डाॅ. मधुवंती कुलकर्णी
विविधा
☆ मराठीचे भवितव्यः आपली जबाबदारी… ☆ डाॅ. मधुवंती कुलकर्णी ☆
“मराठी” शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभा रहातो तो महाराष्ट्र ! कारण महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे. या मायबोलीचे भवितव्य आणि आपली जबाबदारी या विषयावर आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने, डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम यांना अभिवादन करून आपण विचार करूया.
भारतात फक्त तमिळ, तेलगू, संस्कृत, ओडिया, मल्याळम्, कन्नड या सहा भाषांना शासनाच्या निकषांवर आधारित अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण मराठीला “अभिजात भाषेचा दर्जा अद्याप मिळाला नाही याचा खेद अनेक मराठी भाषिकांना वाटतो. मराठीला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी गुजरात, पंजाब, तमिळनाडू, बंगाल, कर्नाटक इ. राज्यांमध्ये मराठी भाषा संतानी पोहोचवली. महाराष्ट्रातील संत साहित्याला आजही जगभरात स्थान आहे. म्हाइंभटांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरांची “माझा मऱ्हाटाचि बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके||” असे म्हणणारी भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी, संत एकनाथांचे, चोखामेळ्याचे अभंग, तुकारामांची गाथा, दासबोध, पतंजली साहित्यावरील ग्रंथ, गोमंतकीय साहित्य, कोकणी साहित्य यांचे मराठी भाषेतील योगदान महत्त्वपूर्ण व दर्जेदार आहे. या सर्वांनी भाषाप्रसारणाबरोबरच समाज प्रबोधनही केले.
एवढा भरीव इतिहास असलेल्या मराठी भाषेला “भवितव्य नाही असे म्हणावे तरी कसे?” अभिजात नाही म्हणून आर्थिक, सांस्कृतिक, गौरवात्मक तोटे असतीलही पण तिचा ऱ्हास कधीच होणार नाही. आपण सर्वानी भाषा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करूया.
कवी सुरेश भट म्हणतात, “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी”! यांच कवितेत त्यांनी म्हणले आहे, “शेवटी मदांध तख्त फोडते मराठी”. सह्याद्रीच्या सिंहाने, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचे तख्त फोडण्याबरोबरच “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदित॥ साहसुनोः शिवस्यैषा मुद्राभद्रायराजते॥” या शिलालेखाची मुद्रा निर्मिती केली आणि “मराठी भाषा शब्दकोश” तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी भाषेतील शब्दांना कितीतरी मराठी प्रतिशब्द दिले. अशी ही महाराष्ट्राची “मराठी मायबोली” उज्ज्वल भवितव्याकडेच वाटचाल करणार हे नक्की.
या उज्ज्वल भवितव्यासाठी शासन, मंत्रीमंडळे, मान्यवर साहित्यिक यांनी पुढील कार्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
१. देशभरात महाविद्यालये, विद्यापिठे यांमधून विविध सांस्कृतिक केंद्रे उभारता येतील.
२. मराठी जागतिक स्तरावर नेण्यासाठी भारताबाहेरील विद्यापीठात, शाळांमधून ऐच्छिक विषय म्हणून मराठी शिकवले गेले पाहिजे. उदा. लंडन येथील विद्यापीठात संस्कृतचे केंद्र आहे.
३. सर्व देशांमधून आज महाराष्ट्रीयन्स आहेत. त्यांच्या मुलांना मराठी शिकण्यासाठी ऑनलाईन सोयीची कार्यवाही झाली पाहिजे. मराठी भाषेसाठी प्रमाणपत्र परीक्षा ठेवायला हव्यात.
४. एकत्र कुटुंब पद्धती मराठी भाषेसाठी अत्यावश्यक आहे. घरात आजी आजोबांनी मुलांवर मराठी भाषेचे संस्कार केले पाहिजेत. यासाठी कथाकथन, भेंड्या खेळणे, ओव्या, उखाणे, म्हणी, हादगा, गणपती गौरी, कवी संमेलन, वाचन कट्टा, ग्रंथालये, भजनी मंडळे, नाटक, सिनेमा यांचा प्रभावी वापर केला पाहिजे.
५. सध्या इंग्रजीला जागतिक भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे मुलांना इतर राज्यांत, परदेशात पाठविण्याचा दृष्टीने इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे कल अधिक आहे. पण “ज्ञानरचनावाद” स्वभाषेतूनच होतो. म्हणून मराठीतून संकल्पनानिर्मिती, आकलन, संकलन इ. गोष्टीवर भर देण्यासाठी पुस्तक निर्मिती आवश्यक आहे.
६. मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या घटते आहे पण घरात अद्याप तरी मराठी बोललं जातं. मराठी विषय म्हणून शाळेत अभ्यास केला जातो या पार्श्वभूमीवर मुलांना मराठी पुस्तके, ग्रंथालये, कार्यक्रम उपलब्ध करून द्यावेत.
७. सर्वच ठिकाणी माध्यमांच्या नको त्या घुसखोरी मुळे योग्य संस्कार मुलांवर होत नाहीत पण याच माध्यमांच्या योग्य वापरातून, मराठी साहित्य प्रसारणातून मुलांमध्ये गोडी वाढविता येईल.
८. शाळांमधून “मराठी भाषा प्रयोगशाळा” निर्मिती करता येईल. मराठीतील उच्चार, पाठांतर, नवनिर्मिती यांवर भर देता येईल. यासाठी शासन अनुदान उपलब्ध झाले पाहिजे.
९. मराठीची गोडी वाढविल्यास विद्यार्थी कविता लेखन, कथालेखन, ललित लेखन, विचार संकलन, संमेलन सहभाग इ. गोष्टी शिकतील.
आणि….
मराठी पुढील पिढीकडे जशी आहे तशी हस्तांतरित होईल. . . मग भवितव्य उज्ज्वलच असेल, नाही का?
© डॉ. मधुवती कुलकर्णी
बेंगलोर
दूरध्वनी ९४०३००६४३६.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈