सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
जीवनरंग
☆ दोघी — आई आणि ती… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
फोनची रिंग वाजली तशी तिच्या कपाळावर अठी पडली,.. एवढया घाईत कोण,.. ?नवरा फोन घेऊन स्वयंपाकाच्या ओट्याजवळ आला आणि म्हणाला, ” घ्या तुमच्या मातोश्री आहेत,.. “
ती एकदम कणकेने भरलेला हात हलवत म्हणाली, “आता नको उचलूस मला बोलायला पण वेळ नाही,.. स्वयंपाक, देवीची रांगोळी, नैवेद्य आणि आरती सगळं बाकी आहे,.. कट कर फोन उगाच सकाळच्या घाईत फोन करते ही,.. “.. त्याने नाईलाजाने खांदे उडविले आणि फोन कट केला,..
परत हार करताना वाजला,.. ही फोनकडे बघून नुसती बडबडली, ” आई अग खुप घाई आहे, ऑफिसमध्ये गेल्यावर करते ग माय तुला फोन,… ” तो हसून म्हणाला, “हे फोन उचलून सांग ना,.. ”
ती म्हणाली, “तुला नाही कळणार फोन घेतला की दहा मिनिटं गेलीच समजायची. आज इथे मिनिटांचा हिशोब आहे रे बाबा,.. रोज अंगावर पंजाबी, जीन्स चढवली की निघता येतं. पण ऑफिसमध्ये साडीचा फतवा निघालाय,.. आणि आम्हालाही तेवढाच आंनद छान साड्या नेसण्याचा,.. पण त्यासाठी किमान रोजच्या धावपळीतला अर्धा तास बाजूला काढावा लागतो,.. हिच्याशी आता बोलत बसले तर सगळंच राहून जाईल,.. करेल मी तिला फोन नंतर “…. म्हणत तिने देवीपुढे रांगोळी काढली, तिच्यासाठी वेणी विणली, खमंग तुपावर खिरीचा नैवेद्य झाला,… तिची धावपळ बघून मग गॅलरीत जाऊन त्यानेच फोन घेतला, अगदी काही अर्जंट नाही ना हे जाणण्यासाठी,.. पण तस काही नाही म्हणून मग त्याने तिला सांगितलं देखील नाही पण तिला म्हणालाच, “फोन कर पण आईला नक्की,… “
मंद अगरबत्ती.. किणकिण टाळावर ऊर्जा देणारी आरती झाली,.. देवघरातील देवीला हात जोडताना तो सकाळपासून ऊर्जेने घरभर प्रसन्नता पसरवणाऱ्या आपल्या देवीला म्हणजे गृहलक्ष्मीला निरखत होता,.. साडीत अगदी गोड दिसत होती,.. ती निघणार तेवढ्यात परत आईचा फोन वाजलाच,.. ती पायऱ्या उतरत फोनवर बोलू लागली,.. “आई अग घाईत काय फोन करतेस,.. ? किती धावपळ आहे माझ्या मागे,.. कालपासून नवरात्रामुळे दोन स्वयंपाक सुरू आहेत.. उपवास आणि बिनउपवास.. त्यात सगळी तयारी पूजेची. तुझा जावई काय नुसता सोवळं घालून मिरवतो,.. हार, वेणी, नैवेद्य सगळं बघावं लागत आणि तू अश्या घाईत फोन करतेस,.. आज तर मी माझा उपवासाचा डबा देखील करू शकले नाही,.. अग आज ऑफिसमध्ये कामवाल्या मावशींच्या ओट्या भरायचं ठरलं, त्याच सामान पॅक करत बसले. मग राहिलं उपवासाच थालपीठ करायचं,.. जाऊ दे, आपण रात्री बोलायचं का,.. ? आई सॉरी पण तू समजू शकते तुझ्या लेकीला “.. म्हणत हिने फोन ठेवला देखील.
ऑफिसमध्ये सगळ्यांची एकच झुंबड फोटो काढण्यासाठी, त्या मावशींच्या ओट्या भरण्याची,.. काही चहापाणी पोटात ढकलून सगळ्या परत आपल्या टेबलवर कामाला लागल्या,.. जेवणाची वेळ झाली तसे पोटात कावळे ओरडायला लागले,.. हिने बेल दाबून चपराशी मामाला बोलावलं,.. ” मामा खालून दोन चिप्स आणून द्या ना.. आज डबा नाही आणला गडबडीत,.. ”
मामा म्हणाले, “मॅडम तुमच्यासाठी मघाशीच डबा आला,.. कोण होत माहीत नाही पण तुमचा डबा आहे असं सांगितलं,.. तुमच्या जेवणाच्या टेबलावर नेऊन ठेवलाय मी,..”
हात धुवून ती टेबलाजवळ आली,.. तिने डबा सगळीकडून निरखून पहिला,.. ओळखीचा वाटत नव्हता,.. तो पर्यंत सगळ्या मैत्रिणी जमल्या ‘ चला भूक लागली ‘ म्हणत सगळ्यांनी डबे उघडले,.. तिनेही उघडला,.. राजगिऱ्याचा शिरा,.. थालपीठ चटणी,.. एकदम भरपूर दिलेलं होतं,.. तिने सगळ्यांना वाटलं,.. मनात प्रश्न मात्र कायम होता,.. कोणी पाठवलं असेल? ह्या विचारात तिने शिऱ्याचा पहिला घास घेतला,.. आणि तिच्या तोंडून शब्द आले,.. “आई.. “.. तिला सकाळचं फोनवर केलेलं दुर्लक्ष आठवलं आणि एकदम रडूच फुटलं,.. मैत्रिणींना सगळं सांगितलं,.. सगळ्यांनाच आपली आई आठवली,..
संध्याकाळी घरी येताच नवरोबाने हसून विचारलं, “कसा होता आज फराळ,.. ?”
ती म्हणाली, “तुला कसं कळलं?”
तो हसतच म्हणाला, “मीच तुझ्यापर्यंत पोहचवला तो डबा आणि आता आठ दिवस पोहचवायचा असं माझ्या सासूने कबूल करून घेतलंय माझ्याकडून,…. मग मी तयार झालो, म्हंटल तेवढीच आपल्या लक्षुमीची सेवा,..”
ती एकदम लाजली तो मात्र खळखळून हसला,.. तिने पटकन दिव्यामध्ये तेल घातलं,.. काजळी दूर सारली,.. रात्रीच्या आरतीची तयारी केली,.. आणि देवीला नमस्कार केला तेंव्हा तिला तिथे देवीच्या जागी आईचाच चेहरा दिसत होता,.. तिने आईच्या व्हाट्सअप वर लगेच एक चारोळी पाठवली,..
“तारेवरच्या कसरतीमध्ये
हात दिला तू सावरण्यासाठी
स्त्रीशक्ती ही ताकद आहे,..
एकमेकींना उभारण्यासाठी…”
© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
मो +91 93252 63233
औरंगाबाद
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈