श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

😀🐜मुंगीचे तत्वज्ञान 🐜😀  ☆ श्री सुहास सोहोनी

एका मुंगीनं केला नाच —

तिला मिळाले पैसे पाच —

एका पैशाचा बांधला बंगला —

तिन मजल्यांचा मोठा चांगला —

एका पैशाचं आणलं पीठ —

एका पैशाचं आणलं मीठ —

पिठामिठाची केली भाकर —

एका पैशाचा ठेवला चाकर —

एक पैसा रस्त्यात सांडला —

रडुन मुंगीनं हंगामा केला —

जणु लाख मोलाची ठेव —

उडु बघे मुंगिचा जीव —

कसा नशिबाने केला जांच —

केला मुंगिने हुंदके नाच —

पुन्हा मुंगीने केला नाच —

कोणी बघेना, जिवाला आंच —

मग मुंगीनं निर्धार केला —

निवडणुकीचा अर्ज भरला —

झाली आमदार एवढीशी बया —

गेली पालटुन सारी रया —

मग लाचार मुंगळे धावले —

फेर धरून भंवती नाचले —

आणि मुंगीनंही केला नाच —

तिला मिळाले खोके पाच —

कधी पाचांचे पंचविस झाले —

त्याचे दुप्पट दसपट झाले —

मुंगिलाही नाही कळले —

रंगे इंद्रधनूषी कांच —

केला मुंगीनं कथ्थक नाच —

*

 *कशि सरली वर्षे पाच —

कसा थांबला मुंगीचा नाच —

कशि पडली दोनदा धाड —

कसं गावलं मोठं घबाड —

कसा दोन वर्षांचा काळ —

गजाआड जाईना वेळ —

हितचिंतक दूर पळाले —

मित्रांचे शत्रू झाले —

सखि दिसे जरी रस्त्यात

ना दिसे भाव डोळ्यांत —

नच दिसे भेट आनंद —

ना टुकुटुकुचा संवाद —

झाला मुंगीला पश्चात्ताप —

म्हणे चुकांचे भरले माप —

स्मरे पिठामिठाची भाकर —

स्मरे जुनापुराणा चाकर —

स्मरे रस्त्यात सांडला पैसा —

भाग्य घेऊन गेला कैसा —

पुन्हा मुंगीनं निर्धार केला —

सोडली गाडी आणि बंगला —

धरला रस्ता अपुल्या घरचा —

मातीच्या वारुळाचा —

तिथे आप्त सख्या मैत्रीणी —

गेली मुंगी त्यात हरखुनी —

म्हणे मुक्तिचा क्षण तो हाच —

केला मुंगीनं मोराचा नाच —

🌹

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments