प्रा. भरत खैरकर
🌸 विविधा 🌸
☆ “खंडाळ…” ☆ प्रा. भरत खैरकर ☆
☆
घराच्या पडलेल्या भिंती बुरुजाची आठवण करून देणा-या.. त्यावर वाढलेलं.. वाळून गेलेलं गवत.. हिरवळ चिकटवल्यासारखा भिंतीचा हिरवा रंग ..अधून मधून पडलेली ढेखळं.. त्यात न पोहोचणारी सूर्याची किरण.. आणि गालावरच्या खडीसारखं अंधार सावल्यांचा त्यातलं वास्तव्य ..ही सारी खंडाळ्याची सौंदर्य स्थाने!
ह्या खंडाळ्याभोवती अनेक कथा आहेत .मातीच्या ढिगार्याखाली धनाचा हंडा आहे आणि त्याचा प्रकाश रात्री काही क्षणापुरताच पडतो. ज्याच्या नशिबात तो प्रकाश असेल तो त्याला दिसतो. मात्र हंडा दिसत नाही वगैरे. हा प्रकाश त्या धनावर लक्ष ठेवणाऱ्या शेषनागाच्या मस्तकावरचा मनी चमकला की पडतो. रात्री बेरात्री हा नाग बाहेर पडतो.. मोहल्लातल्या तिसऱ्या पिढीने त्याला पहिल्याच सांगतात. देशमुखाचा वाडा असतांना जशी या ठिकाणी रौनक होती, तशी आता राहिली नाय !असे म्हातारे सांगतात.
देशमुख बुढीची जमा असली तरीपण बुढाचं कारभारी होता.. चांगला ५० जणांचा कुटुंब कबिला असलेला तो वाडा होता म्हणे.. पण आज एक म्हणून शिल्लक नाही.. कशी राहणार पडलेल्या घरात आणि देशमुखकी थाट आता थोडीच राहिला शिल्लक ?देशमुख नागपूरला गेला मात्र त्यानं जागा विकली नाही. ती खंडाळ्याच्या रूपात गावाच्या मधोमध आजही तशीच आहे.
रात्रीच्या वेळेला खंडाळ्याच्या बुरुजावरल्या बाभळीवर घुबडांचे घुत्कार ऐकू येऊ लागले की रडणाऱ्या मला आई म्हणायची ‘भूत आलं रे बाळू बाभळीवर.. रडणाऱ्या पोरास्नी नेते बरं आणि उलटं टांगते रात्रभर बाभळीवर.. झोप बघू आता.’ आईच्या ह्या फुसक्या धमकीचा माझ्यावर जबरदस्त परिणाम व्हायचा. मी श्वास घेताना सुद्धा तो त्या बाभळीवरल्या भुताला ऐकू जाईल म्हणून दाबून ठेवायचो आणि मग गुदमरायला लागलं की आईच्या कुशीत तो श्वास दडवायचो..खंडाळ्याची काळीबाभूळ साऱ्या मोहल्यातील पोरांना चूप ठेवण्यासाठी वापरलेला हुकमी एक्का होता. लहानपणी लपाछपी खेळण्यासाठी खंडाळं आम्हांला जणू पूर्वजांकडून मिळालेलं वरदान ठरलं होतं. खंडाळ्यात लपलं की खंबा वाजवायला जाणाऱ्या गड्याला तो परतेस्तोवर कुठे गेले? याचा पत्ताच लागायचा नाही आणि तो चुकून त्या खंडाळ्यात घुसलाच तर पोरं त्याला विविध आवाज काढून आपापल्याकडे त्याचं लक्ष वेधयाचे आणि गोंधळलेल्या त्याला अशा मध्ये” रेश” बसायची. विचारा पुन्हा डाव द्यायला म्हणून खंब्याकडे जायचा .. पुन्हा तेच त्याच्यावर ‘ रेश’ यायची तो चिडायचा आणि मग खंडाळ्यात लपायचं नाही बा.. नाहीतर मी खेळत नाही.. म्हणून पूर्णविरामापर्यंत पोहोचायचा ..पण पोरं कुठे सोडतात ‘डाव ..डाव.. पचव्या ..सुपाऱ्या गिटक्या ..’ म्हणून त्याची मिरवणूक काढायचे ..त्याला भंडावून भंडावून सोडायचे.. मग खूप चिडलेला तो ‘साले ,हुटींनचेहो, लपा बरं आता.. घ्या बर आता.. म्हणत पुन्हा धावतच खांब्याकडे पळायचा.
मोठ्यांना खंडाळ्याबद्दल काय वाटतं कुणास ठाऊक? मात्र आमचं ते खंडाळ जीव की प्राण होतं.. त्याच्यावर आम्ही काय काय नाही म्हणून खेळलो.. लपाछपी, किल्ला किल्ला, वाडा वाडा, चोर पोलीस, भाजीपाला, टिप्पर गोटी..बाजार बाजार, बाहुला बाहुली सुद्धा ! पडलं धडलं तरी येथील माती आम्हांला जास्त मार लागू देत नाही.. पडलेल्या जागी” थू थू” करून थुंकायचं आणि जोराने उजवी लाथ आपटून पुन्हा स्वतःलाच लगावून घ्यायचं .. अन् पडलेल्या जागेचा कसा बदला घेतला म्हणून खुश व्हायचं.. बस एवढं केलं ना तर मार म्हणून मुद्दाम लागतच नाही.
रात्री अंगावर घुबड बसणाऱ्या काळ्या बाभळीची मात्र दिवसाच्या उजेडात मुळीच भीती वाटत नसे.. तिची खंडाळ्यात पडलेली मोरपंखी अंधार सावली आम्हां मुलांना मायेचा छत वाटे.. उन्हात खेळू नका रे सांगणाऱ्या प्रौढ आवाजांना काळी बाभूळ तोंड बंद करायला ठेवायला सांगे. बाभूळ एवढी विशाल की खंडाळ्याचा अर्धा अधिक भाग तिने व्यापलेला आहे. आपल्याला प्रश्न पडतो बाभळीसारखं झाड वाड्याच्या मधोमध देशमुखांना कां ठेवलं असावं? तेव्हा त्याला काही उत्तर मिळत नाही. देशमुखचा वारसा म्हणून काळी बाभूळ मानायची तेव्हाच तर तिच्यावरच्या घुबडाचा आम्हां मुलांना वचक राहायचा आणि ही बाभूळ अशी एक अनामिक दबाव आमच्यावर ठेवायची ..त्यामुळे कसं कां होईना काही प्रमाणात त्या जमिनीचे रक्षण मात्र व्हायचं.. हे खरं आहे!
अमावस्येच्या रात्री मात्र मोठ्यांसह कुणीही खंडाळ्याकडे भटकायचं नाही. पौराणिक कथेतील खंडाळ्यासारखं तेव्हा हे खंडाळ कुणीतरी काहीतरी गुपित गुंडाळून गावाच्या अगदीमध्ये दडवून ठेवलंय असं वाटायचं ..अमावस्याला खरोखरच देशमुखचा आत्मा येथे येऊन दर महिन्याला आपली जागा पाहून जातो ..अंधारात गडप झालेल्या त्या काळ्या बाभळीवर तो रात्रभर बसून सारं सारं पाहत असतो.. तोच पोरांनी उकरलेली आणि गाववाल्यांनी खणून नेलेली माती रात्रभर सावरीत असतो.. देशमुख ह्या जमिनीवर लय जीव आहे ..तो मेला तरीबी त्याचा आत्मा येथे भटकत राहतो म्हणून तिकडे कोणी जायचं नाही हा ठरलेला शिरस्ता..!
खंडाळ्याला आता कुणी ओळखत नाही तेथे असलेली भितकांड भुरभुर पडणाऱ्या मातीसकट कधीचीच भुईसपाट झाली आहे.. काळी बाभूळ तिचा तर पत्ताच नाही .. कोणीतरी रातूनच अख्खी बाभूळ कापून नेल्याचं सांगतात लोक ..मुलांचे घोळके अंगाखांद्यावर खेळवत एका सुखी कुटुंबाची किल्ली असलेलं खंडाळ.. आता जमीन दोस्त झालेलं आहे . बिन मालकाची जागा बिन नवऱ्याची बायको ह्या दोन्ही जगाला स्वस्तच! तसंच ह्या खंडाळ्यावर अतिक्रमण वाढत गेल आहे. नगरपालिकेने रितसर हे खंडाळ ताब्यात घेतलं तर म्हणतात! मात्र त्यावर पालिकेचा नियोजित बगीचा अजून उगवायचा आहे ..उगवत आहे फक्त बेशरमाच्या झाडासारखी अतिक्रमणवाल्यांची गर्दी आणि मिळेल तो कापतोय त्या काळ्या बाभळीचा शिल्लक राहिलेला भल्ला मोठा काळा बुंधा ..मात्र बुंधा कापणाऱ्यांनी मुळे सलामत असलेली ती बाभूळ कधीही बहरून येऊ शकते तिच्या काळ्याभोर.. मोरपंखी अंधार सावल्यासह.. देशमुखांच्या जमेसह आणि बाभळीवरल्या भयकारी घुबडासह याची जाणीव ठेवावी.. एवढच महत्त्वाचं वाटतं आणि सांगावसं वाटतं…
☆
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈