श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “सोळा सहस्त्र एक शतक वरमाला!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ही तर मोठी दिवाळी!
जन्मदात्री धरित्री आपल्याला कधीही मृत्युशय्येवर निजवणार नाही, याची त्याला पुरेपूर खात्रीच होती. मरेन तर तिच्याच हातून… अन्यथा नाही असा त्याचा प्रण होता. आणि ब्रम्हदेवांकडून तसा वर पदरात पडताच तो स्वर्गातील देवांनाही वरचढ ठरला आणि पृथ्वीवर साक्षात ‘नरक’ अवतरला!
त्याचे अपराध शंभरात नव्हे तर सहस्र संख्येने गणले जाऊ लागले होते… सोळा सहस्र आणि वर एक शतक अधिकचे! त्याचा ‘शिशुपाल’ करण्याची घटिका समीप आली होती. मुरा नावाच्या अधमाला लीलया मातीत घालून तो ‘मुरारी’ झाला! पण नरक अजूनही नांदताच होता… ब्रम्हदेवाच्या वरदानाची कवचकुंडले परिधान करून रणात वावरत होता… चिरंजीव असल्याच्या आविर्भावात. इकडे ही सत्याचे भाम म्हणजे प्रकाश अंगी मिरवणारी रणात निघाली होती आपल्या सुदर्शनचक्रधारी भ्रतारासोबत.. तिला रण अनुभवयाचे होते… आपल्या स्वामींना शत्रूशी झटताना आणि विजयश्री प्राप्त करताना याचि देही.. याचि डोळा तिला पहावयाचे होते! ती फक्त दर्शक म्हणून आली होती… पण प्रत्यक्ष युद्धभूमीत तिच्या स्वामींनी चिरपरिचित नीतीने, ‘माये’च्या रीतीने तिला हाती आयुध घ्यायला उद्युक्त केले! तो पृथ्वीचा पुत्र… रावणाची चिता विझून गेल्यावर जणू त्याचाच कुमार्ग अनुसरण्यासाठी मातेला भार म्हणून जन्मास आलेला. पण ही तर स्वत:च पृथ्वीचा अवतार… म्हणजे त्याची आई…. आणि त्याचे अपराध उदंड झालेले… त्याला दंड दिलाच पाहिजे. तसा तिने तो दिलाही! त्यामुळे तिच्यावरचाच भार गेला.
खेळ तो येणेचि खेळावा.. सारे खेळ त्याचेच.. खेळाडूही तोच.. आपण फक्त दर्शक. स्वामींनी सत्यभामेकडून खेळ खेळवून घेतला!
सोळा हजार शंभर अभागी जीव आता स्वतंत्र झाले होते… नव्हे त्यांना प्रत्यक्ष देवाने सोडवले होते त्या नरकातून. पण मानवी जीवनात मानवाला अतर्क्य घटनांना सामोरे जावे लागते… देव असले म्हणून काय… मानव अवतारात अवतारी देवही अपवाद नव्हते! भगवान श्रीरामांनी संसाराचे भोग भोगले होतेच की. कुणा एकाचे बोल ऐकून प्राणप्रिय पत्नी वनात धाडली होती… रामायणानंतर आणखी एक रामायण घडले होते.
नरक तर आईच्या मृत्यू पावून तसा मुक्त झाला होता… पण त्याच्या बंदिवासातील सोळा हजार शंभर स्त्रिया आता विनापाश झालेल्या होत्या. ज्याने स्त्री संकटातून मुक्त केली त्याचे त्या स्त्रीने दास्य पत्करावे असा संकेतच होता तेंव्हा. त्या म्हणाल्या… देवा… आता आम्ही सर्वजणी तुमच्या आश्रित झालेल्या आहोत… जगाचे आणि आमचे आजवर एकच नाते होते… शरीराचे. आणि आम्ही स्त्री जातीत जन्मलो एवढेच काय ते आमचे पातक. जन्मदात्यांनी आम्ही विटाळलो म्हणून आमचे नाव टाकले… आम्ही कुणाच्याही बहिणी उरलो नव्हतो, कुणाच्या पत्नी होऊ शकत नव्हतो… निसर्गनियमाने आई झालोच तरी कुणाचे नाव सांगायचे बाळाचा पिता म्हणून? तो असुर असला तरी त्याचे नाव तरी होते आमच्या नावात… आमच्या इच्छेविरुद्ध. पण आता आम्ही कुणाच्या नावाने जगावे.. पती म्हणून कुणाला कपाळी रेखावे?
धर्माच्या पुनरुत्थानार्थ संभवलेल्या भगवंतापुढे असे धर्मसंकट यावे? या जीवांना आश्रय देणे तर कर्तव्याच. पण त्यांचा प्रश्न? त्याला व्यवहाराने उत्तर देणे अपरिहार्य होते. स्वत: देव यशोदासूत होते तसे देवकीनंदनही होतेच. वासुदेव होते तसेच नंदलालही होतेच!
“तुम्ही आता या क्षणापासून आमच्या, अर्थात द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्या धर्मपत्नी आहात! आणि अखिल जगत या नात्याचा सन्मान करेल.. अशी आमची आज्ञा राहील!
राजयाची कांता काय भीक मागे.. मनाचिये योगे सिद्धी पावे.. अशी त्या सा-या आत्म्यांची गत झाली. एवढी वर्षे नरक भोगला… पण भगवत्कृपा झाली आणि पावित्र्य अंगा आले. आता प्रत्यक्ष देवाच्या नावाचे कुंकू लेवून जगायचे आणि अहेव जायचे! राजाची मुद्रा उमटवलेले साधे कातडे जरी असले तरी ते व्यवहारात सुवर्णमुद्रेसारखे चालून जाते.. मग आम्ही तर जिवंत देह आहोत.. आमचा धनी, आमचा स्वामी एकच… श्रीकृष्ण! जगताच्या दृष्टीने हे विवाह असतील… या संस्कारातून कामवासनेचा गंध येईलही एखाद्या घ्राणेन्द्रीयास! सर्व भोगांच्यामध्ये राहूनही नामानिराळा राहणारा हा… लांच्छन बरे लावून घेईल? रुक्मणि, जाम्बवन्ती, सत्यभामा, कालिन्दी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा और लक्ष्मणा अशा आठ सर्वगुणसंपन्न भार्या असणारा राजस सुकुमार मदनाचा पुतळा आमच्या सारख्या चुरगळलेल्या फुलांची माला का परिधान करेल? देवाच्या चरणावर वाहिलेली फुले कायमची सुगंधी होऊन राहतात.. त्यांचे निर्माल्य नाही होत!
आम्हा सर्वजणींचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची त्याची हे कृती न भूतो न भविष्यती! मानव्याच्या दृष्टीने ही अलौकिक कृती म्हणजे विश्वाने उदरात सामावून घेतलेल्या सहस्र आकाशगंगाच म्हणाव्यात.
भोगी म्हणून अज्ञानी जीव उपहास करु शकतील हे काय त्यांना ज्ञात नसेल? पण कर्मसिद्धांत सांगणारे हृद्य फलाची चिंता का वाहील? देवाने ज्याला आपले मानले त्याचे इह आणि परलोकीही कल्याणच होते! त्याची “मी स्वामी पतितांचा” ही उक्ती सिद्ध करणारी ही कृती म्हणूनच वंदनीय आणि अनुकरणीय!
मानव की परमेश्वर? या प्रश्नाने त्या युगातही काही शंकासूर ग्रस्त होते आणि या युगातही आहेतच! पण ज्याला कीर्तीचा मोहच मुळी नाही… आम्हा पतितांचे रुदन तो केवळ ऐकत स्वस्थ बसू शकणा-यांपैकी खचितच नव्हता. कर्तव्यासाठी कलंक साहण्याचे सामर्थ्य अंगी असणारा तो एक समर्थ होता. आम्हां पतितांना संजीवन देण्यासाठी त्याने कलंक आदराने ल्याला… हलाहल प्राशन करून देवेश्वर झाला… ज्याने बाल्यावस्थेत धेनू राखल्या… त्याचे हृदय वत्सल धेनूसम असावे, यात नवल ते काय?
कौरवांच्या सभेत याच द्वारकाधीशाने एका द्रौपदीला वस्त्रे पुरवली यात म्हणूनच आश्चर्य वाटत नाही!
(दीपावली दरम्यान येणारी चतुर्दशी लहान दिवाळी म्हणून उल्लेखिली जाते. खरे तर हाच दिवस ख-या दिवाळीचा मानला जावा, असे वाटून जाते. अशी अलौकिक घटना या दिवशी श्रीकृष्णावतारात घडली… समाजबहिष्कृत थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल सोळा हजार शंभर स्त्रियांना एका सर्वशक्तीमान दैवी अवतारीपुरुषाने पत्नी म्हणून स्विकारणे ही घटना सर्वार्थाने असामान्य! देवाचा माणूस झाला किंवा माणसाचा देव झाला या चर्चेपेक्षा माणसातले देवत्व कर्मातून सिद्ध करणारा मनुष्य देवच! भगवान श्रीरामांचे चरित्र व्यवहारात अनुसरण्यायोग्य आहे, पण भगवान श्रीकृष्ण चरित्र प्रत्यक्षात अनुसरणे केवळ अशक्य आहे, असा मतप्रवाह आहे. पण श्रीकृष्ण परमात्याची पतितोद्धाराची कृती अनुकरणीय नाही का? असो. अधिकाराविना बरेच लिहिले आहे. महान गीतगोविंदकार कवी मनोहर कवीश्वर यांनी ‘माना मानव वा परमेश्वर’ हे खरोखर अप्रतिम रचनेतून प्रत्यक्ष श्रीकृष्ण चारित्र्य नजरेसमोर उभे केले आहे. हे विचार लिहिताना त्यांच्याच शब्दांचा आधार घेतला आहे, हे लक्षात येईलच. यात इदं न मम अशी भावना आहे. जय श्रीकृष्ण.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈