श्री नंदकुमार पंडित वडेर
जीवनरंग
☆ “नारिकेलं समर्पयामि……” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… पुगीफल तांबुलम समर्पयामि
“… अग मंदे! काही विचारू नकोस बाई! सध्याचे आमचे दिवस इतके प्रतिकुल आहेत कि काही बोलायची सोय राहिली नाही.. तुला तर सगळचं ठाऊक आहे कि गं !आमच्या कुटुंबातलं… आमचे हे भिक्षुकीचा त्यांच्या लहानपणापासून व्यवसाय करत आलेत!… आमच्या घराण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे तो!.. सत्यनारायण, लग्न मुंज, वास्तुशांती, ग्रहशांती, एकादशष्ण्या, गणपती, महालक्ष्मी, आभिषेक… एक का अनेक धार्मिक विधीसाठी या पंचक्रोशीत सारखे बोलावणं असतं यांना !.. एव्हढे मोठे प्रकांड पंडित, दशग्रंथी भटजी म्हणून यांची ख्याती आहे कि हे काय मी तुला आता नव्याने सांगायला नको!… पण सांगायचा मुद्दा हा कि हि भटगिरीच आमच्या मुळावरच आली कि गं!.. कालपरवापर्यंत या धार्मिक विधी करीता लागणारं सगळं पूजा साहित्य… नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड, हळद कुंकू, कापूर उदबत्ती, वगैरे साहित्य नेहमीच्या ओळखीच्या दुकानातून आणयाचे!… ते परवा त्या दुकानदाराने यांना आता हे साहित्य देण्यास नकार दिला कि गं!.. म्हणाला, ‘नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड याचं बाजारात अचानक शाॅर्टेज आलयं.. मलाच माल मिळाला नाही तर तुम्हाला कुठून देऊ?… आणि तसं होलसेलच्या दुकानातून माल आणला तरी मला आता तुम्हाला दिवसा ढवळ्या विकता येणार नाही!… पोलीसांची टेहळणी सुरू असते, अश्या समाजविघातक वस्तूंची विक्री कोण करतयं का ते पाहून ;तसा सापडला तर काहीही न विचारता मुद्देमालासकट पोलिस स्टेशनमध्ये नेउन डांबतात.. समाजकंटक या आरोपाखाली… ‘ आमच्या यांनी त्या दुकानदाराला म्हटलं, ‘अरे तुला तर ठाऊक आहे !या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड वगेरेचा मी पूजेसाठी, धार्मिक विधी करीता उपयोग किती वर्षे करत आलोय कि ते!.. आणि या वस्तूं शिवाय पूजाअर्चा विधी कसे होणार!… वस्तूंची टंचाई असेल तर मला चढ्या भावाने दर लावून विकत दे पण नाही म्हणू नकोस!… आता तो नेहमीचाच दुकानदार त्याला का ठाऊक नाही आमचे हे भटजी आहेत ते!.. अगं त्यांच्याच नेहमीच्या घाऊक नि मोठ्या खरेदीच्या जोरावरच तो दुकानाचा अर्धा नफा मिळवत होता… पण आता बाहेरची परिस्थितीच अशी आलीय म्हटली तर त्याला तरी तो काय करणार गं!… आणि आता या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तू अचानक बाजारातून गडप झाल्या तर आमचा पूजापाठाचा व्यवसाय कसा चालायचा?… आमच्या पोटावरच गदा आली कि गं!… तरी आमचे हे डगमगले नाहीत. मोठ्या मार्केट यार्डात जाऊन तिथून या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तूचीं अव्वाच्या सव्वा दराने पोतं पोतं भर खरेदी केली आणि मोटरसायकल वर ठेऊन घरी यायला निघाले… तर वाटेत चौकात सिग्नलला थांबले असता गस्त घालणाऱ्या पोलीस पथकानं यांना बाजूला घेतलं… कसून तपासणी केली आणि….
.. या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या बॅन असणाऱ्या वस्तू एव्हढ्या मोठ्या प्रमाणात घेऊन निघालेला माणूस मुद्देमालासह सापडलेला बघून त्यांना लाॅटरी लागली… त्या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंडांची भरललेली सगळी पोती जप्त तर केलीच!.. शिवाय यांच्या जाबजबानीचा सिलसिलाच सुरू केला… नुसता तोंडा तोंडी होत होता तोवर ठिक होतं गं!… यांनी सुरवातीस पासून त्या पोलीस पथकाला सांगत होते.. ‘ मी साधा पूजापाठ करणारा भटजी आहे.. या भटजी व्यवसायावर माझ्या कुटूबाचा उदरनिर्वाह चालवत असतो.. पण अचानक या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तू बाजारातून गडप होण्याचं कारण काही मला समजलं नाही… नेहमीचा दुकानदार देत नाही म्हणाला… पण या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तूं शिवाय पूजाअर्चा होणार नाहीत म्हणून मी या मार्केट यार्डातून खरेदी केले.. ‘. त्या पोलीसी डोक्याने विचारले पूजाअर्चेसाठी पाच च्या पटीत नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड सारख्या वस्तूं लागतात हे आम्हाला चांगलचं ठाऊक आहे.. आमच्या घरीपण भटजी येऊन पूजाविधी करून जातात तेव्हा ते पाच पाचच नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंड वगैरे आणतात तुमच्या सारखे पोत्यानं आणत नाहीत… तुम्ही पोत्या पोत्यानं या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंडांची खरेदी केलीय… ती पूजेसाठी तर नक्कीच दिसत नाही… तुम्ही ती आणखी कुणाला तरी सप्लाय करणार आहात असं दिसतयं… बऱ्या बोलानं सांगा एव्हढी पोतं पोतंभर घेणारे कोण कोणती आणि किती माणसं आहेत… त्यांची नावं, पत्ता मोबाईल चटचट सांगा.. नाहीतर पोलीसी इंगा दाखवावा लागेल… आमच्या यांनी त्या सगळ्या पोलिस पथकाचे पाय धरून गयावया करत सांगू लागले या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंडांची खरेदी फक्त माझ्या एकट्या साठीच केलीय… मी इतरांना विकत देण्यासाठी म्हणून घेतलेल्या नाहीत… प्रत्येकाला परोपरीने समजावून सांगून बघत होते.. पण पोलिसी खाक्याने ते डोक्यात घेतलेच नाही आणि मग तिथल्या तिथं पोलिसी इंगा दाखवायला सुरवात केली… दिसेल तिथे यांच्या अंगावर प्रत्येकानं आपला दंडूका पाजळून घेतला.. पाठीवर, कमरेवर, पायावर, हातावर.. इतके कळवळून ओरडून सांगत होते कि नाही हो मला यातलं काहीच माहिती नाही तर मी काय सांगू… मी फक्त भटगिरी करणारा साधा माणूस आहे… पण तिथं त्यांचं ऐकून घेणारं कुणीच नव्हतं… मार मारून जर्जर करून टाकलं.. तरीही त्या पोलिसी पथकाचं समाधान झालं नाही.. त्यांनी शेजारच्या आणखी दोन तीन पोलीस बीट मधील पथकाला बोलावून पकडलेल्या यांचा चेहरा दाखवत म्हणाले परवाच्या सुपारी गॅंग, नारळ गॅंग, बदाम गॅंग, खारीक गॅंग, हळकुंड गॅंग पैकी कुठल्या गॅंग चा हा दिसतोय जरा सिसीटिव्ही वरून चेक करा… आता त्या सगळ्या गॅंगच्या माणसांना पकडायला याची मदत घ्या तोपर्यत याला सोडू नका… तिथं जमलेलं तीस चाळीस पोलीसांचं पथकानं यांना पाहिलं.. एव्हाना यांचं सगळं अंग काळंनिळं पडलं गं.. हात नि पायाचं हाडच दुखावलं होतं, सुजलं होतं, तोंडं भोपळ्यासारखं सुजलं होतं.. एका जागी पडून हे मरणप्राय वेदनेचे इव्हळतं होते… त्यातही हात जोडून विनवत होते मला माफ करा मी त्यातला नाही मला घरी जाऊ द्या… आमच्याच भागातले एक बिट मधले पथक तिथं गेलं होतं.. त्यातल्या एकानं आमच्या यांना ओळखलं आणि म्हणाला, ‘आयला गुरुजी तुम्ही कसं काय गावलात या चौकात? यांनी त्याच्या आवाजावरून म्हणाले, ‘ अहो राणे !आता तुम्ही तरी यांना सांगा मी कोण आहे ते? मला मगापासून सुपारी गॅंग, नारळ गॅंग, बदाम गॅंग, खारीक गॅंग, हळकुंड गॅंग पैकी च आहे असं म्हणून माझा पार बुकाणा काढलाय… तेव्हा तुमचं तरी ऐकून मला जर घरी सोडतात का बघितलं तर गरीबावर फार उपकार होतील. ‘.. अगं मंदे! ते राणे अगदी देवासारखे धावून आले बघ त्यावेळी.. त्यांनी तिथल्या हेडसायबाला काहीतरी कानात सांगितलं आणि. सायेब म्हणाला, ‘बरं बरं जा त्यांना घेऊन घरी.. आधी दवाखान्यात नेऊन मलमपट्टी वगेरे करून घे मग घरी सोड… आणि त्यांना म्हणावं सध्याच्या परिस्थितीत संशयजन्य पुरावा सापडल्यामुळे संशयित आरोपी म्हणून पकडले गेले होते त्याची शहानिशा पोलिसी प्रणालीने करुन घेताना हा त्रास तुम्हाला झाला.. पण तुम्ही त्यातले नाहीत याची खातरजमा झाल्यावर तुम्हाला सोडून दिले आहे… झाल्या प्रकाराबद्दल प्रशासन दिलगिर आहे… ‘
त्या देवदूत राणेंनी त्यांना दवाखान्यात नेऊन हे हातापायाला प्लॅस्टर नि औषधोपचार करून घरी घेऊन आले… त्याना तसं पाहिलं सोबत राणे पोलीस बघून तर माझी भीतीची गाळण उडाली.. पण राणेंनी मला सर्व खुलासा केला.. आणि म्हणाले आज जर मी तिथे गेलो नसतो तर गुरूजींचं काय झालं असतं?… आम्ही दोघांनी त्यांचे फक्त पायच धुवायचे बाकी ठेवले होते!… खूप खूप आभार मानले. !.. अगं मंदे तुला सांगते यांच्या हातून आजवर ज्या काही पूजाअर्चा झाल्या देवाची सश्रद्ध सेवा केलीना त्याची आज प्रचिती आली बघं!… राणेंच्या रूपात येऊन देवानं आम्हाला दर्शन नि कृपाप्रसाद देऊन गेला… आता हात नि पाय सध्या प्लॅस्टर मधे बंद आहेत त्यामुळे पूजाअर्चा ही सध्या बंद आहे त्याचं यांना काहीच दुख वाटत नाही… दुख वाटतं ते या नारळ, सुपारी, बदाम, खारीक, हळकूंडांने सुध्दा दुसऱ्या वर मारायला शस्त्रासारखा कसा उपयोग होऊ शकतो… नारिकेलं समर्पयामि पुगीफलम समर्पयामि म्हणतो तेव्हा विधायक शुद्ध भावनेपोटी अर्पण करतो पण विघातक गोष्ट करताना ते संहारक कसे काय बनू शकतात याच प्रश्नात ते अडकून पडलेत…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈