श्री मेघःशाम सोनवणे
इंद्रधनुष्य
☆ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों – मूळ हिन्दी व इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों.
परमवीर चक्र…. भारतीय हवाई दल.
निर्मलजित सिंह सेखों यांचा जन्म १७ जुलै १९४३ रोजी पंजाब मधील लुधीयाना जिल्ह्यातील रुरका इसेवाल या गावात सेखों जाट सिख परिवारात झाला होता. त्यांचे वडिल वारंट ऑफीसर (ऑनररी फ्लाइट लेफ्टिनेंट) त्रिलोक सिंह सेखों हेही भारतीय हवाई दलात नोकरीस होते व आई हरबंस कौर या गृहिणी होत्या.
४ जून १९६७ रोजी निर्मलजित सिंह सेखों हे भारतीय हवाई दलात पायलट म्हणून अधिकारी पदावर नियुक्त झाले.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते भारतीय वायुसेनेच्या “द फ्लाइंग बुलेट” या अठराव्या स्क्वाड्रन मध्ये कार्यरत होते.
१४ डिसेंबर १९७१ रोजी श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-86 जेट विमानांनी 26वे स्क्वाड्रन पीएएफ बेस पेशावर येथून उड्डाण केले.
सुरक्षा तुकड़ी चे नेतृत्व सांभाळत फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह तेथे १८व्या नेट स्क्वाड्रन वर तैनात होते.
भारतीय हवाई दल स्थानकावर हल्ला होताच निर्मलजित सिंह सेखों आपल्या विमानासह तयार झाले. तोपर्यंत फ्लाईट लेफ्टनंट घुम्मन ही कंबर कसून तयार झाले होते. थंडीचे दिवस असल्याने अगदी पहाटे च्या वेळी विमानतळावर खूपच धुके होते. त्यामुळे सर्वत्र अंधुक दिसत होते.
सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी चेतावनी मिळाली की शत्रूने आक्रमण केले आहे. निर्मलजितसिंह व घुम्मन यांनी लगेच आपण उडण्यास तयार असल्याचे सांगितले आणि उत्तराची दहा सेकंद वाट बघून मग विमानाचे उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. बरोबर आठ वाजून ४ मिनिटांनी दोन्ही अधिकारी शत्रूचा सामना करण्यासाठी आपापल्या विमानांसह आकाशात होते.
त्यावेळी शत्रूचे पहिले F-86 सायबर जेट भारतीय विमानतळाभोवती चक्कर मारण्याच्या तयारीत होते. धावपट्टीवरुन घुम्मन यांच्या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर निर्मलजित सिंह च्या नेट विमानाने उड्डाण करताच धावपट्टीवर त्यांच्या बरोबर मागे एक बाॅम्ब येऊन पडला.
घुम्मन स्वतः त्यावेळी एका सायबर जेट चा पाठलाग करत होते. निर्मलजित हवेत उडताच दोन सेबर जेट विमानांना सामोरे गेले. यापैकीच एका विमानाने विमानतळावर बाॅम्ब टाकला होता. बाॅम्ब पडल्यामुळे सेखों व घुम्मन यांचा विमानतळावरील संपर्क कक्षाशी संपर्क तुटला होता. बाॅम्ब च्या स्फोटामुळे संपूर्ण विमानतळ धूर व धुळीने व्याप्त झाले होते त्यामुळे दूरपर्यंत काहीच दिसत नव्हते. तेव्हड्यात फ्लाइट कमांडर स्क्वाड्रन लिडर पठानिया यांच्या नजरेत शत्रूची दोन विमाने हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. घुम्मन यांनी ही निर्मलजीत सिंह यांच्या मदतीस जाण्यासाठी तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. तेवढ्यात रेडियो संदेशावर निर्मलजीत सिंह यांचा आवाज़ ऐकू आला… “मी दोन सेबर जेट विमानांच्या मागावर आहे. मी त्यांना परत जाऊ देणार नाही…. “
त्यांनंतर काही क्षणांत नेट च्या हल्याचा आवाज़ आकाशात ऐकू आला आणि आगीने पेटलेले एक सायबर जेट जमीनीवर पडतांना दिसले. तेव्हड्यात निर्मलजीत सिंह सेखों यांनी आपला संदेश पाठविला… “मी लढत आहे व मला खूप मजा येत आहे. माझ्या आजूबाजूला शत्रूंची दोन सेबर जेट आहेत. मी एकाचा पाठलाग करत आहे. दुसरे माझ्या बाजूनेच उडत आहे. “
या संदेशाच्या उत्तरात स्क्वाड्रन लिडर पठानिया यांनी निर्मलजित सिंह यांना सुरक्षेसंबंधी काही सुचना दिल्या. त्यानंतर नेट विमानातून अजून एक राॅकेट उडाले. त्याबरोबरच शत्रूचे सेबर जेट उध्वस्त झाल्याचा आवाज ही आला. त्यांनी अजून एक निशाणा साधला आणि जोरात आवाज करत शत्रू चे अजून एक सेबर जेट ध्वस्त झाले.
थोड्या शांततेनंतर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांचा संदेश पुन्हा ऐकायला आला. ते म्हणाले… “बहुतेक माझे नेट ही शत्रूच्या निशाण्यावर आले आहे. घुम्मन, आता तुम्ही मोर्चा सांभाळा. “
हा निर्मलजीत सिंह यांचा शेवटचा संदेश होता आणि देशाच्या रक्षणार्थ शत्रूच्या विमानांना धूळ चारत वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली.
फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांच्या या अतुलनीय शौर्य व साहसामुळे आणि देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याने भारत सरकार ने वर्ष १९७२ मध्ये युद्धकाळातील सर्वोच्च सन्मानाचे पदक, ‘परमवीर चक्र’ (मरणोपरांत) देउन त्यांचा सन्मान केला.
देशाला त्यांच्यावर गर्व आहे.
— — — — — हे वीर जवान, तुझे सलाम! ! ! ! ! 🇮🇳
हिंदी व इंग्रजी लेखक- अनामिक
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈