श्री मेघ:श्याम सोनावणे
☆ जरब सिंगापुरी… – लेखिका : संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
काही स्मृती मनाच्या पाटीवर लिहिल्या जातात, पुसूनही जातात. काही कातळावरच्या शिलालेखाप्रमाणे कोरल्या जातात. एखाद्या वावटळीने त्या भूमिगत पाषाणावरची माती दूर होते आणि लख्ख दिसू लागते.
वीसपंचवीस वर्षांपूर्वीची अशीच एक गोष्ट ! सिंगापूरच्या ट्रिपमधल्या आमच्या लोकल बसमधला गाइड हिंदुस्तानी वंशाचा होता. त्याचे वाडवडील केरळमधले होते. सिंगापूरमध्ये स्थायिक झालेली ही त्यांची तिसरी पिढी.
उत्तम हिंदी- इंग्रजी बोलणाऱ्या या स्मार्ट अमीरशी आमची चांगली गट्टी जमली. लांबच्या रस्त्याने जाताना आम्हा पर्यटकांचे व त्याचे भरपूर सवालजवाब होत असत.
एकदा कुणीतरी आश्चर्य व्यक्त केले की रस्त्यांवर, चौकात, भर रहदारीच्या ठिकाणीही पोलीस कसे दिसत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर देताना अमीरने जी गोष्ट सांगितली त्याने बसमधले आम्ही सर्व भारतीय थरारून गेलो.
अमीर म्हणाला, “माझी बहीण माझ्या घरापासून साधारण चाळीस मिनिटाच्या रस्त्यावर राहाते. ती एका हॉस्पिटल मध्ये नर्स आहे. जेव्हा तिची नाईट ड्यूटी असते तेव्हा माझी आई तिच्या लहान मुलांसाठी रात्री तिच्या घरी जाऊन राहाते. आईचे आवडते टी.व्ही प्रोग्राम संपले की साधारण आठ वाजता ती आमच्या घरून निघते आणि चालत चालत बहिणीच्या घरी जाते. चालत जाण्याचाच तिचा परिपाठ आहे. या बाबतीत ती आमचे ऎकत नाही.
भारतीय स्त्रियांची दागिन्यांची असोशी तर तुम्हाला ठाऊकच आहे. आम्हा बायकांच्याकडे पाहून डोळे मिचकावत तो म्हणाला. माझ्या आईच्या अंगावर पाचसहा तोळे सोनं कायम असतं. पण ना ती बहिणीकडे गेल्यावर ‘पोहोचले हं’ म्हणून फोन करते आणि ना आम्ही ‘पोहोचलीस ना ग?’ असे विचारायला फोन करतो.”
आमच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून अमीर हसला आणि म्हणाला, “आम्ही तिला अशा वेळी एकटीला कसे पाठवतो? इतके निश्चिंत का असतो याचे कारण जाणून घ्यायचे आहे तुम्हाला?”
आमचा जोरदार होकार आल्यावर त्याने खूप वर्षांपूर्वीची एक घटना सांगायला सुरुवात केली.
“१९६५ साली सिंगापूर मलेशियापासून स्वतंत्र झाले. नवी घडी बसवायची सुरुवात झाली. साधारण तेव्हाची गोष्ट!
सिंगापूरमध्ये एकदा एका महिलेची एका बदचलन माणसाने छेड काढली. तिच्या जवळ येऊन काहीतरी चावट बोलला. तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने लगेचच वाटेवरच्या पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवली.
पोलिसांनी त्याला धरून चॊकीत आणले. खटला झाला. पंधरा दिवसातच शिक्षा जाहीर झाली. फक्त पंचवीस फटक्यांची ! तो गुंड चांगला उंचापुरा, धिप्पाड, बलदंड शरीराचा होता. शिक्षा ऎकून तो हसला. त्याला हजर केले गेले.
या शिक्षेसाठी एक विशेष, कुशल माणूस बोलावला गेला होता. त्याच्याकडे घोड्याच्या मूत्रात भिजवलेला पातळ फोक होता. त्याचे तांत्रिक कौशल्य असे होते की ज्या ठिकाणी पहिला फटका बसला असेल त्याच जागेवर तो नेमका पुढचा फटका मारीत असे.
तो बलदंड माणूस हसत हसत समोर उभा राहिला. आपल्या शक्तीवर त्याचा प्रचंड विश्वास होता. त्याची पँट काढली गेली आणि त्याच्या पुष्ट पृष्ठभागावर, सट्कन वेताचा एक फटका बसला. त्याला काही कळायच्या आतच नेमक्या त्याच जागेवर दुसरा फटका बसला. कातडे फाटून रक्त वाहू लागले आणि कळवळून तो राक्षसी शरीराचा माणूस धाडकन खाली कोसळला. तो किंचाळत होता. नो नो म्हणत होता.
फटके मारणारा थांबला. मलमपट्टी करून त्या गुन्हेगाराला घरी पाठवले गेले. पण जाताना सांगितले गेले की जखम भरली की पुन्हा चौकीत हजर व्हायचे. पंचवीस फटके पुरे होईपर्यंत त्याची शिक्षा पूर्ण होणार नव्हती.
या सर्व शिक्षाप्रक्रियेचा व्हीडिओ केला गेला. शहराच्या चौकाचौकात पडदे उभारून तो आठवडाभर जनतेला दाखवला गेला. भीती अत्तरापेक्षा वेगाने पसरते.”
अमीर पुढे म्हणाला की “पुढच्या शिक्षेचं काय झालं माहीत नाही. त्या माणसाचं काय झालं ते ही माहीत नाही पण त्याचा परिणाम काय झाला ते माहिती आहे. आमच्या स्त्रिया निर्धास्त झाल्या. माझ्या आईप्रमाणे कित्येक स्त्रिया आज रात्रीदेखील बिनधास्त फिरू शकतात. आपले कामधंदे निर्भयपणे करू शकतात.”
अमीरच्या बोलण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मला मायदेशातल्या एका कवीची कविता आठवली की, कोर्टाच्या पायरीवर बसलेल्या सत्तरपंचाहत्तर वर्षांच्या एका वृद्धेला विचारले जाते की तुम्ही इथे कशासाठी बसला आहात? तेव्हा आपले पांढरे केस सावरत ती कोरड्या डोळ्यांनी म्हणते की वयाच्या पंधराव्या वर्षी तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या खटल्याचा आज निकाल आहे.
खिडकीतून बाहेर बघत मी सुन्नपणे बसून राहिले. आमच्या प्रश्नाच्या मिळालेल्या उत्तराने मनात कितीतरी प्रश्नांचे मोहोळ उभे राहिले होते. आज त्यातल्या मधमाशा पुन्हा डंख मारू लागल्या आहेत.
लेखिका : सुश्री संजीवनी बोकील.
प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे