श्री आशिष बिवलकर
इंद्रधनुष्य
☆ पत्रदुर्गा नीलाताई – लेखक श्री आनंद देवधर ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆
नीलाताई उपाध्ये यांच्या निधनाची बातमी आज सकाळी समजली आणि मन आपोआपच भूतकाळात शिरले. महिला पत्रकारितेतील एक पर्व संपले.
माझे वडील वि ना उर्फ विसुभाऊ देवधर महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना नीला पाटील त्यांच्या सहकारी होत्या. नीला पाटील म्हणजे शेकापचे ज्येष्ठ नेते दत्ता पाटील यांची भाची. तरुण भारतचे वसंतराव उपाध्ये यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या नीला उपाध्ये झाल्या आणि त्याच नावाने प्रसिद्ध झाल्या
मुंबईच्या पत्रकारितेच्या इतिहासातील पहिल्या पिढीतील दोन गाजलेल्या महिला पत्रकार म्हणजे इंग्रजी पत्रकारितेतील ओल्गा टेलीस आणि मराठीतील नीला उपाध्ये. मराठी पत्रकारितेतील आपले करिअर त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये व्यतीत केले.
ज्या काळात पत्रकारिता ही Male dominated होती. वार्ताहर हे पुरुष असत. त्या काळात नीलाताईंनी ते वर्तुळ भेदले. माझ्या माहितीप्रमाणे रात्रपाळीच्या वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला पत्रकार होत्या. राजकीय पत्रकारिता करता करता साहित्य, कला, चित्रपट आदी क्षेत्रांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली, विपुल लेखन केले आणि महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांना भरभरून खाद्य पुरवले. प्रेमळ परंतु कडक शिस्तीच्या नीलाताई निर्भीड होत्या. सडेतोड बोलत परंतु प्रेमळ होत्या.
“बाळशास्त्री जांभेकर- काळ आणि कर्तृत्त्व ” हे आज दुर्दैवाने आऊट ऑफ प्रिंट असलेले पुस्तक, त्यांचे वरिष्ठ सहकारी दि वि गोखले यांच्यावर लिहिलेले “पत्रकार दि. वि. गोखले व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व” हे चरित्रात्मक पुस्तक आणि प्रतिभावांत कवयित्री शांताबाई शेळके यांच्यावर “शब्दवती शांताबाई” ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके.
मराठी तरुण तरुणींना पत्रकारितेचे धडे देण्याचे नीलाताईंनी केलेले कार्य हिमालयाएवढे आहे. गरवारे व्यवसाय विकास संस्थेसाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले आणि पत्रकारांच्या दोन पिढ्या निर्माण केल्या. कोकण मराठी साहित्य परिषदेसाठीही त्यांनी उत्तम कार्य केले.
दोन व्यक्तिगत आठवणी सांगायच्या मोह अनावर होत आहे. सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर (आता नेमके वर्ष आठवत नाही) मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक होती. त्या वर्षी माझे वडील खजिनदार म्हणून निवडून आले होते. दादांबरोबर मी संध्याकाळी आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात गेलो होतो नीलाताईंनी दादांचे अभिनंदन केले. त्यावेळी कोणीतरी निवडणूक हरले असा उल्लेख आला. त्यावेळी मी दादांना विचारले की “त्यांचे डिपॉझिट जप्त झाले असेल ना?” माझ्या त्या प्रश्नावर नीलाताई खळखळून हसल्या, माझा गालगुच्चा घेतला आणि दादांना म्हणाल्या “विसूभाऊ तुमचा मुलगा चुणचुणीत आहे. ” माझे वय जेमतेम १२-१३ असावे.
सुरुवातीला त्या सायनजवळ प्रतीक्षानगर येथे राहत असत. आम्ही तिघे भाऊ नॉनव्हेज खात होतो. एक दिवस त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी खास आगरी पद्धतीचे मासे खायला बोलवले होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी घरी बनवलेले मासे खाल्ले. कोणतीही गोष्ट जेंव्हा आपण पहिल्यांदा करतो आणि ती आवडते तेंव्हा ती विसरता येत नाही. नीलाताईंच्या हातची “तुकडी” मी कधीही विसरू शकत नाही.
नवरात्राच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर सुरू असतानाच पत्रदुर्गा नीलाताई उपाध्ये यांच्या निधनाची बातमी यावी हा केवढा मोठा दैवदुर्विलास.
नीलाताईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखक : आनंद देवघर
प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर
बदलापूर – मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈