श्री सुनील देशपांडे
वाचताना वेचलेले
☆ “दिवाळी… की हॅलोविन ???” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
आमच्या पुण्याच्या घरी सोसायटीतील काल काही लहान मुलं हॅलोवीनचे भुतांचे चेहरे रंगवून “ट्रिक ऑर ट्रीट” असं म्हणत कँडीज मागायला आली होती. त्यावर सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर त्यांच्यातल्या काही मातांनी, “अवर हॅलोवीन गँग, सो क्यूट!” असे फोटो टाकले.
आज सकाळी त्याच ग्रूपवर त्याच फोटोंच्या खाली एका पुणेरी एकारान्त काकांनी हा मेसेज फॉरवर्ड केला. शेवटचे दोन परिच्छेद तर विशेष धमाल आहेत.
असं मनोरंजन फक्त पुण्यातच मिळू शकतं!
“हल्ली गेल्या काही वर्षात हॅलोविन नावाचा विदेशी बिनडोकपणा हिंदूंच्या घराघरात शिरतो आहे…
हाडके, घुबडे, फ्रँकस्तीन, भुते, हडळ ह्यांचे चेहरे, जळमटे, कोळी घरात लावायचे आणि म्हणायचे happy haloween!! 🤦♀️
हिंदूंचा आनंदमय दीपोत्सव साजरा करताना घरातले अमंगल, दारिद्र्य बाहेर जावो.. मंगलमय, लक्ष्मी सोनपावलांनी घरात येवो असे म्हणायचे आणि
दिवाळी नंतर हॅलोविनच्या मूर्खपणाच्या नावाने तीच घाण घरात परत घरात आणायची.. ??
आधी सर्वांगसुंदर सुख- समृद्धीचे प्रतीक नवीन कपडे घालून लक्ष्मी पूजन करायचे पाडव्याच्या दिवशी देवळात जाऊन
“अज्ञानत्व हरोनी बुद्धि मती दे आराध्य मोरेश्वरा
चिंता, क्लेश, दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी”
अशी प्रार्थना म्हणायची नंतर थोड्या दिवसात भुतखेतांचे ड्रेस घालून हिंडायचे आणि त्यांना घरात घेऊन यायचं ही कसली अवदसा आहे??
मुलांना मुंज केल्यावर दोन घरी भिक्षेला जायला लाज वाटते आणि भुतांची चेहरे रंगवून घरोघरी चॉकलेट मागत फिरतात.. ही कसली विकृती साजरी करत आहोत??
आपली मुले हे प्रकार करत असतील त्याचं मूर्खासारखे कोडकौतुक न करता चांगले बदडून काढा.. आणि जे कोण हे करायला उद्युक्त करत असतील त्यांना चांगला दम द्या.. आणि आठवण करुन घ्या आपण थोड्या दिवसांपूर्वी हिंदू धर्मात होतो म्हणून मंगलमय दिवाळी साजरी केली..
परत जर हे प्रकार मुलांकडून करायला लावले तर तुमच्या दारात श्राद्धाचा स्वयंपाक, मिरची लिंबू, काळी बाहुली, पत्रावळीवर गुलाल घातलेला भात असं सगळं आणून ठेवू. हिंदूंमध्ये भुताखेतांची कमी नाही जी विदेशी भूत आयात करायची गरज पडते आहे” 🤣
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈