श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ३२ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- “सी मिस्टर लिमये, फॉर मी हा प्रश्न फक्त पैशाचा कधीच नव्हता. हिअर इज ह्यूज अमाऊंट ऑफ इनफ्लो ऑफ फंडस् रेगुलरली फ्रॉम अॅब्राॅड. हा प्रश्न प्रिन्सिपलचा होता. तरीही वुईथ एक्स्ट्रीम डिससॅटिस्फॅक्शन त्यादिवशी मी त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसार ८५०/-रुपये पाठवून दिले. इट्स नाईस यू कम हिअर पर्सनली टू मीट मी. सो नाऊ मॅटर इज ओव्हर फॉर मी. सो प्लीज हे पैसे घ्यायचा मला आग्रह करू नका. माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे आॅर आदर. “
यात न पटण्यासारखं काही नसलं तरी मला ते स्वीकारता येईना “मॅडम प्लीज. मलाही असाच ठाम विश्वास आहे मॅडम. माय गॉड ऑलसो वुईल स्क्वेअर अप माय लॉस इन हीज ओन वे. प्लीज एक्सेप्ट इट मॅडम. प्लीज फॉर माय सेक”)
त्या हसल्या. अव्हेर न करता त्यांनी ते पैसे स्वीकारले. तरीही ८५०/- रुपये गेले कुठे ही रुखरुख मनात होतीच. पण ती फार काळ टिकली नाही. कारण मी परत येताच सुहास गर्दे सुजाताला घेऊन माझ्या पाठोपाठ माझ्या केबिनमधे आले. जे घडलं त्यात चूक सुजाताचीच होती आणि तिला ती कन्फेस करायची होती.
“समोरची गर्दी कमी झाल्यावर त्या दिवशी सुजाताने ‘लिटिल् फ्लॉवर’ची कॅश मोजायला घेतली होती. ” सुहास गर्दे सांगू लागले. ” पन्नास रुपयांच्या नोटा मोजायला तिने सुरुवात केली तेवढ्यात पेट्रोल पंपाचा माणूस पेट्रोल खरेदीच्या अॅडव्हान्स पेमेंटच्या डी. डी. साठी कॅश भरायला धावत पळत येऊन तिच्या काउंटर समोर उभा राहीला. नेहमीप्रमाणे त्याला डी. डी ताबडतोब हवा होता. कॅश मोजून घेतल्याशिवाय डीडी देता येत नव्हता. कॅश-अवर्स संपत आलेले. त्यात सुजाताला रुटीन मेडिकल चेकअपसाठीची अपॉइंटमेंट असल्याने काम आवरून जायची घाई होती. त्यामुळे ‘लिटिल् फ्लॉवर’ची नुकतीच मोजायला सुरुवात केलेली कॅश नंतर मोजायची म्हणून तिने तशीच काउंटरवर बाजूला सरकवून ठेवली आणि पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली. त्यात नेहमीप्रमाणे एक रुपयापासून शंभर रुपयापर्यंतच्या नोटांचा खच होता आणि त्याही सगळ्या जुन्या नोटा! ती कॅश गडबडीने मोजून झाली तेव्हा तिच्या लक्षात आले की त्यात आठशे पन्नास रुपये जास्त आहेत. नाईलाजाने पुन्हा सगळी कॅश मोजून तिने खात्री करून घेतली आणि मग शिक्का मारलेल्या रिसिटबरैबर जास्ती आलेले ८५०/- रुपयेही पेट्रोल पंपाच्या माणसाला तिने परत केले आणि ‘लिटिल् फ्लावर’ची कॅश मोजायला घेतली. ती कॅश मोजून झाल्यावर त्यात ८५०/- रुपये कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. आधी अर्धवट मोजून बाजूला सरकवून ठेवलेल्या त्या कॅशमधल्या पन्नास रुपयांच्या १७ नोटा पेट्रोल पंपाची कॅश मोजायला घेतली तेव्हा त्यात अनवधानाने मिसळून गेल्याने त्यात ८५०/- रुपये जास्त येत होते. हा घोळ लक्षात येताच सुजाता घाबरली. कारण तोवर पेट्रोल पंपाचा ड्राफ्ट काढायला आलेला माणूस ड्राफ्ट घेऊन परत गेला होता. “
“तो माणूस रोज बँकेत येणार आहे ना? “
“नाही सर. रोज त्यांचे दिवाणजी येतात. शनिवारी ते रजेवर असल्याने दुसऱ्या नोकराला पाठवलं होतं. “
” ठीक आहे, पण पेट्रोल पंपाचे मालक तुमच्या ओळखीचे आहेत ना? त्यांना भेटून त्याच दिवशी हे सांगायला हवं होतं ना लगेच. “
“हो सर.. पण.. ” बोलता बोलता सुहास गर्दे कांही क्षण मान खाली घालून गप्प बसले.
” मी इतर दोन-तीन स्टाफ मेंबर्सना घेऊन शनिवारी लगेच तिथे गेलो होतो सर. पण… “
“पण काय? “
“त्या नोकराने सरळसरळ हात वर केले. ८५०/- रुपये मला परत दिलेच नव्हते म्हणाला. मालकाने त्याला दमात घेतलं तेव्हा पॅंटचे खिसे उलटे करून दाखवत त्याने रडतभेकत कांगावा सुरू केलान्. “
“म्हणून मग तुम्ही मिस्. डिसोझाना फोन केलात? ही चूक कॅश काऊंटिंगमधे झालेल्या चुकीपेक्षा जास्त गंभीर होती सुहास. ” ती कशी हे मी त्यांना समजून सांगितलं. मी त्यांना त्यांचे पैसे परत करायला गेलो तेव्हा तिथं जे जे घडलं त्या सगळ्याची त्यांना कल्पना दिली. ते सगळं ऐकताना सुजाताची मान शरमेनं खाली गेली होती. तिचे डोळे भरून आले होते. ती असहायपणे उठली. न बोलता जड पावलांनी बाहेर गेली.
त्यानंतर पगार झाला त्यादिवशी मनाशी कांही ठरवून सुजाता केबिनचे दार ढकलून बाहेर उभी राहिली.
” मी आत येऊ सर? ” तिने विचारलं. ती बरीचशी सावरलेली होती.
“ये.. बैस. काय हवंय? रजा? ” ती कसनुसं हसली. मानेनंच ‘नाही’ म्हणाली. मुठीत घट्ट धरुन धरलेली शंभर रुपयांची नोट तिने माझ्यापुढे धरुन ती कशीबशी उभी होती.
“हे काय? “
” सर.. ” तिचा आवाज भरुन आला. “तुम्ही होतात म्हणून त्यावेळी मला सांभाळून घेतलंत सर. माझ्याऐवजी तुम्ही स्वतः पैसे भरलेत. त्यावेळेस खरं तर ते मी स्वतः भरायला हवे होते पण तेव्हा तेवढे पैसे नव्हते माझ्याजवळ. आता दर महिन्याला थोडे थोडे करून ते मी परत करणाराय सर… ” ती म्हणाली.
ऐकलं आणि मी मनातून थोडासा हाललो. याच सुजाताबद्दल क्षणभर कां होईना पण माझ्या मनात संशय निर्माण झालेला होता. नशीब रागाच्या भरात मी तो बोलून दाखवला नव्हता. नाहीतर….? नुसत्या कल्पनेनेच मला अस्वस्थ वाटू लागलं. नकळत कां होईना योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याचं समाधान त्या अस्वस्थतेइतकंच मोलाचं होतं! घडून गेलेल्या आत्तापर्यंतच्या या सगळ्या प्रसंगांच्या मालिकेचा हा समाधानकारक समारोप आहे असं मला वाटलं खरं, पण ते तसं नव्हतं. मी सुजाताची समजूत घातली. पैसे परत करायची आवश्यकता नाहीये हे तिच्या गळी उतरवायचा प्रयत्न केला. पण तिला ते पटेना. अखेर मिस् डिसुझांना जे उत्स्फूर्तपणे सांगितलं होतं तेच सुजाताला सांगावंसं वाटलं. म्हटलं, “सुजाता, तुला माझे पैसे परत करावेसे वाटले हेच मला खूप महत्त्वाचं वाटतं. पण अशी ओढाताण करून तू ते पैसे परत करायची खरंच काही गरज नाहीये. तुला माझं नुकसान होऊ नये असं वाटतंय ना? मग झालं तर. मिस्. डिसोझांना सांगितलं तेच तुला पुन्हा सांगतो, तू खरंच काळजी करू नकोस. माय गॉड विल गिव्ह इट टू मी इन वन वे ऑर अदर. माझं म्हणणं नाराजीने स्वीकारल्यासारखी ती उठली. मला वाटलं, या सर्वच प्रकरणाला मी योग्य पद्धतीने पूर्णविराम दिलाय. परंतु ते तसं नव्हतं. तो पूर्णविराम नव्हे तर अर्धविराम होता, हे मला कुठं ठाऊक होतं? प्रत्येकाच्याच विचारांचा आणि मनोभूमिकांचा कस पहाणाऱ्या या प्रसंगांचे धागेदोरे भविष्यात घडू पहाणाऱ्या अतर्क्याशी जोडले गेलेले आहेत हे त्या क्षणी कुणालाच ज्ञात नव्हतं, पण पुढे घडू पहाणारं, माझ्या मनावर आनंदाचा अमीट ठसा उमटवणारं ते अतर्क्य योग्य वेळेची वाट पहात होतं हे पुढं सगळं घडून गेल्यानंतर मला समजलं तेव्हा मी अंतर्बाह्य थरारून गेलो होतो! ! इतक्या वर्षानंतर आज ते सगळं असं आठवणंसुद्धा माझ्यासाठी खूप आनंददायी आहे!
सुजाताला तिची समजूत घालून मी परत पाठवलं आणि कामाचा ढीग उपसायला सुरुवात केली. तो दिवस मावळला. पुढचे कांही दिवस रोज नवे नवे प्रश्न सोबत घेऊन येणारे नेहमीचे रुटीन पुन्हा सुरू झाले. तो प्रसंग पूर्णतः विस्मरणांत जाणं शक्य नव्हतंच. पण तरीही वाढत्या कामांच्या ओघात तो प्रसंग, त्याची जाणीव आणि आठवण सगळंच थोडं मागं पडलं. पुढे बरेच दिवस मधे उलटले आणि त्या प्रसंगाची पुन्हा आठवण व्हायला माझ्या आईचं अचानक माझ्याकडे रहायला येणं निमित्त झालं.
मी सोलापूरला फॅमिली शिफ्ट केलेली नव्हती. पण बऱ्यापैकी मोठी आणि सोयीची जागा भाड्याने घेतलेली होती. कधी शाळेला सुट्ट्या लागल्या की आरती/सलिल, तर कधी शक्य असेल तेव्हा आई तिकडे येऊन रहात. आई आली तोवर ‘लिटिल फ्लाॅवर’च्या घटनेला तीन आठवडे उलटून गेले होते. पण आई येणार म्हटलं तेव्हा त्या घटनेची हटकून आठवण झाली त्याला कारण म्हणजे माझ्या बचत खात्यात शिल्लक असलेले ते फक्त पाच रुपये! त्याशिवाय खिशात होती ती जेमतेम दीड दोनशे रुपये एवढीच रोख शिल्लक. आई आल्यावर आमचा दोन्ही वेळचा स्वैपाक ती घरीच करणार म्हणजे आवश्यक ते सगळं सामान आणणं आलंच. हा विचारच त्या घटनेची आठवण ठळक करून गेला. ‘पण आता ते विसरायला हवं. निदान ते सगळं आईला सांगत बसायला तर नकोच. ‘असा विचार करून पाच-सहा दिवसांनी पगार होणार असल्याने तोवर पुरेल एवढ्याच आवश्यक वस्तू मी आणून दिल्या. त्यानंतर खिशात शिल्लक राहिली फक्त शंभर रुपयांची एक नोट!
त्या शंभर रुपयांच्या नोटेतच पुढे घडू पहाणाऱ्या आक्रिताचे धागेदोरे लपलेले होते हे त्याक्षणी मात्र मला माहित असायचा प्रश्नच नव्हता!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈