श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ फक्त लढ म्हणा… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(माझी नोकरी गेली आहे, हे त्यांना बहुधा माझ्या तोंडून ऐकायचं असावं. एव्हाना सगळ्या मित्रमंडळीत माझी नोकरी गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.) – इथून पुढे
एके दिवशी माझा शाळकरी मित्र ओमप्रकाशचा फोन आला, “सुधा डियर, माझ्या मुलाचा अकौंटन्सी पेपर अडकलाय रे. परीक्षा एका महिन्यावर आलीय. त्याला जरा गाईड करशील का प्लीज. सध्या तू घरीच असतोस म्हणून….”
‘तू घरीच असतोस’ हे त्याचे तीन विखारी शब्द मला झोंबले. ‘अजिबात जमणार नाही.’ असं सांगून मी रागारागात फोन कट केला. संध्याकाळी सुलभा घरी आली. तिला मी हे सगळं सांगितलं.
ती शांतपणे म्हणाली, “सुधाकर, अहो तुम्ही अकौंट्समध्ये टॉपर होता हे तुमच्या सगळ्याच मित्रांना माहीत आहे. ओमप्रकाश भावजीनी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे मदत मागितली असणार. तुम्हाला खिजवण्यासाठी त्यांनी नक्कीच फोन केला नसणार. तुम्ही ऑफिसमध्ये बिझी असता तर ते अशी मदत मागू शकले नसते. आता तुम्ही घरी आहात म्हणून ते तुमची मदत मागताहेत. एवढाच त्याचा साधा सरळ अर्थ आहे. त्यांच्या मुलाच्या जागी आपली अनुजा असती तर तुम्ही शिकवलं नसतं का? त्याला महिनाभर शिकवा. विद्यादानाचं समाधान काय असतं त्याचा अनुभव तरी घ्या.” तिने माझ्या पाठीवर हलकेच थोपटले.
थोड्या उशीरा का होईना मला सुलभाचं म्हणणं त्या दिवशीही पटलं. ओमच्या मुलाला अकौंटन्सी शिकवू लागलो.
ओमच्या मुलाचा पेपर नुसता सुटलाच असं नव्हे तर त्याला चक्क ऐंशी मार्क मिळाले. रिझल्टच्या दिवशी ओमप्रकाश पेढे घेऊन आला. त्याने मला घट्ट मिठी मारली. ओमने माझ्या खिशात काही नोटा कोंबल्या. मी काढून पाहिले. दोन दोन हजाराच्या पांच नोटा होत्या. ओम व्यापारी माणूस. आपला फायदा झाला की तो दुसऱ्याला वाटा देणारच. पण मला तो अपमान वाटला. केवळ मी बेकार आहे म्हणून तो मला मदत करतोय असं वाटलं.
मी चेहरा वेडावाकडा करीत म्हटलं, “ओम, अरे यार, असा अपमान करू नकोस ना. अरे तुझा मुलगा म्हणजे माझ्या मुलासारखाच ना? त्याचे पैसे काय देतोस?” असं म्हणत मी ते पैसे परत त्याच्या हातात ठेवले.
सुलभाने चहा केला. चहा घेता घेता ओम चाचरतच म्हणाला, “सुधाकर, रागावणार नसशील तर माझं एक काम करशील का?”
मी न बोलता त्याच्याकडे पाहत राहिलो. तोच म्हणाला, “माझ्या फर्मचे अकाऊंट्स तेवढे फायनल करून देशील का? अकाऊंट्समध्ये तू एक्सपर्ट आहेस. सगळ्या नोंदी टॅलीत अपलोड केलेल्या आहेत. सीएकडे वेळ नाही रे. महिन्याखेरीला इन्कम रिटर्न्स भरायचं आहे. बघ, काही मदत करता आली तर!”
सुलभा पटकन बोलली. “भावजी खुशाल पाठवून द्या. त्यांच्या डोळ्यांसमोर आकडे नाचत राहिले ना, की त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं चांदणं आपोआप फुलत जातं.”
ओमला बोलायला हुरूप आला. तो म्हणाला, “वहिनी आजच पाठवतो. पण तुम्ही त्याला सांगा की मी देईन तो मोबदला त्यानं घेतलाच पाहिजे. मी फुकटचे काम करवून घेणार नाही.”
मग मी म्हटलं, “ठीक आहे बाबा, दे पाठवून.”
ओमप्रकाशचे अकौंट्स मी दोन तीन दिवसात फायनल केलं. बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रकाचे प्रिंट त्याच्या हातात ठेवले. तो जाम खूश झाला. इतक्या लवकर काम होईल अशी त्याची अपेक्षा नव्हती. त्याने लगेच पंधरा हजार रूपयाचा चेक माझ्या हातात दिला. नोकरी सुटल्यानंतरची माझी ती पहिली कमाई होती. मी चेककडे पाहत राहिलो.
आम्ही ओमच्या कारने त्याच्या सीएकडे गेलो. बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रकाची फाईल त्यांच्यासमोर ठेवली. ते सगळं पाहून चार्टर्ड अकौंटंट मुरलीधर सरांनी मान डोलावली. ओमप्रकाशने मुरलीधर सरांशी माझी ओळख करून दिली. मी त्याचा जिवलग मित्र असल्याचे आणि मी अकौंट्समध्ये टॉपर असल्याचेही सांगायला तो विसरला नाही.
मुरलीधर सर म्हणाले, “सुधाकर माझ्याकडे प्रचंड काम आहे. अकौंट्स करवून घेण्याच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतल्यानं मला ऑडिटींग आणि टॅक्सेशनकडे लक्ष देता येईनासे झाले आहे. माझ्याकडे स्टाफ आहे. पण त्यांना अजून ती मॅच्युरीटी आलेली नाही. तुम्ही तयार असाल तर फायनल स्टेजच्या आणखी वीस फाईल्स मी तुमच्याकडे सोपवू शकतो. सगळ्या नोंदी तपासून बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रक काढून दिलंत तर मी तुम्हाला एका अकाउंटचे दहा हजार रूपये देईन.” मी लगेच होकार दिला.
मुरलीधर सरांना ऑडिट आणि टॅक्सेशनवरच भर द्यायचे असल्याने त्यांनी चाळीस क्लाएंट्सचे सुरूवातीपासूनचे अकौंट्सच्या नोंदी करण्याचं कामही त्यांनी माझ्याकडे दिले. त्यामुळे मुरलीधर सरांकडचे चार कर्मचारीही माझ्याकडे आले.
आता मला एका ऑफिसच्या जागेची आवश्यकता होती. ती व्यवस्था ओमप्रकाशने पूर्ण केली. आता मला चोवीस तास पुरत नाहीत. प्रचंड काम आहे. वाईट दिवस संपले. आता छोट्याशा फर्मचा का होईना मी मालक झालो आहे.
आज बाबा असायला हवे होते, त्यांना नक्कीच आनंद झाला असता. ते म्हणायचे, ‘सुधाकर, कुठल्या तरी लहानसहान नोकरीचे स्वप्न पाहू नकोस. चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे स्वप्न बघ. गणितातील तुझी गती आणि तुझी चिकाटी तुला नक्कीच यश मिळवून देईल. माझा मुलगा नोकरी करणारा नव्हे तर चार लोकांना नोकरी देणारा व्यावसायिक म्हणून मला पाहायचे आहे. मी तुझ्या पाठीशी आहे.’
कदाचित नियतीला ते मान्य नसावे. वर्षभरातच बाबा गेले. मोठा मुलगा म्हणून नोकरी करण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते, शहरातल्याच कंपनीत अकाऊंटंट म्हणून जॉईन झालो आणि बाबांचे स्वप्न विरून गेले. चार्टर्ड अकाउंटंट होता नाही आलं, पण आज आईबाबांचे एक स्वप्न तरी फळाला आले.
करवा चौथ ही तिथी माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. सुलभा माझ्यासाठी त्या दिवशी व्रत करत नसेल, परंतु तिचा प्रत्येक क्षण माझे योगक्षेम चिंतण्यातच जात असावा. त्यामुळेच तिच्या शब्दांत इतकं प्रचंड बळ येत असावे. जे अंत:करणातून येते तेच समोरच्या अंत:करणाला जाऊन भिडते. असो.
अचानक नोकरी गेल्यामुळे, कोणाही व्यक्तिचे मनोधैर्य कमकुवत होतंं, नाही असे नाही. परंतु त्याचा स्वाभिमान मात्र जिवंत असतो. किंबहुना तो अधिक प्रखर होतो. हे लक्षात असू द्या.
कुसुमाग्रजांच्या “कणा” ह्या कवितेतील उमेद देणाऱ्या शेवटच्या दोन ओळी आठवून पाहा. ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणा ! तुम्ही फक्त लढ म्हणा !!…… एवढेच माझे सांगणे आहे.’
— समाप्त —
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈