डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ तुला शिकवीन चांगलाच धडा … – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
अभिनंदन ! अभिनंदन !!
कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात आपल्या समूहातील जेष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना “ कलावंत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
आजच्या अंकात वाचूया “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ ही त्यांची कथा. (भाग पहिला).
☆ तुला शिकवीन चांगलाच धडा… भाग – १ ☆
“काय करताय तुम्ही. पेपर काय वाचनासाठी घेतला. मी बसलेय इथे एकटी. सोडा तो पेपर आधी. चला गप्पा करूयात आपण ” ” घे बाई नीता, ठेवला पेपर. या क्लिअरींग हाऊसमध्ये विशेषतः दुपारच्या वेळी फार कंटाळा येतो. पेनड्राइव्ह आणि शीट मिळेपर्यंतचा वेटिंग पीरेड फारच कंटाळवाणा होतो. टाईमपास म्हणून वर्तमान पेपर आणलं होतं. सकाळी कामाच्या घाईगर्दीत संपादकीय किंवा इतर महत्वाच्या बातम्या बारकाईने वाचल्या जात नाहीत. म्हटलं चला तेवढा वेळ सत्कारणी लागेल. बोल काय म्हणतेस ” ” काही नाही ” इतक्यात नीताच्या Face book वर मेसेज आला. ” बघा मॅडम फेसबुक वर किती छान चित्र अपलोड केलंय. एक गाय तोंडाने बोअरवेलचा दांडा उंच करीत होती. , त्यातून जी पाण्याची धार मिळत होती, लगेच ग्रहण करीत होती.. पुन्हा दांडा वर करणे, नळातून पाणी येणे आणि तिने ते प्राशन करणे, हा तिचा संघर्ष व्यवस्थित चित्रीत केलेला होता. ” होय गं बाई, मुक्या जनावरांनाही पाण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो आणि ते ही कसे यातून मार्ग काढतात. सिंपली मार्व्हलस ” मी प्रतिक्रिया दिली. आणखी बघा किती नवीन नवीन, सामान्य ज्ञानावर आधारीत माहिती ही मिळते. या माध्यमातून अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतची माहिती तर मिळतेच पण या तंत्र ज्ञानाने जग जवळ करण्याची किमया ही साधलीय. आमच्या व्हाॅटस् अँप अँप्लिकेशनवर आम्हां मैत्रीणींचा बराच मोठा ग्रुप आहे. माझ्या वहिनी, मामे वहिनी, इतर नातेवाईक, फुरसतीच्या वेळी आमच्या मग गप्पा रंगतात या माध्यमातून. भाच्यांचे फोटो पाहाणे, लहान मुलांच्याही गप्पा सुरू होतात आणि एकमेकांना भेटल्याचा आनंद होतो. ” ” होय नीता, मोबाईल, फेसबुक, व्हाॅटस् अप मुळे जग खरंच जवळ आलंय. एकमेकांशी संपर्क वाढलाय. जनजागृती, विचारजागृती वाढलीय. आता बघ ना 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकांचंच उदाहरण घेऊ या. पाचही चरणातील मतदानात प्रत्येक राज्याची टक्केवारी वाढलेली दिसतेय. लोकांना मतदानाचं महत्व पटू लागलेलं दिसतंय. मतदान केल्यास आपल्याला पाहिजे ते सरकार निवडून देऊ शकतो याची जाणीव लोकांमध्ये झाली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या या माध्यमांनी हे काम चोखपणे केलं आहे. ” ” होय मॅडम, बरोबर बोलताय तुम्ही ” इतक्यात नीताच्या मोबाईलचा रिंगटोन वाजला. “होय आई, तू चहा ठेवून दे. मी येतेय दहा मिनिटात. चहा घेतला कि लगेच आँफिसात जाईन ” एव्हढ्यात प्रकाशने पेनड्राइव्ह व शीटचे वाटप केले. नीता व मी बोलत बोलत क्लिअरींग हाऊसच्या बाहेर पडलो ” चला ना तुम्हीही माझ्या घरी. चहा घेऊ आणि लगेच या तुम्ही ” ” अगं नीता मला स्टेट बँकेत टी. टी. घेऊन जायचीय. वेळ थोडासाच शिल्लक आहे. अगदी डाॅट साडेचार वाजता RTGS स्विकारणं बंद करतात ती माणसे. ओ के. बाय, भेटू पुन्हा ” मी माझ्या आँफीसकडे वळले.
नीता गौरवर्णी, मध्यम बांधा, भावपूर्ण बोलके डोळे, काळ्याभोर केसांचा पोनीटेल वळलेला, मॅचिंग ड्रेसवर तशीच टिकली, बांगडी, केसांचा बो सुद्धा त्याच कलरचा, परफेक्ट मॅचिंग सांभाळणारी, हसरी, बोलकी, कोणालाही आपलंस करून घेणारी, वयाची पस्तीशी ओलांडून चाळिशीकडे झुकलेली एक मध्यमवयीन यौवना होती. तिने समाशोधन गृहात ( क्लिअरींग हाऊस ) पाऊल ठेवलं कि चैतन्याला उधाण यायचं. क्लिअरींग हाऊसमध्ये इतर बँकांचे प्रतिनिधीही गप्पांमध्ये सामील होतं. त्यांच्या छेडछाडीला नीताही तेवढ्याच खेळकरपणे उत्तरे द्यायची. हास्याचे फवारे उडायचे. आणि बेरीज वजाबाकीच्या, आकडेमोडीच्या आमच्या कामातही एक चैतन्य, एक उभारी जाणवायची. “
” काय गं नीता, आज थकल्यासारखी दिसतेस. बरं नाही का तुला ?” ” नाही मॅडम, बरं आहे मला. प्रियंकाची परीक्षा सुरू आहे. रात्री थोडावेळ तिचा अभ्यास घेते. माझ्या मोलकरणीचा हात मोडलाय म्हणून सुटी घेतली आहे तिने. घरातील सगळी कामे करतांना दमछाक होते माझी त्यामुळे शारीरिक थकवा जाणवतोय. आई नासिकला भावाकडे गेली आहे, वहिनीचा पाय मोडलाय म्हणून. घरी मी आणि प्रियंकाच आहोत. परवा बाबा येतील आमच्या मदतीला. तोपर्यंत ओढाताण आहे ” ” अगं मग रजा टाकायची ना दोन दिवस. कशाला ताण करून घेतेस. ” मॅडम, वर्षभरात लग्न, सण, समारंभ, दुखणी खुपणी यातही बर्याच रजा जातात म्हणून या कामासाठी मी काही रजा घेतली नाही ” ” ओ. के. काळजी घे स्वतःची. नेहमी हसरी बोलकी तू आज एकदम गप्प वाटलीस म्हणून बोलले मी. खरच जीवनातील एवढे कटु अनुभव, कठीण समरप्रसंग झेलून तू हसत खेळत राहातेस ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. आपले दुःख कुरवाळत न बसता त्याला सामोरं जाणं हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. खरंच सर्व महिलांसाठी तू एक उत्तम उदाहरण आहेस. अभिमान वाटतो तुझा मला.
” काय करता मॅडम, जीवन मोठं क्षणभंगूर असतं आला क्षण आपला म्हणायचा आणि साजरा करायचा, हे तत्वज्ञान शिकवलंय आईने मला तिची सोबत नसती तर केव्हाच कोलमडून पडले असते मी ” ” खरंय, खरंय तुझं म्हणणं ” बोलत बोलत मी ही माझ्या आँफीसकडे वळले.
नीता इंडियन ओव्हरसीज बँकेची कर्मचारी तर मी पंजाब नॅशनल बंकेची कर्मचारी. शहरातील समाशोधन गृहात कामाच्या निमित्ताने आमच्या भेटी होत. या भेटीतूनच मैत्रीचे दृढ नाते निर्माण होत गेले.
नीताच्या घरी आई आणि तिची मुलगी प्रियंका. ः भाऊ व वहिनी नासिकला. त्यांना दोन मुले,. मुले सांभाळण्यासाठी तिचे बाबा नासिकला राहात. बाबा भावाकडे तर आई नीताकडे अशी वाटणी झालेली.
वयाच्या अठरा/एकोणीसाव्या वर्षीचं नीताचं लग्न झालेलं. मुलगा चांगला शिकलेला उच्चपदस्थ अधिकारी. सांगून स्थळ आलेलं. नीताचंही बि. काँम च शिक्षण चालू होतं. मुलाच्या घरी आईवडिल एक लहान बहीण. कुठे कमतरता भासावी असे स्थळ नव्हतेच मुळी. लग्नाची बोलणी झाली आणि एका शुभमुहूर्तावर नीताने अशोकच्या जीवनात प्रवेश केला. एकुलती एक कन्या असल्याने नीताच्या वडिलांनीही सढळ हस्ते खर्च केला होता.
नव्या नवलाईचे नऊ दिवस. नवीन सुनेचे कोडकौतुक धार्मिक सण, समारंभ, देवी देवतांना नवपरिणीत जोडप्याची हजेरी, यात महिना केव्हा गेला कळलेही नाही. नव जीवनाची सोनेरी स्वप्ने सजविण्यात रममाण नीतावर मात्र कुटुंबातून बरीच बंधने येऊ लागली. सुनेने घरातील सर्व कामे लवकर उठून करावीत, नवर्याला हवं नको ते पहावं, सासू सासर्यांची सेवा, जेवणासाठी नवर्याची वाट पाहात थांबणं, याबरोबरच तिने शेजारी पाजारी कोणाशी बोलू नये. घरी कोणी नवीन सुनेसाठी आले तर तेवढ्यापुरते बोलून तिने तेथून निघून जावे. असे दंडक तिला घालून देण्यात आले.
नवीन घर, नवीन माणसे, आता आपण माहेरी नव्हे तर सासरी आहोत. माहेरपणाचे स्वातंत्र्य इथे कसे मिळणार ?अशी मनाची समजूत घालून नीता जीवन व्यतित करीत राहिली.
नीताचे फायनल इयर होते. परीक्षा होती म्हणून ती माहेरपणाला आलेली ” काय गं नीता, अशी मलूल का दिसतेस ? तुझ्या सासरी सगळं व्यवस्थित आहे ना ?” आईच्या प्रेमळ शब्दांनी नीताच्या संयमाचा बांध फुटला होता.
क्रमशः भाग पहिला
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]