सुश्री नीता कुलकर्णी
विविधा
☆ “दिवे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
दिवाळी म्हटलं की सर्वांत आधी आठवतात दिवे…
बाजारात कितीतरी प्रकारचे दिवे आलेले आहेत… काचेचे, पितळेचे, चमचमणारे. .
रंगीबेरंगी. . . खड्यांचे, लोलक लावलेले. . . लुकलुकणारे. . . शोभेचे नक्षीदार. . .
हे असे अनेक दिवे मिळतात. ते घरी आणा. . . दारात, खिडकीत, गच्चीत, गॅलरीत लावा. . .
त्यांच्या उजेडाने चैतन्य, आनंद घरभर पसरेल. . . . दिवे हीच तर आपल्या दिवाळीची ओळख आहे. . .
आता यावर्षी अजून एक वेगळा उपक्रम करूया… या दिव्यांबरोबरच अंतरंगात एक ज्ञान दिवा लावूया
नवं काही शिकूया… अगदी फार मोठी गोष्ट शिकायला पाहिजे असे काही नाही…
छोटीशी असली तरी चालेल. . ती पण आनंद देते…
…. एखादी कला आत्मसात करून घेऊया…
…. सामाजिक भान राखून समाजासाठी जमेल तेव्हढे एखादे काम करूया…
… आधुनिक नव विचारांचा. . स्वीकार करूया… हळूहळू त्याची सवय होईल…
… हा संदेश, वारसा पुढच्या पिढीला पण देऊया.
… हा ज्ञान दिवा पेटता राहील. . तो अखंड उजेड पाडेल. . . . आपल्या पुढच्या आयुष्याच्या वाटेवर. . .
त्याच्या प्रकाशात चालणे सुखावह आनंददायी आणि सुरक्षित असेल. . .
मनोनिग्रह, प्रयत्न, सातत्य यांचा अभ्यास, सराव असला की तेवढे तेल या दिव्याला पुरेसे आहे…
दिवाळी संपली तरी सुखावणारा हा ज्ञान दिवा आहे.
अशीच एक… छोटी पणती… आपल्या हृदयात लावूया
… आपलेच अंत:करण उजळणारी शांतपणे तेवणारी. . .
ही दिवाळीच्या चार दिवसांसाठी नाही तर. . . अखंड तेवणारी हवी. .
त्यासाठी जिव्हाळा , दया, माया, प्रेम, आपुलकीची स्निग्धता हवी. . . . मगच ही पणती अखंड जळत राहील. .
कारण हा तेजाचा उत्सव आहे. आपल्याला प्रकाशाची आराधना करायची आहे…. त्यावर काजळी धरू नये म्हणूनही काळजी घेऊया…. आपल्याच शब्दांची …. नाही तरी शब्दांचाच तर सारा खेळ असतो…
” दीपज्योती परब्रम्ह दीपज्योती जनार्दन
दीपेन हरते पापं दीपज्योति नमोस्तुते “
… ह्या दिव्याचं महत्त्व इतकं आहे की या ज्योतीला प्रत्यक्ष परब्रम्ह मानलेले आहे. ती जणू काही परमेश्वर
आहे म्हणूनच तिला नमस्कार करायचा, कारण ती मनातल्या पापाचा आणि अंधाराचा नाश करते. किती विशाल अर्थ सांगितला आहे आपल्या पूर्वजांनी. . . . .
हो. . . पण त्याबरोबर दाराशी अंधारात शांतपणे जळणारी एक मातीची पणती पण असू दे. . . . . तीच तर आपले पाय भक्कमपणे मातीशी जोडून आपल्याला जमिनीवर ठेवते. . . . .
मग लावाल ना. . असा हा स्नेहदिप. . .
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈