सुश्री सुलभा तेरणीकर
विविधा
☆ चांदण्या रात्रीतले ते स्वप्न… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆
कवितेतून, गाण्यांतून नेहमी भेटणाऱ्या चांदण्यांची स्वप्नसृष्टी हलकेच कधी मावळली, ते कळलेच नाही. इतक्या वर्षांत जी स्थलांतरे झाली, स्थित्यंतरे झाली; त्यात तारकांकित आभाळाचे छत्र माथ्यावरून ढळल्याचे समजलेच नाही…..
‘निळ्या नभातून नील चांदणे निथळे मार्गावरी,
स्वप्नरथातून तुज भेटाया आले तव मंदिरी।’
… माणिक वर्मांच्या गाण्यातल्या नील चांदण्याने मन कसे भरून जाई. तर, ‘नक्षत्रांचे देणे’ देणाऱ्या आरती प्रभूंची जीवघेणी भाषा ओढ लावत असे……
‘नक्षत्रांनी गोंधळलेल्या
काळोखातून सौम्य आभाळी
तिचे डोळे.
ती स्वतःच त्या डोळ्यांतील,
किंचित ओले निसर्गचित्र… ‘
तर, साहिरच्या ‘परछाईयाँ’ मध्ये –
‘ जवान रात के सीनेपे दूधिया आँचल ‘ अशी ओळ वाचून वेड लागत असे.
भा. रा. तांब्यांच्या कवितेत तर ‘ रमणिसंगमा हृदयी उत्सुक, जाई अष्टमीकुमुदनायक ‘ अशा अद्भुत नावाची ऐट घेऊन चंद्र येत असे.
ना. धों महानोरांच्या कवितेत-….
‘ये गं ये गं सये, अशी नजिक पहा ना,
आभाळीचा चंद्र घरी येणार पाहुणा… ‘
किंवा … ‘ क्षितिज वाटेत सांडल्या चांदण्या होऊन सोनफुलोरा ‘ अशा कल्पनेने चांदण्यांचे मोहिनीजाल मनावर पसरत असे.
‘चाँदनी रातें, प्यार की बातें’….. चित्रपटांच्या अशा गाण्यांतून चंद्र-चांदणे तर अक्षरशः बरसत असे; मग चांदण्यांची ही ओढणी आपल्यावरून कुणी ओढून घेतली ?
शांत, सुशीतल हवा, शरद ऋतूमधली पूर्ण चंद्राची रात्र असे काही अनेक निरीक्षणांतून, ऋतुचक्रातून शोधून चांदण्यांचा उत्सव, उपवनातून, प्रमोद उद्यानातून, घराच्या अंगणात, गच्चीवर एकत्र जमून करणाऱ्या पूर्वजांच्या काही खुणा तर आपण जपत होतो. साहित्यातून, कलेतून, काव्यातून त्यांची प्रतिबिंबे न्याहाळत होतो. थोडे कवडसे शोधीत होतो.
ज्या ऐसपैस अंगणात खेळायला यायचे; ती गच्ची, अंगण आपणच तर मोडले ना… ?
ज्या तळ्यात चांदणे पसरत असे, त्या तळ्याच्या जलस्रोतांवर इमले उभे केले ना !
ज्या बागांतून, उपवन-उद्यानांतून चंद्रफुले टपटपत ती बागच सुकली ना देखभालीशिवाय?
चांदण्याला, पाण्याला, वाऱ्याला खेळण्यासाठी दुसरी जागा ठेवली का?
मग चांदण्याची रात्रीची स्वप्ने विझणार नाहीत, तर काय होईल……. असा विचार छळत असतो.
कालक्रमाने हे मोडणे, पुन्हा मांडणे सुरू असतेच; पण या परिवर्तनचक्रात निसर्गाशी नाते तोडून टाकण्याचा अविचार कशासाठी?
सुप्रसिद्ध निसर्गलेखक मारुती चितमपल्लींच्या ‘ रानवाटा ‘ पुस्तकात ‘ रानातील घरं ‘ या एका अप्रतिम लेखात ते लिहितात— “ एकदा लिंबाच्या पानोळ्यातून घरट्यावर शुक्राचा तारा चमकताना दिसला. तिकडे मी पाहत होतो, स्वतःचे देहभान हरपून. कुठल्या तरी अज्ञात शक्तीने सारे हृदय हेलावून निघाले. त्या सौंदर्याच्या बोधाने मी पुलकित झालो…” —- किंवा —- “ रात्री इतर झाडांखाली आपल्याला थांबावेसे वाटणार नाही; पण लिंबाची झाडे त्याला अपवाद आहेत. चांदण्या रात्री तर त्या झाडांना अभूतपूर्व सौंदर्य प्राप्त होते, ते देखील नवीन असते. त्या झाडाखाली मला सदैव प्रसन्न वाटते. पानांमधून जमिनीवर पडलेल्या चांदण्यांच्या कवडशांची चंद्रफुले गोळा करायचा खेळ आम्ही मुले खेळत असू…”
चांदण्यांचे साहित्यात पडलेले असे प्रतिबिंब न्याहाळताना तनामनावर सुखाची शिरशिरी येते. देहभान हरपून जावे, असा शुक्रतारा आता मूठभर आकाशात कुठे पाहायचा… ? शहरात नित्य असणारी दिवाळी, पौर्णिमेच्या दिवसाचा विसर पाडते. शहरातले दिवे तर अंधाराची कहाणी सांगतात; बकालपणाची, अस्वच्छपणाची, न संपणारी कहाणी.
पूर्वी पदोपदी भेटणाऱ्या गाण्यांतल्या चांदण्याला कशी नीज आलेली असते !
‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ‘.. किंवा.. ‘ दूरदूर तारकांत बैसली पहाट न्हात ‘ या ओळीने चांदणे आळसावून उठते.
‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा… ‘
आता तर चांदण्यांना जाग येते. अंगण, गच्ची, तळे, बाग नसले; तरी मनात ते हलकेच उतरते. ज्ञानदेवांची शारदीय चंद्रकला प्रकटते. चांदण्यांच्या चाहुलीने ती चंद्रकला कविता लपेटून घेते. त्याच्या आठवाने मनात अतीव सुख दाटून येते…
© सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈