सुश्री नीलांबरी शिर्के
☆ अंधाराचा कावा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
अंधार वाढतो आहे
नीत डोळे उघडे ठेवा
भिववितो बंद डोळ्यांना
तो अंधाराचा कावा – –
*
बंद पापण्या आत
स्वप्नांचा असतो गाव
कणभरही भीती नसते
धाबरण्या नसतो वाव – –
*
अंधारी डोळे मिटले
मन बागलबुवा होते
मग उगा भासते काही
जे अस्तित्वातच नसते – –
*
सरावता अंधारा डोळे
अंदाज बांधता येतो
अंधारात वावरायाला
तो साथ आपणा देतो – –
*
अंधार भोवती फिरतो
वेगळाली घेऊन रूपे
हिमतीचा प्रकाश असता
होते मग सार सोपे – –
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈