सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “अजून सारे तसेच आहे…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(पादाकुलक वृत्त)
☆
जरी ना कधी भेटलीस तू
स्पर्श तुझा तो अवीट आहे
सुगंध देही तो जाणवतो
कोंब प्रीतिचा अमिटच आहे॥१॥
*
आभाळ निळे तसेच आहे
रात्र चांदणी मला खुणवते
जरी दुरावा आपल्यातला
तरी मनी तू कशी बिलगते ॥२॥
*
हळूच हसते ती शेवंती
पानामागे लज्जित होते
आठवणीचा झोका येतो
हास्य तुझे मग खळीत येते॥३॥
*
काळा संगे सरले नाही
प्रणयस्मृतींची साथ राहिली
प्रेमांगणात केवळ दोघे
स्वप्ने आता पुन्हा पाहिली ॥४॥
*
सारे अजून तसेच आहे
प्रेम मनीचे ना ओसरले
वाटा असोत वेगवेगळ्या
भास मिठीचे नाही विरले॥५॥
☆
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈