श्री मेघ:श्याम सोनावणे
💥 मनमंजुषेतून 💥
☆ पुण्य म्हणजे नक्की काय असतं..?… लेखिका : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
लहानपणी अनेकदा ‘असं का करायचं? ‘ या प्रश्नाला उत्तर असायचं “पुण्य मिळतं म्हणून! ” आणि ‘असं का नाही करायचं’ याचं “पाप लागतं म्हणून” असं उत्तर हमखास मिळायचं. पण पाप आणि पुण्य कसं ओळखायचं याचं उत्तर मनाशी निगडित आहे, नव्हे, पाप आणि पुण्याच्या तारा दुसऱ्याच मनाशी जोडलेल्या आहेत हे सत्य समजायला वयाची कित्येक वर्षे जावी लागली. या अशाच दिवसांची ही गोष्ट!
गणपतीचे दिवस आले की मला ती जेमतेम पाच- पावणेपाच फुटाची बटुमूर्ती आठवते. अवघ्या दु:खाचा प्रदेश जिथवर पसरला असावा आणि समस्त सोशीकपणाची सीमा जिथून सुरू होत असावी असा तो समईतल्या सरत्या ज्योतीसारखा चेहरा आठवतो. सुकत चाललेल्या रोपट्यासारखी, विटकरी लुगड्यातली ती कृश देहयष्टी डोळ्यांसमोर येते. दात नसलेल्या तोंडावरचं ते गोड हसू आठवतं. समोरच्या रस्त्यावरून येणारी-जाणारी माणसे बघत, दाराशी एकटीच बसलेली ती दीनवाणी मूर्ती दिसते. पागोळ्यांमुळे छपराखाली खळगाही व्हावा आणि भरूनही निघावा तसं काहीसं होतं.
तर अशा त्या माझ्या आजेसासूबाई, मनूताई! लहानपणी पायाला गळू झालं. त्या काळाच्या उपायांप्रमाणे त्यावर जळू लावली गेली. का तर जखमेतला अशुद्ध द्रव शोषून घेते म्हणून. थोड्या वेळाने ती ओढून काढायची होती पण कामाच्या नादात घरातली मंडळी विसरली, अशुद्ध रक्तानंतर त्या जळवेने पायातले शुद्ध रक्तही ओढून घेतले आणि मनूताईचा उजवा पाय कायमचा अधू झाला. तरीही लग्न झालं, संसार झाला, मुलंबाळं झाली. पण वयाच्या तिसाव्या वर्षीच वैधव्य पदरी पडलं. मुलं शिकली सवरली पण वृक्ष वाढत रहावा आणि त्याच्या बुंध्याशी असलेल्या पाराला चिरा पडत रहाव्यात तसं होत राहिलं. वृक्षाचा पाचोळा, पारावरचं अश्राप देऊळ निमूट झेलत राहिलं.
माझ्या मुलीचं, सोनलचं बारसं झाल्यावर मी आजींना माझ्याबरोबर पुण्याला घेऊन आले. वैधव्य आल्यानंतर त्या काळी ज्या जनरीती पाळल्या जात असत त्या बिनबोभाट पाळणारा, द्रव्यहीन, कुचंबलेला, कित्येक वर्षे घराबाहेर न पडलेला हा एकाकी, लहानखोरा जीव आनंदाने माझ्याबरोबर यायला तयार झाला यामागचे कारण मला सहजी कळण्यासारखेच होते.
जेवायच्या वेळी त्या खाली बसत आणि आम्ही दोघे डायनिंग टेबलवर. असे दोन- तीन दिवस गेल्यावर मला राहवेना. “आजी तुमचा काही असा नियम आहे का की खाली बसूनच जेवायचं? ” जुन्या धारणांना आपला धक्का बसू नये अशा मर्यादेने मी विचारले.
निर्मळ हसून त्या म्हणाल्या, ” नाही ग, तसं काही नाही, पण सवय नाही आणि मला टेबल उंच पडतं ना! “
त्यांच्या उंचीची अडचण लक्षात आल्यावर मी त्यांच्या खुर्चीसाठी एक चौकोनी, जाड उशी करून घेतली आणि माझे मिस्टर त्यांना उचलून खुर्चीत बसवू लागले.
माहेरून मी सी. के. पी. असल्याने मांसाहारी आहे हे त्यांना माहीत होतं. त्यांना वाटलं होतं की माझ्याकडे रोजच तसा स्वयंपाक असणार. दोन तीन दिवस माझ्या ताटात शाकाहारी जेवण बघून, माझ्याकडे पाहात त्यांच्या सायीसारख्या आवाजात त्या मला हळूच म्हणाल्या, ” संजीवनी, तुझ्या पानात ते ‘तुमचं’ काही दिसत नाही? माझ्यासाठी तुझा पोटमारा करू नकोस हो, तुला हवं ते तू आपली खुशाल करून खात जा. “
मी थक्क झाले. ट्रिपला गेल्यावर माझ्या पानातलं नॉनव्हेज पाहून नाकतोंड वाकडं करणाऱ्या, पलीकडच्या टेबलावर जाऊन जेवणाऱ्या काही मैत्रिणी मला आठवल्या. सासऱ्यांना आवडतो म्हणून (वेगळ्या भांड्यांत, आपल्या परवानगीनेच) करावासा वाटणारा सामिष सैपाक सुरू केल्यापासून पार मागची आवराआवर होईपर्यंत जवळच्या देवळात जाऊन बसलेल्या सासूबाई आठवल्या. ही तर माझ्या दोन पिढ्या आधीच्या, शुद्ध ब्राह्मणी संस्कारात वाढलेली बाई! तिचं मऊ मन माझ्या मनाला एखाद्या शीतल झुळुकीसारखं स्पर्शून गेलं आणि डोळ्यात पाणी भरून आलं.
गणपतीचे दिवस जवळ आले होते. आमच्या घराच्या पाठीमागच्या मंडपात सजावटीची तयारी जोरात चालू होती. खिडकीजवळ एक उंच स्टूल ठेवून त्यावर मी त्यांना बसवत असे. तिथून ते सगळे छान दिसत असे. ती सजावट बघताना त्या म्हणाल्या, ” किती वर्षे ऐकत आले पुण्यातल्या गणपतींबद्दल! फार बघण्यासारखे असतात ना? बरं झालं, बसल्या जागेवरूनच या गणपतीचं तरी दर्शन होईल आता मला. ” ऊन-पावसासारखा त्यांच्या चेहऱ्यावर खंत आणि आनंदाचा लपंडाव पाहिला मी. आपल्या पांगळेपणाची इतकी खंत त्यांना आजवर कदाचित कधीही वाटली नसावी.
आमच्या प्रेमनगर कॉलनीतल्या एकांची रिक्षा होती हे मला ऐकून माहीत होतं. मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेले. नवा नवाच संसार होता आमचा. सांपत्तिक स्थिती बेताचीच होती. पण त्यांना म्हटले, “काका, गणपतीच्या पाचव्या दिवशी मला रिक्षेतून माझ्या आजेसासूबाईंना गणपती दाखवायला न्यायचे आहे, दुपारी चार ते साधारण सात वाजेपर्यंत. जमेल का तुम्हाला? त्यांना अधू पायामुळे जास्त चालता येत नाही. ” काकांचा होकार आला. ह्यांनी सोनलला सांभाळायची जबाबदारी घेतली आणि बेत पक्का झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी आजींना म्हटले, “आजी, दुपारी चार वाजता आपल्याला बाहेर जायचं आहे. सोनलच्या बारशाला घेतलेलं निळं इंदुरी लुगडं नेसून तयार व्हा बरं का. “
आजींचा चेहरा कावराबावरा! बिचाऱ्या कोमट आवाजात म्हणाल्या, ” मला फार चालवत नाही ग संजीवनी. कुठं जायचंय? “
“जायचंय जवळच. ” मी म्हटलं.
बरोबर चार वाजता रिक्षा दारात येऊन थांबली. काकांनी आधार देत आजींना रिक्षेत बसवलं. त्यांच्या अंगाभोवती शाल गुंडाळत मी काकांना म्हटलं, “काका ही तुमची आजी आहे असं समजा. जरा हळूच चालवा आणि कमी गर्दीच्या ठिकाणी अशी रिक्षा थांबवा की आजींना रिक्षेतूनच त्या – त्या गणपतीबाप्पांचं दर्शन होईल. जितकं शक्य आहे तेवढं फिरवाल आम्हाला. “
चांगली माणसं अवतीभवती असण्याचा जमाना होता तो! काकांनी रुकार भरत मान हलवली, रिक्षेला किक मारली आणि आमची बाप्पादर्शन टूर निघाली. बरोबर तिघांना पुरेल असा खाऊ डब्यात भरून घेतला होता. पाणी घेतलं होतं आणि फार पाणी प्यायला लागू नये म्हणून लिंबाच्या गोळ्या जवळ ठेवल्या होत्या.
सातारा रोडवरून निघालेली रिक्षा मजल दरमजल करत सिटी पोस्टाजवळच्या दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ येऊन थांबली. जवळपास अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट! आताइतकी अलोट गर्दी होण्याचा काळ नव्हता तो आणि वेळही साडेपाच-सहाची. रिक्षा चौकातल्या उंच स्टेजच्या पायऱ्यांपाशी येऊन थांबली. तो शालीन थाट पाहून डोळे तृप्त झाले. आजच्यासारखी भव्यदिव्य सजावट तेव्हा नव्हती. डोळे दिपवणारा श्रीमंती, भव्य दिव्य देखावाही नव्हता नि दिखावाही नव्हता. त्या मूर्तीचे महात्म्यच कदाचित तेव्हा भाविकांना जास्त मोलाचे वाटत असावे.
स्टेजवर पाच सहा तरुण गप्पागोष्टी करत बसले होते. त्यांनी, रिक्षेतूनच धडपडत दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या, भक्तिभावाने हात जोडणाऱ्या नाजुकशा आजींना बघितले. दोघेतिघे पटापट खाली आले आणि त्यातल्या एकाने लहान बाळाला उचलून घ्यावे तसा, तो चिमणासा देह हातांवर उचलून, पायऱ्या चढून चक्क बाप्पांच्या अगदी चरणांपाशी उभा केला. आम्हालाही वर बोलावले. आजवर जिचे त्यांनी फक्त वर्णन ऐकले होते अशी ती सुविख्यात, भव्य मूर्ती, इतक्या जवळून, याचि देहि याचि डोळा बघताना, तिच्या पायांजवळ डोके टेकवताना आजींच्या सुरकुतल्या गालांवरून घळाघळा आसवांच्या धारा ओघळत होत्या आणि मी बाप्पांच्या ऐवजी आजींचा अश्रूंतून वाहणारा आनंद आनंदाने बघत होते. किती रूपात दिसतो नाही देव आपल्याला?
रिक्षेत बसल्यावरही किती तरी वेळ वाहात होते ते थकलेले वयस्क डोळे! माझा घट्ट धरून ठेवलेला हातच काय ते बोलत होता. मागे वळून काकांनी म्हटले, ” काय आजी, खूश ना? अहो दगडूशेठ गणपतीच्या पायांना हात लावायला मिळाला तुम्हाला! असं पुण्य कुणाला मिळतं का? ”
आजी डोळे पुसत म्हणाल्या, “अहो, माझ्यासारख्या लंगड्या बाईला कधी पुण्यातले गणपती बघता येतील असं जल्मात वाटलं नवतं. देव तुम्हा दोघांचं खूप कल्याण करेल हो! मला देव दाखवलात तुम्ही! “
तोवर न उमजलेली, ‘ एकाच्या आनंदाच्या कारणाच्या तारा दुसऱ्या मनाच्या मुळाशी जुळल्या की तिथे जे झंकारतं ते पुण्य असतं ‘ ही व्याख्या तेव्हा आकळली मला आणि त्यासाठी फार काही तप करावं लागत नाही ही गोष्टही कळलीच! !
लेखिका : सुश्री संजीवनी बोकील
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे .
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈