श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “अरुणोदय…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
झाडांच्या सावल्या नि कोवळ्या उन्हाचे कवडसे एकमेकांशी छापा पाणी खेळत राहीले तडागाच्या काठावर… वारा हलकासा मंद मंद पणे झाडांच्या फांद्या पानाआडून लपून बसून त्यांचा खेळ शांत चित्ताने बघत राहिला… मातृवात्सल्याने ओतप्रोत भरलेल्या तडागाचे जल त्यांचा हा खेळ चालेला पाहून आनंदाने उमटणारी हास्याची लकेर लहरी लहरीने त्याच्या गालावर पसरून राहिली… निशब्द झालेला परिसर महान तपस्वी प्रमाणे भास्कराच्या आगमानाला पूर्वदिशा लक्षून आपल्या ओंजळीने अर्ध्य देते झाले… पहाटेच्या दवबिंदूच्या शिडकाव्याच्या सिंचनाने सारी कोवळी हिरवीगार तृणपाती सचैल सुस्नात होऊन टवटवीत होऊन गेली… त्यांच्या अग्रा-अग्रावर हट्टी बालकाप्रमाणे पित्याच्या अंगाखांद्यावर बसावे तसे दवाचा नाजूक थेंब मला इथचं बसायच असा हट्ट धरून बसले.. भास्कराची सोनसळी खाली उतरून त्या तृणपातींच्या उबदार गुदगुल्या करून जाताना त्या अग्रावर च्या दव बिंदूला मोत्याप्रमाणे चमचमवीत राहिले… विजयाचा झळाळता शिरपेच मस्तकावर धारण केल्यासारखे ते प्रत्येक तृणपाती वरील दवबिंदू विजयाची मिरवणूक निघावी तसे जयजयकार करत आपापली मस्तके उंचावत राहिली… राज मार्गाच्या दुतर्फा वर सामान्य रयतेने दाटीवाटीने उभे राहून या विजयी सोहळ्याचं विहंगम दृश्य पाहत उभे राहावे तसे झाडाझुडपांची लता-वेलींची फांद्या पाने फुले नि फळे देखिल मानवंदना देण्यासाठी माना लवलवून झुकते राहिले… आणि आणि हळूहळू त्या मार्गावरून अरूणाने आपल्या शुभ्र धवल सप्त अश्वांचा रथ मार्गस्थ केला…. तेव्हा घरट्यातले किलबिल करणारे पक्षी त्या तांबड्या, पिवळ्या रंगीत आकाशाच्या मंडपात मुक्त विचरते झाले… आकाशीचा चंडोल निघाला अरुणाचा दूत होऊन अरुणाची आगमनाची वार्ता घेऊन… चरचरात चैतन्य फुलले… नि वसुंधरेचे कपोल रक्तिमेसारखे लालीने मोहरले…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈