श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ बालदिन!! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
“मुले ही देवाघरची फुले ” ही काव्यपंक्ती माहीत नसेल असा माणूस शोधूनही सापडणार नाही. लहान मुलांमुळेच घराला घरपण येत असते. साधारणपणे प्रत्येकाने याची अनुभूती कमीअधिक प्रमाणात नक्कीच घेतली असेल. आज बरेचसे मानसोपचार तज्ञ मनावरील ताण हलका करण्यासाठी लहान मुलांशी खेळायला सांगतात किंवा त्याच्या समवेत वेळ घालवायला सांगतात. सर्वांचा अनुभव मात्र हाच आहे की लहान मुलांशी खेळताना आपला वेळ कसा जातो ते कळत देखील नाही. त्यांच्याशी खेळता खेळता आपण सुद्धा लहान होऊन जातो आणि आपल्याला पुन्हा एकदा बालपण अनुभवायला मिळतं आणि तेही अगदी अकृत्रिमपणे.
‘बालदिन’ हा फक्त लहान मुलांसाठीच असेल असं मला तरी वाटत नाही. माझ्या मते याचे दोन भाग करता येतील. एक शरीराने लहान असलेली मुले म्हणजे खरी लहान बालके. आणि दुसरे म्हणजे वयाने वाढलेली, जबाबदारीने मोठी असलेली, कर्तृत्वाने मोठी असलेली आणि तरीही आपल्या मनाच्या एका कप्यात स्वतःचे बालपण जपणारी, निरागस मन टिकवून ठेवणारी आणि उपजत असेलेली बालवृत्ती वृद्धिंगत करून जीवनाचा निखळ आनंद घेणारी.
ज्या घरात भरपूर लहान मुले असत त्या घराला गोकुळ म्हणण्याची आपल्याकडे रीत होती किंवा घराचे गोकुळ व्हावे असेही म्हटले जायचे. घराला गोकुळ म्हटले तर त्या घरासाठी भूषणावह असायचे. त्याचा घरातील कर्त्या मंडळींना सार्थ अभिमान असायचा, आनंद असायचा. गोकुळ जर आपण इंग्रजीत लिहायचे झाल्यास असेही लिहिता येईल. Go cool. जिथे जाऊन मनाला निवांतपणा मिळतो, मनःशांती लाभते, गात्र सुखावतात असे स्थान म्हणजे गोकुळ. बालकृष्णाच्या काळात गोकुळवासियांनी याची अनुभूती घेतली आहे. कृष्णलीला पाहून सारे गोकुळ आनंदात न्हाऊन निघत असे. पूर्वी सारी घरे ही गोकुळच होती. घरातील मुलांची संख्या किती आहे यावर घराचे गोकुळ होत नसते तर त्या घरातील वातावरण, परस्पर स्नेह, नात्यांमधील अकृत्रिम स्नेह, बांधिलकी, निष्ठा महत्वाची ठरते. जोपर्यंत घरात गोकुळ होते तोपर्यंत भारतात मानसिक रुग्ण, कौटुंबिक समस्या फारच कमी होत्या किंवा नव्हत्याच. हे गोकुळ जोपर्यंत कार्यान्वित राही तोपर्यंत भारतातील समाज स्वाथ्य नक्कीच टिकून राहील. अर्थात हे सर्व भारतातच शक्य आहे कारण आपल्याकडे सुदृढ आणि उबदार कुटुंब व्यवस्था आहे.
आज काळ बदलला आहे. जीवनशैली आणि एकूण समाजरचना झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकविण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. कुटुंब व्यवस्था नीट राहिली तर बालसंगोपन उत्तम रीतीने होईल आणि भावी पिढी निश्चित चांगली निपजेल आणि ‘घडेल’. कुटुंब व्यवस्थेत आईबाबांचे कर्तव्य नुसते जन्म देण्यापर्यंत सीमित नक्कीच नाही तर खरी जबाबदारी जन्म दिल्यानंतरच वाढते. सक्षम ‘आईबाबा’ घडवणे ही काळाची गरज आहे आणि हे आज असलेल्या मुलांमधूनच घडणार आहेत त्यामुळे आजच्या पालकांची जबाबदारी निश्चित वाढणार आहे.
आजच्या पिढीला अनेक आघाड्यांवर लढाई करावी लागत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांची जबाबदारी, करिअर, नोकरीचे/कामाचे वाढलेले तास, पैशाने उपलब्ध होत असलेल्या सुखसोयी आणि प्रत्येक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा या सर्वाचा स्वाभाविक परिणाम घरातील बालकांवर देखील होत आहे आणि भविष्यात नक्कीच होईल. खिश्यात वाढलेल्या पैशामुळे मुलांना पैशाने उपलब्ध असलेली सुखं देण्यात आजच्या काही पालकांना आपली इतिकर्तव्यता वाटते, पण मुलांच्या निकोप वाढीसाठी हे घातक आहे. पालकांनी मुलांसाठी निम्मा पैसा आणि दुप्पट वेळ खर्च करावयास हवा. सध्या मुलांसाठी ‘Value Time’ देण्याची एक नवीन संकल्पना मांडण्यात येत आहे. पण सर्वच वेळ हा quality time करता आला तर अधिक चांगले. त्यासाठीच गोकुळ! ! आणि त्यासाठीच उबदार कुटुंब! ! आणिक एक करता येईल की मुलांशी त्यांच्या इतके लहान होऊन आपण त्यांच्याशी संवाद साधला तर मुलं आपली मित्र होतील. (एका सर्वेक्षणानुसार मुलांशी अर्थपूर्ण संवाद साधण्याचे प्रमाण खूप कमी आहे ). आणि मग मुल आपली जबाबदारी (liability) न राहता ती स्वतः जबाबदार (reliable) होतील. आपल्या कुटुंबाचे एक सदस्य बनतील.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्याकडे ‘राष्ट्रीय बालदिन’ बरीच वर्षे साजरा केला जातो. या निमित्ताने शासकीय आणि अशासकीय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याला अनुसरून ‘बालके, लहान मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, त्यांचा विकास व्हावयास हवा’, अशी अनेक वक्तव्य केली जातात. बऱ्याच वेळेस अन्य शासकीय कार्यक्रमाप्रमाणे हा कार्यक्रम देखील ‘उरकला’ जातो.
हा सर्व उपक्रमातील ‘Event’ बाजूला ठेऊन आपण ‘सजग’ होऊन घरात असलेल्या चैतन्यदायी लहान पिढीला साद घालू शकलो तर मग आपल्याला कोणालाही ‘घडवावे’ लागणार नाही, सर्व काही निसर्गक्रमाने होईल. मुलं पालकांवर अकारण आणि अकृत्रिम (Unconditional) प्रेम करतात. ते आपल्या पालकांना आपले आदर्श (idol) मानतात. पालकांनी देखील आपल्यावर तसेच (Unconditional) प्रेम करावे अशी त्यांची माफक अपेक्षा निश्चित असेल. आजच्या बालदिनी हि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु केला तर त्यांच्यासाठी बालदिनाची ही सर्वात मोठी भेट असेल.
‘बाल’ असलेल्या मनाचे बालपण जपून पुढील पिढीच्या पंखांना बळ देण्याचे काम आपल्याला करता आले तर ‘बाल मनं’ कणखर होतील आणि जीवनातील कोणत्याही परिस्थितीत ‘मन’ स्थिर ठेवण्यात यशस्वी होतील.
निकोप मनातून सदृढ कुटुंब घडेल, सुदृढ कुटुंबातून समाज बलशाली होईल आणि बलशाली समाजच गौरवशाली भारत घडवेल !!
भारतमाता की जय।
… सर्वांना बालदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा! ! !
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈