श्री नितीन सुभाष चंदनशिवे
मनमंजुषेतून
☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
(माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.) – इथून पुढे
स्पर्धा संपली. पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले. त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं. मंचावर ते उपस्थित होते. सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला. आणि छातीत धडधड सुरू झाली. त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला. टाळ्या सुरू झाल्या. तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला. त्याच्या हातात ट्रॉफी, गळ्यात शाल, पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं. त्याला तिथेच थांबवला. माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती. सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला. माझं नाव नव्हतं. पोटात अजून गोळा आला. तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला. आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता. मी डोळे गच्च मिटून घेतले. पोटात कळ यायला लागली होती. छातीत धडधड वाढेलेली होती. दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती. आणि कानावर आवाज आला. “आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे, ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे. “टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे. होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे.
टाळ्या थांबत नव्हत्या. आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो. बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली. मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो. फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता. मी खिशातला मोबाईल काढला. आणि दिपालीला फोन केला. पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणली, “चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर, “ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती. मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं, “दिपाली पहिला नंबर आलाय. ” मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी. पण ती तसलं काही बोलली नाही. ती पटकन म्हणाली, ‘ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी. “आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली. ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती. इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती. माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं. मी कसलाच विचार केला नाही. ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं. सगळेजण तोंडाकडे बघत होते. मला काहीच वाटत नव्हतं. मी स्टेजवर ते पाकीट फोडलं. दोन बोटं आता घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या. दहा नोटा होत्या. आणि मी फोन कानाला लावून म्हणलं, “दिपाली, पाच हजार रुपये आहेत. “हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली. त्यावर दिपाली काहीच बोलली नाही. तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला. आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही. फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो. मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही. पण, आयुष्यातला तो पंचवीस सेकंदाचा काळ हा सुवर्णकाळ वाटतो मला. आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं. नंतर हातात ती ट्रॉफी आली. गळ्यात शाल पडली. फुलांचा तो गुच्छ घेतला. आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा. त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही. आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते. फोटोवाला ही रागानेच बघत होता. मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.
घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली. तिला समोसे आवडतात. म्हणून गरमागरम समोसे ही घेतले. तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं. मी अक्षरशा पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो. दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं. आणि म्हणाली, “कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे. ” हुंदका दाटून आला. मला स्पर्धा जिंकल्याचा, पाच हजार मिळाल्याचा, आनंद नव्हताच. मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो. कवी म्हणून जिवंत राहणार होतो. याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो. तिने माझे पाणावलेले डोळे पुसले. तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं. आम्ही दोघेही खायला बसलो. आणि ती म्हणाली, “चंदनशिवे आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं. कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता. तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती. तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. “
सगळी मिठाई दोघांनी खाल्ली. तिने कागद आणि पेन घेतलं. आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली. तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली. आणि “जा घेऊन या लवकर सामान” अस म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली.
आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली. ती अशी….
“माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,
माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात
किराणा मालाची यादी लिहिते,
ती यादीच
माझ्यासाठी जगातली
सर्वात सुंदर कविता असते…
आणि यादीची समिक्षा
फक्त आणि फक्त
तो दुकानदारच करत असतो
तो एक एक शब्द खोडत जातो
पुढे आकडा वाढत जातो
आणि कविता
तुकड्या तुकड्याने
पिशवीत भरत जातो
आयुष्यभर माहीत नाही
पण, कविता आम्हाला
महिनाभर पुरून उरते
कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते”
मित्रहो, संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात. बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात. पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की, संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही. आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे. यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे. कारण, आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.
चालत राहा आयुष्याचे आनंदगाणे हसत हसत गात राहा.
— समाप्त —
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈