श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ३१ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- सुजाता असं काही करणं शक्यच नाही. मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन जाळत राहिला. )
“आता प्रॉब्लेम मिटलाय सर. पैसेही वसूल झालेत”
सुहास गर्देनी सांगितलं आणि मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.
“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत? कसे?कुणी भरले?”
“मी ‘लिटिल् फ्लॉवर’ ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. त्यांनी लगेच पैसे पाठवले. “
ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं मला समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसीव्हर ठेवून दिला. माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देनं बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलंय असंच वाटू लागलं. माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयीत नजरेनं माझ्याकडेच पहात आहेत असा मला भास झाला आणि मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो. माझ्या अस्वस्थ मनात अचानक अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक विचार चमकून गेला आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो. )
“सुजाता, त्यादिवशी निघताना मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ची कॅश तुला दिली तेव्हाच ‘ती मोजून घे’ असं सांगितलं होतं. हो ना?” तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. ” ते पैसे मी स्वतः मोजून घेतले होते. एखादी नोटही कमी असणं शक्यच नाही. खात्री आहे मला. ती तशी असती तरीही मी एकवेळ समजू शकलो असतो. पण पन्नास रुपयांच्या चक्क १७ नोटा? नाही.. हे शक्यच नाही. कांहीतरी गफलत आहे. “
भेदरलेल्या सुजाताचे डोळे भरून आले. माझा चढलेला आवाज ऐकून सर्व स्टाफ मेंबर्स चमकून माझ्याकडे पहात राहिले. सुहास गर्देंची बसल्या जागी चुळबूळ चालू झाल्याचं मला जाणवलं.
“सुहास, कॅश शॉर्ट आहे हे तुमच्या केव्हा लक्षात आलं होतं?”
“टोटल कॅश रिसीट टॅली करताना सुजाताच्याच ते लक्षात आलं होतं सर. ”
“पण म्हणून फरक ‘लिटिल् फ्लॉवर’च्या कॅशमधेच कसा ? इतर रिसीटस् मधे असणार नाही कशावरून?”
सुजातानं घाबरुन सुहासकडं पाहिलं.
“सर, तिच्या काउंटरला शनिवारी खूप गर्दी होती. त्यामुळे तुम्ही दिलेली कॅश आणि स्लीपबुक दोन्ही सुजातानं न मोजता बाजूला सरकवून ठेवलं होतं. गर्दी कमी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तिनं ती कॅश मोजली तेव्हा त्यात पन्नास रुपयांच्या १७ नोटा कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. “
“आणि म्हणून तुम्ही लगेच मिस् डिसोझांना फोन केलात. “
“हो सर”
आता यापुढे त्यांच्यासमोर डोकं आपटून घेण्यात काही अर्थच नव्हता. मिस् डिसोझांना मी तातडीने फोन करणं गरजेचं होतं पण माझं धाडस होईना. स्वतःच एखादा भयंकर गुन्हा केलेला असावा तसं मलाच अपराधी वाटत राहिलं. त्याना फोन करण्यापेक्षा समक्ष जाऊन भेटणंच योग्य होतं. तेही आत्ता, या क्षणीच. पण जाऊन सांगणार तरी काय? रिक्त हस्ताने जाणं पण योग्य वाटेना. त्यासाठीआठशे पन्नास रुपये अक्कलखाती खर्च टाकून स्वत:च ती झळ सोसण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्याकाळी ८५० रुपये ही कांही फार लहान रक्कम नव्हती. आपल्या खात्यांत तेवढा बॅलन्स तरी असेल का? मला प्रश्न पडला. मी आमचं स्टाफ लेजर खसकन् पुढं ओढलं. माझ्या सेविंग्ज खात्याचा फोलिओ ओपन केला. पाहिलं तर नेमका ८५५/- रुपये बॅलन्स होता!
त्याकाळी मिनिमम बॅलन्स पाच रुपये ठेवायला लागायचा. मागचा पुढचा विचार न करता मी विथड्राॅल स्लीप भरून ८५०/- रुपये काढले. पैसे घेतले आणि थेट बाहेरचा रस्ता धरला.
“मे आय कम इन मॅडम?”
मिस् डिसोझांनी मान वर करून पाहिलं. त्यांच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी दिसली. चेहऱ्यावरचं नेहमीचं स्मितहास्य विरुन गेलं. एरवीची शांत नजर गढूळ झाली.
त्यांनी समोर बसण्याची खूण केली.
“येस.. ?”त्यांनी त्रासिकपणे विचारलं.
“मी मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलो होतो मॅडम. आज पहाटे आलो. सकाळी ब्रॅंचमधे गेलो तेव्हा सगळं समजलं. माय स्टाफ शुड नॉट हॅव रिकव्हर्ड दॅट अमाऊंट फ्रॉम यू. आय एॅम रिअली सॉरी फॉर दॅट”
त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या.
“सोs? व्हॉट मोअर यू एक्सपेक्ट नाऊ फ्रॉम अस?”त्यांनी चिडून विचारलं.
मी कांही न बोलता शांतपणे माझ्या खिशातले ८५० रुपये काढले. ते अलगद त्यांच्यापुढे ठेवले.
“व्हाॅट इज धिस?”
“त्यांनी तुम्हाला फोन करून तुमच्याकडून ते पैसे रिकव्हर करायला नको होते. आय नो. बट दे वेअर इनोसंट. प्लीज फरगीव्ह देम. त्यांची चूक रेक्टिफाय करण्यासाठीच मी आलोय. तुमच्याकडून पैसे मोजून मी माझ्या ताब्यात घेतले त्या क्षणीच आपल्यातला व्यवहार पूर्ण झालेला होता. त्यामुळे पुढची जबाबदारी अर्थातच माझी होती. ती मीच स्वीकारला हवी. सोs.. प्लिज एक्सेप्ट इट. “
“बट व्हॉट अबाउट दॅट शाॅर्टेज? समबडी मस्ट हॅव प्लेड अ मिसचिफ. “
“नाॅट नेसिसरीली. ती एखादी साधीशी चूकही असू शकेल कदाचित. आय डोन्ट नो. त्याचा शोध घ्यायला हवा आणि मी तो घेईन”
“दॅट मीन्स यू आर पेईंग धिस अमाऊंट आऊट ऑफ युवर ओन पॉकेट. इजण्ट इट?”
“येस. आय हॅव टू. “
त्या नि:शब्दपणे क्षणभर माझ्याकडे पहात राहिल्या. त्याच्या कपाळावरच्या आठ्या अलगद विरून गेल्या. गढूळ नजर स्वच्छ झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न स्मितहास्य पाहून मी समाधानानं उठलो. त्यांचा निरोप घेऊन जाण्यासाठी वळणार तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं.
“सी मिस्टर लिमये. फॉर मी, हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो ऑफ फंडस् फ्रॉम अॅब्राॅड रेगुलरली. सो एट फिफ्टी रुपीज इज अ व्हेरी मिगर अकाऊंट फाॅर अस. पण प्रश्न प्रिन्सिपलचा होता. ते इंम्पाॅर्टंट होतं. तरीही विथ एक्स्ट्रीम डिससॅटीस्फॅक्शन त्या दिवशी मी त्यांना त्यांच्या मागणीनुसार ८५० रुपये पाठवून दिले. कारण त्याक्षणी आय डिडन्ट वाॅन्ट टू मेक इट अॅन बिग इश्यू. इट्स नाईस यू केम हिअर परसनली टू मीट मी. सो नाऊ द मॅटर इज ओव्हर फाॅर मी. आय रिक्वेस्ट यू… प्लीज हे पैसे घ्यायचा मला आग्रह नका करू. तुम्ही ते मला ऑफर केलेत तेव्हाच ते माझ्यापर्यंत पोचले असं समजा आणि पैसे परत घ्या. यू डोन्ट वरी फॉर माय लॉस. आय ॲम शुअर माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे आॅर अदर”
त्या अगदी मनापासून बोलल्या. त्यात मला न पटण्यासारखं कांही नव्हतंच. पण पटलं तरी मला ते स्वीकारता मात्र येईना.
“मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास आहे मॅडम. माय गाॅड ऑल्सो वील स्क्वेअर अप माय लाॅस इन हिज ओन वे. मी आत्ता हे पैसे स्वतः देतो आहे ते केवळ कर्तव्यभावनेने आणि फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी. प्लीज एक्सेप्ट इट मॅडम. प्लीज. फाॅर माय सेक. “
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈