक हे सांगत होता त्याला दिल्लीत बोलावले गेले… चुकीचे, खोटे सांगितले तर अगदी कोर्ट मार्शल होईल अशी तंबीही दिली गेली… जवान म्हणाला… ”साहेब, आपण प्रत्यक्ष येऊन बघा… तिथली परिस्थिती समजावून घ्या. मेजर साहेब अजूनही तिथेच बसून आहेत.. त्यांचे रक्ताळलेले हातमोजे त्यांच्या देहाशेजारीच ठेवलेत मी… साहेब तिथेच आहेत… निश्चेष्ट !”
अधिक माहिती घेतली गेली… दरम्यान काही युद्धकैदी भारताच्या ताब्यात मिळाले.. त्यांनी या गौरवशाली लढ्याच्या हकीकतीला दुजोरा दिला ! पण तरीही शंका होतीच…. प्रत्यक्ष डोळ्यांना पुरावा दिसत नव्हता…. प्रत्यक्ष जिथे लढाई झाली तिथपर्यंत जाणे युद्धाच्या वातावरणात शक्य नव्हते !
चिन्यांच्या तावडीतून सुटलेले हे वीर आपल्या मूळ गावी परतले…. आणि सामाजिक बहिष्काराचे बळी ठरले ! जिथे मुळात युद्धाची हकीकतच लष्करी अधिकारी मान्य करायला तयार नव्हते तिथे सामान्य गावकरी का वेगळा विचार करतील? कारण त्यांच्या समाजात युद्धात लढता लढता मरण्याची परंपरा…. हे पाच सहा जणच माघारी आले म्हणजे हे शत्रूला पाठ दाखवून माघारी पळाले असतील ! गावाने यांना वाळीत टाकले.. यांच्या मुलांच्या शाळा बंद केल्या…. भगोडे (पळपुटे) म्हणू लागले सारे यांना ! हे आपेश मात्र मरणाहुनी ओखटे होते…. प्रश्न जवानांच्या हौतात्म्याचा होता… त्यांचा पराक्रम असा संशयाच्या भोव-यात सापडणे किती दुर्दैवाचे होते!
१३, कुमाऊ रेजीमेंट होती ती. कुमाऊ हा उत्तराखंडमधील एक प्रदेश आहे. त्यावरून या रेजिमेंटचे नाव ठेवण्यात आले. राजस्थानात एका लष्करी अधिका-याच्या पोटी जन्मलेले मेजर शैतानसिंग भाटी या सेनेचे नायक होते. त्यांच्या नेतृत्वात ‘आभीर’ (अभिर) अर्थात नीडर, लढाईत शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहण्यात जीवनाचे सार्थक मानणारे ‘अहीर’ या लढाऊ हरयाणा भागातून आलेल्या समाजाचे कित्येक सैनिक होते… हिंदुस्तानात अगणित लढाऊ समाजघटक आहेत… ते सर्व सैन्यात एकमेकांच्या खांद्यास खांदा लावून लढत आहेत…. म्हणून आज देश उभा आहे !
फेब्रुवारी, १९६२. युद्धाविराम होऊन तीन महिने उलटून गेले होते. एक गुराखी आपले याक प्राणी हाकत हाकत तसा चुकूनच रेझांगला (चुशूल) नावाच्या परिसरातल्या त्या बर्फाच्या पहाडावर पोहोचला…. लढाख मधले हे 2. 7 किलोमीटर्स लांब आणि 1. 8 किलोमीटर्स रुंदी असलेले हे पठार ! तेथील दृश्य पाहताच त्याचे डोळे प्रचंड विस्फारले असतील ! तिथे भारतीय सेनेची एक सबंध तुकडी शत्रूच्या प्रतिकारासाठी बर्फात पाय रोवून उभी होती… सर्वांच्या रायफली लोड केलेल्या आणि शत्रूच्या दिशेने तोंड केलेल्या होत्या… शत्रू टप्प्यात येताच… रायफली फायर होणार होत्या… हातातल्या हातबॉम्बची फक्त पिन उपसायची बाकी होती… काहींच्या हातात रायफलच्या संगीनी होत्या… शत्रूच्या छातीत भोसकण्यासाठी सज्ज… फक्त या सेनेतील प्रत्येकाचे डोळे मिटलेले होते… कुडीतून प्राण निघून गेले होते… एका महाप्रचंड युद्धाचे एक शिल्पचित्रच जणू निसर्गाने तिथल्या बर्फात कोरले होते…. त्यात मेजर शैतान सिंग साहेबही होते… प्रचंड जखमी अवस्थेत एका खडकाला टेकून बसलेले…. शांत, क्लांत!… त्या देहात एका क्षणासाठी जरी देवाने पुन्हा चेतना निर्माण केली असती तरी ते म्हणाले असते…. ”.. पीछे न हटना… फायर !”
त्या गुराख्याकडून ही खबर पहाडाखाली आणि तिथून वायुवेगाने दिल्लीपर्यंत पोहोचली…. योजना झाली… पाहणी पथक युद्धभूमीवर पोहोचले…. पाहणा-या प्रत्येकाच्या डोळ्यांत आसवांनी गर्दी केली…. देशासाठी प्राणांचे बलिदान म्हणजे काय याचा बर्फात थिजलेला वस्तुपाठ त्यांच्या समोर होता… आता त्यांच्या हौताम्याबद्दल कसलीही शंका उरली नव्हती….. देहांची मोजदाद झाली… ओळख पटवली गेली…. कित्येक देह सापडलेच नाहीत…. आहेत त्या देहांवर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार झाले ! मेजर शैतान सिंग साहेबांचा देह त्यांच्या जन्मगावी पाठवण्यात आला ! ते जिवंतपणी परमवीर म्हणून लढले.. ते मरणोपरांत परमवीरचक्र विजेते ठरले. त्यांच्या हुतात्मा सहकारी सैनिकांचाही यथोचित गौरव करण्यात आला ! बचावल्या गेलेल्या बहादूर सैनिकांना मानाची पदे बहाल केली गेली. १९४ शौर्य सूर्य आता उजळून निघाले होते… त्यांच्यावरील डाग पुसले गेले होते ! पळपुटे म्हणून हिणवल्या गेलेल्या सैनिकांना देशाने आता वीर म्हणून स्वीकारले….. युद्धभूमीत स्मारक उभारले गेले… १९४ आत्मे शांततेत परलोकीच्या प्रवासास निघून गेले असतील…. ताठ मानेने !
१८ नोव्हेंबर, १९६२.. या दिवशी कृष्ण शुद्ध सप्तमी तिथी होती. या दिवशी आपल्या या पितरांनी हे जग त्यागले होते…. आज पितृपंधरवड्याचा अखेरचा दिवस… सर्वपित्री अमावास्या ! या सर्वपितरांसाठी आज एक घास बाजूला काढून ठेवू !
(काल परवाच भारतीय रेल्वेने आपल्या नव्या इंजिनला ‘ १३, कुमाउ ‘ हे नाव देऊन एक चांगले पाऊल उचलले. त्यावरून हा लेख लिहावासा वाटला. आपल्यासाठी जीवाचे बलिदान दिलेल्या सैनिकांचे स्मरण सतत व्हायला पाहिजे हा ह्या कथा सांगण्यामागील उद्देश ध्यानात घ्यावा. मी काही अभ्यासू लेखक नाही… पण तरीही लिहितो…जय हिंद! 🇮🇳)
(पहिले छायाचित्र परमवीर मेजर शैतान सिंग साहेब यांचे. दुस-या छायाचित्रात युद्धभूमीवर मृत सैनिकांच्या देहांवर अंत्यसंस्कार केले गेले ते दृश्य.. )
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈