सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “मी आणि… मी !!” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
अध्यात्म आवडे रोजच म्हणते
ऐहिकात मी बुडलेली
राग – लोभ तो मोह नि मत्सर
यातच किती गुरफटलेली ।
*
मला म्हणत मी “मी“ जेव्हा
अहंकार मम उफाळतो
अन “मम“ म्हणते जेव्हा तेव्हा
‘ममत्व‘ हा अर्थच नसतो ।
*
‘मम’ म्हणजे‘ माझे … माझे ‘
माझे हेही.. माझे तेही
‘मी‘ पण केवळ उरते बाकी
दुसरा काही अर्थच नाही ।
*
पोथी-पुराणे रोज वाचते
‘मी‘ वाचते इतके स्मरते
बोध त्यातूनी काही घ्यावा
आठवणीने हेच विसरते ।
*
मग कसे कळावे अध्यात्म
जे ‘आत्म’ च्याही आधी असते
गेले ‘मी‘ च्याही पलीकडे
तिथेच मग ते सापडते ।
*
‘अध्यात्म‘ शब्द हा म्हणू शकते मी
सहजचि येता-जातांना
पण नुसते म्हणून काय करू ‘मी‘
‘मी‘ च्या पुढती पाय जाईना…
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈