श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “पनीर रोटी !!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
“भाईसाब, मुझे थोडा बाथरूम तक लेके जायेंगे?”
पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेल सर्जीकल वॉर्ड मधील एका बेडवरून एका आवाजाने माझे लक्ष वेधून घेतलं! वयाच्या सुमारे पन्नाशीत असलेला एक गृहस्थ बेडवरून उठण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या सोबत कुणी नव्हतं. त्याच्या डोक्यावरची पगडी तशी सैल पडली होती. अंगावरच्या शर्टची वरची बटणे तुटलेली, पँट गुडघ्यावर फाटलेली होती. एका हाताच्या मनगटावर स्टीलचं कडं होतं, त्याच्या वरच्या भागावर खरचटल्याच्या जखमा होत्या अगदी ताज्या. कोणत्याही शीख बांधवास साजेशी भक्कम देहयष्टी, पण डोळ्यांत खूप आर्जव आणि आवाजात कंप.
मी त्याला धरून स्वच्छतागृहापर्यंत नेले. . . “शर्माईगा नहीं!” मी त्याला सांगितले, त्याने माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी एकदा पाहिलं. त्याला तिथून परत आणताना त्याच्या चेहऱ्यावर अगतिकतेचे भाव दाटून आले होते!
नाव विचारलं. . अडखळत उत्तर आलं. . “जी, गुरमित. . . गुरमित सिंग!”
सकाळी एका टेंपोवाल्याने त्याला वायसीएम मध्ये आणून इमर्जंसी मध्ये भरती केलं होतं. . . आणि तो भला माणूस निघून गेला होता.
गुरमितचं जवळचं असं कुणी नव्हतं इथं. पुण्याजवळच्या एका औद्योगिक वसाहतीत पोटासाठी कमवायला गुरमित आला होता, काही वर्षांपूर्वी. मराठी समजत होतं, पण बोलता येत नव्हतं. कारखान्यातील काम अंदाजे शिकला आणि आता सीएनसी मशीन व्यवस्थित ऑपरेट करू शकत होता. पंजाबातील एका शहरात जन्मलेल्या या साध्या शेतमजूर माणसाचं लग्न झालेलं होतं, पण पत्नी अकाली निवर्तली होती आणि मूल झालेलं नव्हतं. . . पुन्हा लग्न करायचं त्याच्या मनात कधी आलं नाही. पोटासाठी दिल्ली गाठली, भावाला बोलावून घेतलं, त्याला रोजगाराला लावून दिलं, उपनगरातल्या एका गरिबांच्या वस्तीत जागा मिळवून घर बांधून दिलं पण भावजय आली आणि याला दिल्ली सोडावी लागली. कारण गुरमित आजारी झाला. . . एका वाहनाने धडक दिल्याने पायात रॉड टाकला होता. . . त्याने सगळं आपलं आपण केलं. भावाला उपद्रव नको म्हणून खरडत, रखडत दूर मैदानात शरीरधर्मासाठी जाई. कमाई थांबली होती पण खाण्या पिण्याचे नखरे अजिबात नव्हते. बरे झाल्यावर मजुरीला जाण्याची वाट पाहत होताच. . . पण भावाला जड झाला थोड्याच दिवसांत.
आयुष्याला काही दिशा नव्हती. भावाच्या संसारात मन गुंतवत आयुष्य काढायचं मनात होतं. . आईबाप आधीच देवाघरी गेले होते. गावची शेती अगदी नगण्य. एका ट्रकमध्ये क्लिनर बनून पुण्यात आला. आरंभी मिळेल ते काम केलं आणि नंतर उपनगरात कुणाच्या तरी ओळखीने कारखान्यात हेल्पर झाला. कारखान्यात इतर राज्यातून मजुरीसाठी आलेल्या कामगार मुलांसोबत नाईलाजाने राहावे लागले छोट्या भाड्याच्या खोलीत. हा शीख, ते इतर कुणी. याचा स्वभाव तसा अबोल. व्यसन नाही त्यामुळे कुणाशी देणे घेणे व्यवहार नाही.
कोरोना आला आणि खोली रिकामी झाली. . . गुरमित कुठे जाणार? कारखान्याच्या शेड मध्येच मुक्काम आणि काम. नंतर जवळ एक खोली भाड्याने मिळाली. पैसे शिल्लक पडलेले होते थोडे. अडीअडचणीमध्ये उपयोगी पडावेत म्हणून बँकेत जपून ठेवले होते.
गुरमित टायफॉइडने आजारी झाला. असाच एका संध्याकाळी गोळ्या औषधं आणायला म्हणून गावात निघाला होता. . . रस्त्यावरच्या दगडाला पाय अडखळून पडला. . . तो नेमका उताणा. कमरेला मार बसला आणि त्याचं अंग, विशेषतः संपूर्ण उजवा भाग बधिर झाला आणि सतत थरथरू लागला!
आज गुरमित थरथरत्या देहाने बेडवर पडून होता. रुग्णालयातील सेवाभावी संस्थेच्या लोकांनी गुरमितला मदतीचा हात दिला. त्यावेळी ycm मध्ये सहा बेवारस रुग्ण होते!
संस्थेने गुरमित ची जेवणाची व्यवस्था केली, जेवणाचे पार्सल आणून ठेवले. गुरमितची अवस्था तशी बरी वाटत नव्हती. विविध तपासण्या झाल्या. . रिपोर्ट यायचे होते.
गुरमितने डाव्या हाताने जेवणाच्या प्लास्टिक पिशवीची गाठ कशीबशी सोडवली, भाजी प्लेटमध्ये ओतली. . . उजवा हात आणि आता पायही थरथरू लागले होते. कसाबसा एक घास त्याने तोंडपर्यंत नेला. . . पण त्याला वेळ लागत होता. मी त्याच्या पोळीचा एक तुकडा तोडला, भाजीत बुडविला आणि त्याच्या मुखात घातला. . . . त्याने माझ्याकडे पाहिले. . . “मैं खा लूंगा प्राजी!” तो म्हणाला. . . मी म्हणालो” रहने दो. . . आराम से खाना”
आणखी तीन घास तोंडात घातल्यावर मात्र त्याने मला थांबायला सांगितले. . . संकोच होत होता त्याला. . . एवढा मोठा माणूस लहान मुलासारखा दुसऱ्याच्या हातून जेवतो आहे. . . त्याला कसं तरी वाटत असावं!
वॉर्डातील इतर रुग्णांचे नातेवाईक आणि नर्स आणि वॉर्डबॉय, मामा सुद्धा गुरमितला पाहून हळहळत होते!
दुपारी गुरमित सीरियस झाला! त्याला श्वास घेता येईना! डॉक्टरांनी धावपळ करून त्याला ऑक्सीजन लावला तिथेच. आय सी यू मध्ये बेड उपलब्ध नव्हता त्यावेळी. मग सर्व यंत्रे तिथेच आणून लावली. गुरमित घामाघूम झाला होता. . . . चार तास त्याने दम काढला. . . “लकवा मार गया क्या मुझे?” तो विचारू लागला. एकटा माणूस, अर्धांगवायू म्हणजे काय ते त्याला ठाऊक होते. . . आयुष्यभर परावलंबित्व!
मी त्याचा मोबाईल मागितला. . त्यात अगदी मोजकेच नंबर. छोटू म्हणून एक नंबर सेव्ह होता. . . “वो हमारे लिये मर गया”. . . . त्या भावाने मला उत्तर दिले. . फोन बंद!
एका सेवाभावी संस्थेविषयी गुरमितला वरवर माहिती होती, त्याने सांगितलेल्या गोष्टींवरून मी इंटरनेटवर अंदाजे शोध घेतला. दिल्लीतील एका संस्थेचे नाव, फोटो दिसले. गुरमितने त्या व्यक्तीला ओळखले. . . “उनसे बात करावो”. . . त्याने विनंती केली! पुढे पंजाबी भाषेत झालेल्या संवादात एवढेच समजले की. . ती संस्था फक्त रस्त्यावर बेवारस सापडलेल्या मानसिक रुग्णांवर मोफत उपचार करते!
“ऐसी हालत में जी के मैं क्या करुंगा?” गुरमित त्यांना विचारत राहिला. “प्राजी. . . . मेरी कुछ मदद करो. . बडी मेहरबानी होग्गी”. . . पण पलीकडून सोरी जी. . . एवढंच ऐकू आलं. “आप पुना में ही किसी से बात करो!”
काहीवेळाने गुरमित ची अवस्था आणखी बिघडली. पण तेवढ्यात आय सी यू मध्ये एक बेड उपलब्ध झाला. . . सर्वांनी मिळून गुरमितला स्ट्रेचरवर चढवले आणि त्या वॉर्ड मध्ये नेले!
थोड्यावेळाने समजले. . . सरदारजी सीरियस झाला आणखी. अंतर्गत रक्तस्राव झालाय. . . अवघड आहे! वॉर्डातील लोक हे ऐकून चुकचुकले!
आय सी यू मधील अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ गुरमित पहात होता. . . त्याला त्याचा एकाकीपणा अधिकच टोचू लागला असावा. . . रुग्णाची जगण्याची इच्छा संपली की औषधे उपयोगाची नसतात!
रात्री गुरमित गेला! अशी अफवा पसरली. . . पण लगेच विरून गेली! कोणतेही रक्ताचे नाते नसलेले लोक क्षणभर मनातून हलले होते. . . सिस्टर आणि कर्मचारी त्यांना अशा बाबींची सवय असली तरी त्यांचे चेहरे बदलून गेले होते. . . . पण सरदार अभी जिंदा है! अशी पक्की बातमी आली आणि सर्वांनी दीर्घ निःश्वास टाकले. . . चला, या मरणाच्या खोट्या बातमीने बिचाऱ्याचे आयुष्य वाढू दे. . . एका मावशींनी देवाला हात जोडून म्हटले!
तीन आठवडे झाले. . . आज अचानक गुरमित जनरल वॉर्ड मध्ये पाय मोकळे करण्यासाठी हळूहळू फिरताना दिसला! अर्धांगवायूने त्याला बरीच सवलत दिली होती. . . उजवा हात अजुनही काहीसा बधीर होता, नीट चालता येत नव्हते. . . पण चालता येत होते हे महत्वाचे! डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, मामा, मावश्या सगळे या तगड्या पण निरागस माणसाला काही कमी पडू देत नव्हते!
गुरमितने मला पाहिले आणि त्याचा चेहरा उजळला. . . त्याने नुकतेच त्याचे लांब केस धुतले होते आणि तो पगडी बांधण्याच्या तयारीत होता! त्याने मला मिठी मारली!
“कुछ खावोगे?” मी विचारले. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. ” नहीं, भाईसाब! खाना आताही होगा! ” तो संकोचून म्हणाला!
“पनीर रोटी?” मी म्हणालो तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. . . गावाकडे असताना आईच्या हातची रोटी त्याला आठवली असावी. . . ट्रक वर असताना ढाब्यावर बाजेवर बसून खाल्लेली पनीर रोटी, दाल तडका त्याला नजरेसमोर दिसला असावा!
“पंजाबी हो. . . पनीर रोटी बिना खाना फिका फिका लगा होगा पिछले महिनाभर!”
मी पार्सलची पिशवी त्याच्या हातात दिली. . . . गुरमित ने माझा हात हाती घेतला. . . . आणि त्याच्या चेहऱ्यावर मला सारा पंजाब हसताना दिसला!
मी म्हणालो. . . सत् श्री अकाल. . . गुरमित म्हणाला. . जय महाराष्ट्र!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈