श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ अभिजात म्हणजे ? अजिबात माहित नाही… – लेखक – श्री अविनाश सी. कुलकर्णी ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

पूर्वी पुण्यामध्ये काही टपर्‍यांवरती पाट्या पाहिल्या की वाचून हसू यायचं. यात लिहिलेल असायचं शिव्या द्या पण मराठीत. आपल्या भाषेविषयी प्रेम व्यक्त करणार्‍यांनी घेतलेली ही एक भूमिका म्हणता येईल. मराठीवर प्रेम असणारा महाराष्ट्रात माणूस नाही असं होणार नाही. माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृताते ही पैजा जिंके, असेही मराठी विषयी आदर व्यक्त करताना म्हटलं जातं. अलीकडेच आपण ऐकलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने याबाबतची घोषणा नुकतीच केली. मराठी बरोबरच पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याचे सांगण्यात आलं. याआधी तमिळ भाषेला सर्वप्रथम 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. देशात आता एकूण 11 अभिजात भाषा झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक, मराठी प्रेमी मंडळी गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील होते. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा अनेक राजकीय पक्षांनीही केला होता. आता हा दर्जा मिळाला आहे पण म्हणजे नक्की काय? हे अनेकांना ज्ञात नाही. मराठीला काहीतरी सन्मान मिळाला आहे आणि हा एक आनंद व्यक्त करण्याचा मुद्दा आहे असं अनेकांना ज्ञात आहे. अनेक मराठी साहित्यिकांनीही आपल्या परीने या अभिजात भाषा प्रकरणाचे विश्लेषण केलं आहे. अभिजात भाषा कशी ठरवावी याविषयी 2004 साली नियम तयार केले गेले. त्या भाषेतील ग्रंथांची पुरातनता आणि हजार वर्षाच्या इतिहासाच्या नोंदी असणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. प्राचीन साहित्य ज्याला मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाईल त्याचबरोबर साहित्य, परंपरा मूळ असली पाहिजे. ती दुसर्‍या भाषेतून घेतलेली नसावी वगैरे. तमिळ भाषेला अभिजात भाषा म्हणून ग्राह्य धरले गेलं. संस्कृतलाही हा दर्जा मिळाला. आता तब्बल वीस वर्षांनी मराठी भाषेला अभिजात भाषा ठरवली गेली. गेले काही दिवस हा विषय अजिबात चर्चेत नव्हता. अभिजात हा उच्चारही आपल्यापैकी अनेकांना अजून जमत नाही. बरेच जण अजिबात, अभिताजी वगैरे वगैरे म्हणतात. जाणीवपूर्वक कोणी मराठीची अवहेलना करत नाही पण आपल्याकडे गावनिहाय मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रत्येक गावचं, शहराचं एक भाषा वैशिष्ट्य आहे. पण हे सारे मराठमोळे आपण एकत्रित आहोत. मराठीचा उच्चारही म्हराठी, मरहठ्ठी वगैरे करणारे आहेतच. पुण्यामध्ये मराठीमध्ये वेगवेगळ्या सूचना, पाट्या हे आपण सोशल मीडियामध्ये पाहतो. अनेक मराठी शिकवणारी मंडळी आहेत ते अधिकाधिक मराठी वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्या हिंग्लिश, हिंदी, उर्दू याचा प्रभाव असणार मराठी असल्याचं दिसतं. हल्ली तर विविध दूरचित्रवाण्यांवर मराठीचं पार पोस्टमार्टम करून टाकलं आहे. आता पहा शवविच्छेदन असा शब्द आपण वापरला असता तर हा शब्द अनेकांना रुजूलाही नसता. रेल्वेला अग्नीरथ म्हणणार्‍यांकडे आपण ग्रामीण भागातून आला की काय अशा नजरेतून पाहतो. जगातील अकरा कोटी लोकांची मराठी भाषा असून जागतिक क्रमवारीत मराठी 15 व्या स्थानावर येते. जवळपास अडीच हजार वर्ष मराठी भाषा जुनी असल्याचं सांगितलं जातं. 2012 साली प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. भाषा ही संपर्काचं साधन आहे. एकमेकांचे विचार आपल्याला ज्या बोली भाषेमध्ये पटतात ते आपण ऐकले पाहिजेत. भाषेचा अभिमान असायला हरकत नाही. तिचा आदर केला पाहिजे पण इतरांचा अनादर करण्यासाठी याचा वापर होता कामा नये. मराठी भाषा ही अत्यंत सुंदर आहे. अनेकदा मराठी भाषेमधील शब्दांचे अनेक अर्थ निघतात. अगदी उपरोधित भाषा म्हणूनही अनेक जण मराठीचा उल्लेख करतात. महाराष्ट्रात शिवसेनेने मुंबईमध्ये त्याकाळी मराठी विषयी आग्रही भूमिका घेतली. आज आपल्या प्रचलित जीवनामध्ये शुद्ध मराठी वापरणारे कमीच आहेत. अनेकदा आपण वापरण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याला ती समजेल असं नाही. इंग्रजी, हिंदीमधील शब्द आपण मराठीमध्ये प्राधान्याने वापरतो. इंग्रजी येत नाही याचा न्यूनगंड बाळगणारे आहेतच. आज जगभरातील अकरा कोटी लोक सोडले तर इतरांना मराठी येते कुठे? असा प्रश्न आपण मनाला विचारला पाहिजे. मराठी येत नाही म्हणून त्यांचं काही अडत नाही तसे इंग्रजी येत नाही म्हणूनही आपलंही कधी काही अडलं नाही. मराठी भाषा विपुल आहे. आपलं म्हणणं दुसर्‍याला पटतयं, संवाद साधला जातोय, जवळकी येतेय मग हि भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. या भाषेबद्दल आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न अभिजात दर्जा मिळाल्यानं मिळालाय.

लेखक : अविनाश सी. कुलकर्णी

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments